इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
बावडा ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला. ओबीसी महिलेसाठी आरक्षित जागेवर जनतेतून थेट सरपंच निवड होणार आहे. तर सहा वार्डातील १७ जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे गाव असल्याने निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बावडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सन २०२३ ते २०२८ या पंचवार्षिकसाठी निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला असल्याने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये १६ ते २० आक्टोंबर निवडणुकीसाठी अर्ज भरणे, २३ आक्टोंबर छाननी, २५ आक्टोंबर माघार व चिन्ह वाटप तसेच ५ नोव्हेंबरला मतदान व ६ नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे.
बावडा ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुक वार्ड आरक्षण पुढीलप्रमाणे - जनतेतून थेट सरपंच ओबीसी महिला आरक्षण आहे. तर वार्ड एक - अनुसूचित जाती स्त्री, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, सर्वसाधारण स्त्री/पुरूष, वार्ड दोन - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण स्त्री/पुरुष, वार्ड तीन - अनुसूचित जाती पुरुष, सर्वसाधारण स्त्री, वार्ड चार - अनुसूचित जाती स्त्री, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री/पुरुष, वार्ड पाच - अनुसूचित जाती पुरुष, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण स्त्री/पुरुष, वार्ड सहा - सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण काढण्यात आले आहे.
मागील पंचवार्षिक निवडणूक माजीमंत्री हर्षवर्धन पाटील व अशोक घोगरेसह सर्वांच्या विचाराने बिनविरोध करण्यात आली होती. त्यामध्ये सरपंच पदावर किरण विलासराव पाटील यांची तर उपसरपंचपदी निलेश घोगरे यांची निवड करण्यात आली होती. परंतू तालुक्यात व राज्यात विरोधी आमदार व सरकार असल्याने ग्रामपंचायतला विकास कामांसाठी अपेक्षित निधी उपलब्ध झाला नसल्याने जनतेच्या अपेक्षा पूर्ण व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नसल्याची खंत तत्कालीन सरपंच किरण पाटील व उपसरपंच निलेश घोगरे यांनी बोलून दाखवली आहे.
निवडणूक जाहीर झाल्यापासून जोर बैठकांना जोर आला असून सरपंच व सदस्य पदासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. थंडीच्या चाहुलीतही वातावरण उबदार बनले आहे. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार व शरद पवार गट ) या मुख्य पक्षांच्या पॅनलसह इतर पक्षांचे उमेदवार व अपक्ष आपले नशिब अजमावण्याच्या तयारीला लागले आहेत.
संभाव्य उमेदवारांनी आपला जातीचा दाखला, पडताळणी, उत्पन्न दाखला, ॲफेड्युट, ग्रामपंचायत करपावती आदींची जमवाजमव सुरू केली आहे. तर वाढदिवस, नामकरण, लग्न समारंभ, निधन भेटीवर ज्यादाचा जोर लावला आहे. तर विविध पक्षांनी वेगवेगळ्या पदांच्या निवड व नेमणूका करण्याचा सपाटा लावला आहे. सणासुदीच्या कालावधी असल्याने सर्वसामान्यांचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.
आगामी काळात नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा आदिंच्या निवडणुकींचा कालावधी असल्याने खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, यशवंत माने, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक ही प्रतिष्ठेची ठरणार आहे. स्थानिक मुद्द्याबरोबर तालुका, जिल्हा, राज्य पातळीवरील प्रश्नांचा उहापोह होणार आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा