इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी अधिवेशनात केलेल्या मागणीप्रमाणे मुंबई येथे मंत्रालयात मंगळवारी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
यावेळी खंडकरी शेतकरी बांधवांच्या भोगवटा वर्ग २ जमिनीचे भोगवटा वर्ग १ मध्ये विनाशुल्क रूपांतर करण्यासाठी सादर झालेल्या प्रस्तावांना मंत्रिमंडळ बैठकीसमोर मांडून तातडीने मान्यता देणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. तसेच एक एकर पेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या खंडकरी शेतकर्यांना जमिनीचे वाटप झाले होते. त्यामुळे एक एकर पर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रलंबित विषय आता १० गुंठे पासून ते १ एकरापर्यंत त्यांना जमिन देऊन तो विषय सोडवणार असल्याचे देखील सांगितले.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी कळंब, रणगांव, वालचंदनगर, आनंदनगर, जंक्शनसह दहा ते बारा गावांमध्ये राबविल्या जाणाऱ्या जल जीवन मिशन योजना, शाळा इमारती, आरोग्य व शासकीय कार्यालये, घरकुले, मुस्लिम बांधवांसाठी दफनभूमीसाठी लागणारी जागा, गावठाण विस्तार वाढीसाठी लागणारी जमीन यासह इतर बाबींसाठी शेती महामंडळाची जागा मिळण्याबाबत मागणी केली असता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदर मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून त्यास मंजुरी घेऊन शासनाच्या पुढील धोरणात्मक निर्णयांसाठी विशेष अध्यादेश काढणार असल्याचे सांगितले, त्याचबरोबर शेती महामंडळाच्या कामगारांच्या हक्काच्या घराच्या जागेसाठी महिनाभरात मंत्रालयात लोकप्रतिनिधी व संबंधित विभागांचे अधिकारी यांची संयुक्त स्वतंत्र बैठक घेऊन कामगारांना 2 गुंठे तसेच घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांना जागा देणेबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती यावेळी दिली.
या बैठकीप्रसंगी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे, फलटणचे आमदार दिपक चव्हाण, राज्याचे अप्पर मुख्य सचिव राज गोपाल देवरा, राज्याचे वित्त व नियोजन सचिव विश्वजित माने, शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माने साहेब, रत्नपुरी मळ्याचे तहसिलदार लंगोटे साहेब, खंडकरी प्रतिनिधी सुहास डोंबाळे पाटील, कामगार नेते युवराज रणवरे, अतुल सावंत, राहुल रणमोडे यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा