राज्य बँक -सिंचन घोटाळे,- याची चौकशी कराच---- शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ओपन चॅलेंज
संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.-9730 867 448
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ राज्य सहकारी बँक घोटाळा, जलसंपदा घोटाळा असे राष्ट्रवादीवर आरोप करून थांबू नये, तर सखोल चौकशी करून त्याची माहिती देशाला द्यावी’, असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी दिले. तर, ‘विचारधारा वेगवेगळी असली तरी इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. देश आणि संविधानाचे रक्षण करणे, हुकुमशाहीला घालविणे हे आमचे लक्ष्य आहे. भारतमातेच्या हातात कोणत्याही हुकुमशहाला बेड्या घालू देणार नाही’, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.
मुंबईत आज, गुरुवारपासून इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीची बैठक सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. यावेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, शेकाप नेते जयंत पाटील आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथे झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा भ्रष्टाचारी पक्ष असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अजित पवार हे राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. त्यावर शरद पवार म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ आरोप करू नये. राज्य सहकारी बँक व जलसंपदा घोटाळा याबाबत केवळ आरोप न करता त्यांनी सखोल चौकशी करावी. सत्तेचा गैरवापर झाला असेल तर त्यांनी देशातील जनतेला सांगावे’, असे आवाहन शरद पवार यांनी दिले. तर, या बैठकीत किमान समान कार्यक्रम तयार करण्यात येईल, असेही शरद पवार यांनी नमूद केले. आमच्या पक्षात कोणताही संभ्रम नाही. काही लोकांना त्यांची जागा राज्यातील मतदार दाखवतील, असेही ते म्हणाले.
‘इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी अनेक चेहरे आहेत. भाजपकडे कोणता पर्याय आहे हे त्यांनी सांगावे. जो आहे त्याने दहा वर्षांत काय केले? कर्नाटकात तर बजरंगबलीला आणूनही काहीच फायदा झाला नाही’, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. आमची विचारधारा वेगवेगळी आहे, पण उद्देश एकच आहे. लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत व एकत्रच राहू.
चले जाव आंदोलनाची सुरुवात मुंबईतूनच झाली होती. ब्रिटीशही विकास करत होतेच ना? आम्हाला विकासही हवा व स्वातंत्र्यही. त्याचे रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. कालच्या नीती आयोगाच्या बैठकीनंतर मुंबई तोडण्याचा यांचा डाव पुन्हा एकदा उघड झाला आहे. पण, राज्यात आणि केंद्रात आमचे सरकार आल्यानंतर यांचे सर्व उफराटे निर्णय परत फिरवू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
हे सरकार गॅसवरच आहे
‘मणिपूरमधील त्या दोन महिला, दिल्लीतील आंदोलनकर्त्या कुस्तीपटू या सगळ्या महिलांना सुरक्षित वाटावे असे सरकार आणण्यासाठी एकत्र आलो आहोत. आम्ही देशाच्या रक्षणासाठी भारतमातेच्या रक्षणासाठी एकत्र आलो आहोत. आजच गॅसचे भाव २०० रुपयांनी कमी करण्यात आले. जसजशी इंडिया आघाडी भक्कम होत जाईल, तेव्हा एक दिवस असा येईल की, हे सरकार गॅस मोफत देईल. कारण सरकार गॅसवरच आहे. त्यामुळे भाव कमी केले तर आश्चर्य नाही’, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
‘प्रकाश आंबेडकर यांना इंडियाबाबत विचारणार’
प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती केली आहे. त्यामुळे ते राज्य पातळीवर महाविकास आघाडीत आहेतच. देशपातळीवर त्यांना इंडिया आघाडीत यायचे असेल तर निश्चितच त्यांच्या भावना जाणून घेऊ, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसवर ‘सामना’तून टीका होत असल्याबाबत विचारले असता, आम्ही ज्यांच्यासोबत असतो त्यांच्यावर टीकाच करतो. भाजपसोबत होतो तेव्हाही त्यांच्यावर ‘सामना’तून टीका झाली होती, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
‘फॅसिस्ट शक्तींना रोखणार’
‘महाराष्ट्राने देशाला स्वातंत्र्यासह प्रत्येक आंदोलनात दिशा दिली. आज ११ मुख्यमंत्री या आघाडीत आहेत. भाजपने तोडमरोड सरकार बनविले ते सोडून ११ मुख्यमंत्री आहेत. मध्य प्रदेश, गोवा, महाराष्ट्र या राज्यांना तोडण्याचे काम भाजपने केले. कर्नाटकमध्ये आमचेच सरकार लोकांनी निवडून दिले. महाराष्ट्रात आमची सत्ता घेऊन गेले तरी आमचे सरकार परत येणार. देशातील फॅसिस्ट शक्तींना रोखण्याचे आव्हान आमच्यासमोर असेल’, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
सौजन्य ;--
वार्ताहर---आवाज महाराष्ट्राचा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा