Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३

मोठ्या गाळप क्षमतेच्या साखर कारखान्याबरोबर स्पर्धा करत एफ आर पी पेक्षा जास्त दर देऊन शंकर सहकारी कारखान्याने एक आव्हान निर्माण केले.

 


संपादक---- हुसेन मुलाणी

टाइम्स - 45 -न्युज मराठी

मो.9730 867 448

                      गेली ४ वर्षापूर्वी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ताब्यात मिळालेल्या श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळाने केवळ ३ ऱ्याच गळीत हंगामात चक्क एफ आर पी पेक्षा जास्त दर देऊन जिल्ह्यातील जुन्या,सुस्थितीतील व सहकारीच नव्हे तर सर्वच साखर कारखानदारांसमोर आव्हान उभे केले आहे.

   सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखाना हा स्व.शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून उभारलेला माळशिरस तालुक्यातील दुसरा सहकारी साखर कारखाना आहे.तो त्यांनी चितळे बंधू या खाजगी मालकाकडून लिलावात विकत घेऊन तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांसाठी सहकारी केला होता.

   त्यापूर्वी त्यांनी सन १९६२ मध्ये सध्याचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली होती.तो सुस्थितीत आहे.

   श्री शंकर कारखान्याला सुरुवातीपासूनच ऊस पुरवठ्याचा प्रश्न आहे.काही काळ महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या सदाशिवनगर,शिवपुरी मळ्यातील ऊस मिळाला, मात्र पुढे हे महामंडळ ही बंद पडले,तरीही शंकरराव मोहिते पाटील यांच्या काळापासून ते डॉ.धवलसिंह यांच्यापर्यंत बाहेरून अगदी कर्नाटकातून ऊस आणून कारखाना चालवला जात होता.

  सन २०१६ च्या हंगामानंतर या कारखान्याचे काम थांबले,त्यामुळे या हंगामातील शेतकरी,कामगार,वाहतूकदार या सर्वांचीच कारखान्याकडे देणी झाली.पुढे डिसेंबर २०१८ मध्ये हा कारखाना निवडणुकीत रणजितसिंह मोहिते पाटील व त्यांच्या पॅनेलने जिंकून ताब्यात घेतला.

   त्यावेळच्या परिस्थितीबद्दल सांगताना चेअरमन आ.रणजितसिंह यांनी वार्षिक सर्व साधारण सभेत सांगितले की,

"डिसेंबर २०१८ साली कारखाना ज्यावेळी ताब्यात घेतला, त्यावेळी कारखान्यात लाइटही नव्हती.जनरेटर दुरुस्तीसाठी दीड लाख रुपये नव्हते".अशा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत या संचालक मंडळाने कारभार सुरू केला.पहिल्या गळीत हंगामात तर कारखाना काही तासच चालला.तर पुढच्या हंगामात काही दिवस चालला.

 दरम्यान च्या काळात कारखान्याची काही जमीन पालखी मार्गासाठी संपादीत झाल्याने त्याची काही रक्कम मिळाली, पुढे सध्याच्या सरकारकडूनही या कारखान्यास काही मदत मिळाली व उधार उसनवारीने काम चालू असतानाही संचालक मंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चालूची देणी भागवत मागील ही थोडी थोडी देणी दिली. थोडं थोड करत एफ आर पी ची रक्कमही दिली.

 सध्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याच्या अडचणीशी काही देणेघेणे नसते,जे त्यांच्या उसाला जादा दर देतील त्या कारखान्यांना आता शेतकरी ऊस घालत आहेत,त्यात यावर्षी जून जुलै मध्ये पाऊस नसल्याने उसाची वाढ झाली नाही,शिवाय मोठा पाऊस नसल्याने हुमनीने ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांनी जनावरांना चारा नसल्याने चाऱ्यासाठी ऊस वापरला आहे,त्यामुळे ऊसाबाबत आता स्पर्धा करावी लागणार आहे.हे ओळखून कारखान्याने यावर्षी उत्पादकांना एफ आर पी ची रक्कम देऊन वर प्रतिटन १११ रुपये जादा देण्याचे ठरवले व वार्षिक सर्व साधारण सभेत तसे दिवाळीला ही रक्कम देण्याचे जाहीरही केले.

    शेतकऱ्यांना एफ आर पी पेक्षा जास्त दर दिल्यास ती रक्कम म्हणजे कारखान्याला झालेला फायदा असून त्या रकमेवर जादा कर भरावा लागतो असे यापूर्वी मानले जात असतानाही या कारखान्याच्या संचालक मंडळाने हे धाडस केल्याचे दिसत आहे.

    त्यामुळे कारखान्यावरील शेतकऱ्यांचा विश्वास वाढला असून येत्या गळीत हंगामात गळीतास ऊस वाढल्यास त्याचा प्रत्यय येणार आहे.शिवाय या कारखान्याने जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी उपपदार्थ निर्मिती व कमी गाळप क्षमता असूनही जुन्या,सक्षम व मोठ्या गाळप क्षमतेच्या साखर कारखान्यांबरोबर स्पर्धा करत एफ आर पी पेक्षा जास्त दर देऊन एक आव्हान निर्माण केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा