S B tamboli
इंदापूर तालुका प्रतिनिधी
- राज्यात २००७ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात झाल्यापासून गटप्रवर्तक कामे करीत आहेत. सध्याला राज्यात गटप्रवर्तकांची संख्या ३५०० पेक्षाही जास्त आहे. बहुतांश पदवीधर गटप्रवर्तकांची नेमणूक सरकार करते. त्यामुळे मानधनही सरकारच देत असल्याने गटप्रवर्तक या शासनाच्या कर्मचारी आहेत. गटप्रवर्तकांची नेमणूक संविधानानुसार आरोग्य विषयक घटनात्मक तरतुदीची अंमलबजावणी करण्याकरिता झाली आहे. गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागू करावेत, जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेली वेतन श्रेणी देण्यात यावी. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेली वार्षिक वेतन वाढ पाच टक्के व अनुभव बोनस १५% गटप्रवर्तकांना सुद्धा लागू करण्यात यावा त्याखेरीज गटप्रवर्तकांना प्रवास भत्ता देण्यात यावा.
राज्यामध्ये ७० हजार अशा स्वयंसेविका मोबदला आधारित काम करत आहेत. करोना काळात स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता काम केले आहे. तसेच अत्यल्प मानधनामध्ये काम करत आहेत. राज्य शासनाने आशा व गटप्रवर्तकांवर ऑनलाइन कामाची सक्ती केली जात आहे. कोणत्याही प्रकारची साधने उपलब्ध न करता ऑनलाइन काम करून घेणे ही अन्यायकारक बाब आहे. केंद्र सरकारने गेले पाच वर्षे कोणत्या प्रकारची मोबदल्यात वाढ केलेली नाही. महागाई प्रचंड वाढलेल्या परिस्थितीतही स्वतःचे कुटुंब कसे जगवायचे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे त्यांना किमान वेतन लागू करणे अपेक्षित आहे. आशा व गटप्रवर्तक यांना बोनस देणे अपेक्षित आहे. आदि मागण्यांसाठी (दि. 18 ऑक्टोबर) पासून राज्यातील आशा व गटप्रवर्तकांनी बेमुदत संप पुकारला आहे. शासनाने आशा व गटप्रवर्तकांचे प्रश्न चर्चेने सोडवून न्याय द्यावा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घडवण्यासाठी आशा व गटप्रवर्तक कृती समितीचे निमंत्रक कॉम्रेड निलेश दातखिळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा परिषदेवर जेलभरो करून जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई यांना निवेदन देऊन मागण्यांबाबत चर्चा केली. त्यावर देसाई यांनी लवकरच आशा व गटप्रवर्तक यांच्या प्रश्नावर चर्चा करून शासन स्तरावर मार्ग काढण्यात येईल.
आंदोलनाला भारतीय कम्युनिष्ठ पक्षाचे जिल्हा प्रतिनिधी कॉम्रेड विठ्ठल करंजे, शेतमजूर युनियनचे कॉम्रेड घनशाम निबाळकर, अंगणवाडी कर्मचारी संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पूनम निंबाळकर यांनी पाठिंबा दिला.
निवेदन देताना गटप्रवर्तक मंदा पडवळ, आरती घुमे, सीमा झुरगे, दीपा लोखंडे, वैजयंती गव्हाणे, तर आशा स्वयंसेविका शुभांगी जगताप, रेश्मा सय्यद, सुजाता गायकवाड, अफसाना सय्यद आदि आशा व गटप्रवर्तक उपस्थित होत्या. मागण्या तातडीने सुटल्या नाही तर मंत्रालयावर ठिय्या आंदोलन केले जाईल
फोटो - पुणे येथील जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई यांना निवेदन देताना
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा