टाइम्स 45 न्युज मराठी.'
सर्वसामान्य कुटुंबातील, अडचणीत असलेल्या काही भावंडांना नेत्यांनी नोकरीस लावले, गुत्तेदारी दिली, संस्थेतील नोकरीचे ॲप्रूवल आणले, दोन नंबरचे धंदे लावून दिले, हाफ्ते खाण्याची मुभा दिली, कोर्ट-कचेऱ्या-पोलिस स्टेशन आदी ठिकाणच्या भानगडी मिटवण्यात मदत केली, घरगुती किंवा एखाद्यासोबतचे अंतर्गत वादप्रसंग मिटवण्यात मदत केली म्हणून अशा नेत्यांनी केलेल्या व्यक्तिगत उपकरापोटी आमचे हे बंधू नेत्यांचे किंवा सरकारचे आंधळे समर्थक होत असतात. आपल्याला अडचणीत मदत केलेला नेता जे करेल तेच सत्य व अंतिम अशी भूमिका घेवून नेत्यासाठी जीवाचे रान करीत असतात. *पण तुमच्या व्यक्तिगत कामांसाठी, तुमच्यावर व्यक्तिगत केलेल्या उपकाराची परतफेड करण्यासाठी सार्वजनिक समस्यांना तसेच ठेवून तमाम समाजाला वेठीस धरण्याचे काहीही कारण नाही. ,
तुमच्यावर केलेल्या व्यक्तिगत उपकराची परतफेड तुम्ही नेत्यांना व्यक्तिगत स्वरुपातच परत करावी. त्यांच्या घरगुती कार्यक्रमांत, समारंभांत, व्यक्तिगत अडीअडचणीत, नेत्यांच्या कुटुंबातील विवाह-दवाखाना-जन्म-मृत्यू अशा सर्व प्रसंगी वाट्टेल ते करुन नेत्यांच्या तुमच्यावरील उपकाराची पदतफेड जरुर करावी. *पण आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड करण्यासाठी आपल्या नेत्याची बाजू घेवून एखाद्याला हिणवणे, आपल्या नेत्याच्या चुकीच्या बाबींचेही समर्थन करणे, आपला नेता ज्या पक्षात आहे त्या पक्षाच्या जनविरोधी धोरणांचे समर्थन करीत फिरणे हे चुकीचे आणि घातकी आहे.
चार दिवसाचे उपकार फेडण्यासाठी सरकारने आरोग्य, शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा अशा बाबतीत घातलेल्या गोंधळाकडे डोळेझाक करणे हे आपल्या पुढच्या कित्येक पिढ्यांचे आणि तमाम सामान्य जनतेचे नुकसान करणारे ठरणार आहे. तुमच्यासारखी सामान्य कुटुंबातील तरुण मंडळी हे आमचे शत्रू नाहीत. तर सत्तेचा वापर मुठभरांच्या फायद्यासाठी करुन जनतेला बेचिराख करु पाहणारे लांडगे आपल्या सर्वांचेच शत्रू आहेत. त्यामूळे व्यापक जनहीतापुढे आपले व्यक्तिगत हितसंबंध बाजूला ठेवण्याची कसरत आपल्याला आपल्या, जनतेच्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांच्या हितासाठी करावी लागणार आहे. ती तुम्ही कराल ही अपेक्षा आणि विश्वास आहे.
ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो.9921657346)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा