इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
-भरणेवाडी येथे आयोजित ग्रामीण आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिरास नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. तालुक्यातील हजारो गरजू रुग्णांनी या शिबिरात सहभाग नोंदवत वेगवेगळ्या तपासणी तसेच उपचारांचा लाभ घेतला.
आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान व ससून सर्वोपचार रुग्णालय,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भरणेवाडी येथील ग्रामपंचायत प्रांगणामध्ये भव्य शिबिर संपन्न झाले. आमदार दत्तात्रय भरणे यांनी सातत्याने इंदापूर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याविषयी अतिशय नेत्रदिपक काम केले. नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ देण्यामध्ये संपुर्ण महाराष्ट्रात भरणे यांचा दुसरा क्रमांक लागतो. आमदार भरणे यांच्या माध्यमातून दर आठवड्याला इंदापुरातील शेकडो रूग्णांवर मुंबई-पुण्यातील मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये महागड्या तसेच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अगदी मोफत आणि यशस्वीपणे पार पडत असतात. त्यांच्यामुळे तालुक्यातील हजारो गोरगरीब, सर्वसामान्य, गरजू रुग्णांना एक प्रकारचे जीवदान लाभत असल्याने त्यांची खऱ्या अर्थाने आरोग्यदूत म्हणून वेगळी ओळख महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात निर्माण झालेली आहे. आमदार भरणे हे आरोग्याच्या बाबतीत नेहमीच तत्पर असतात त्यांच्याकडे आलेल्या रुग्णाला सर्वतोपरी मदत जलद गतीने कशी मिळेल, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात म्हणूनच दुर्धर आजाराशी सामना करणारे अनेक रुग्ण त्यांच्या मदतीमुळे ठणठणीत बरे झालेले आहेत.
सामजिक बांधिलकीच्या भावनेतून ससून रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. संजिव ठाकूर व ससून हॉस्पिटल अधिष्ठाता विशेष कार्य. अधिकारी तथा शिबीराचे डॉ.मानसिंग साबळे यांच्यासह सुमारे १२० नामांकित तज्ञ डॉक्टरांच्या टीमने सकाळपासून हजारो गरजूंना नेत्ररोग, डोळे तपासणी, चष्मेवाटप, स्त्रीरोग, मेंदू रोग, कर्करोग, हृदयरोग, अस्थिव्यंगोपचार, कान, नाक व घसा तपासणी, ग्रंथीचे विकार, त्वचा व गुप्तरोग, जनरल सर्जरी, लठ्ठपणा, दंतरोग, श्वसनविकार व क्षयरोग, मानसिक आरोग्य, जनरल मेडिसिन, बाल आरोग्य, प्लास्टिक सर्जरी, मूत्ररोग अशा वेगवेगळ्या आजारांवर मोफत तपासणी चाचण्या करून औषधो उपचारासह इलाज केले.
तसेच या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने शेकडो नागरिकांनी आभा ओळखपत्र व आयुष्यमान भारत ओळखपत्र काढण्यासाठी नोंदणी केली असुन २५९ रक्तदात्यांनी रक्तदान शिबीरात सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भगवानराव भरणे प्रतिष्ठान व जिल्हा परिषद, पुणे तसेच पंचायत समिती, इंदापूर आणि सर्व पदाधिका-यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल आमदार दत्तात्रय भरणे यांनी सर्वांचे आभार मानले.
फोटो - भरणेवाडी येथे आयोजित ग्रामीण आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिरास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा