Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३

ऐन पावसाळ्यात नीरा नदीवरील बंधारे कोरडे दुष्काळ सदृश्य परिस्थितीने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

 

  

      इंदापूर -प्रतिनिधी एस.बी. तांबोळी 

            मो. नं.8378081147

                       इंदापूर तालुक्यातील नीरा नदी व त्यावरील बंधारे ऐन पावसाळ्यात कोरडे पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सध्याला निरा नदीवर असणाऱ्या जवळपास सर्वच धरणांमध्ये जवळपास ९० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे विर धरणातून नीरा नदीत पाणी सोडावे अशी मागणी शेतकरी व नागरीकांतून होत आहे.

     धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस हा १५ ऑगस्ट पर्यंत कमी होत असतो. त्यामुळे १५ ऑगस्ट नंतर नीरा नदीवरील असणारे बंधारे क्रमाक्रमाने ढापे टाकून पाण्याने पूर्ण भरून घेतले जातात. मात्र यावर्षी अद्याप नीरा नदीत पाणी सोडले नसल्याने नीरा नदी व त्यावरील बंधारे सध्या कोरडे आहेत. तर बंधाऱ्या जवळच्या भागात अल्प प्रमाणात खोरोची पासून ते नरसिंहपूर पर्यंत पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली सध्या शेतात उभी असलेली पिके वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तर नीरा नदी परिसरातील इंदापूर तालुक्यातील गावांच्या पाणीपुरवठा योजनांवर याचा परिणाम काही प्रमाणात होताना दिसत आहे.

    अशातच धरण परिसरातील पाऊस साधारणपणे ऑगस्ट महिन्यात उघडतो. त्यामुळे प्रतिवर्षी जून पासूनच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निरा नदीत पाणी सोडले जाते. बंधारे भरण्यासाठी बंधाऱ्यांचे ढापे १५ ऑगस्टनंतर लगेचच टाकून पाणी बंधाऱ्यात अडविले जाते. त्यामुळे प्रतिवर्षी नदी व त्यावरील बंधारे हे पूर्ण क्षमतेने भरलेले असायचे.

    परंतू पावसाळ्यात निरा नदीत पाणी न सोडल्याने सध्या निरा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊस उघडल्याचे कारण पुढे करून जलसंपदा विभागाने पाणी सोडले नाही तर शेतकऱ्यांना आपली पिके यापुढील काळात कशी टिकवायची असा प्रश्न निर्माण होणार आहे.

     जलसंपदा विभागाने नीरा नदीत तात्काळ पाणी सोडून बंधारे भरून घ्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. त्याचबरोबर आपली शेती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी राजकीय मतभेद विसरून नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी एकत्र येवून संघर्षाची तयारी ठेवणे गरजेचे आहे.

फोटो - सराटी येथील नीरा नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे पडल्याचे दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा