Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १५ ऑक्टोबर, २०२३

भारताची विजयी हॅट्रिक-" रोहित शर्मा "हिट ---पाकिस्तानला केले चारी मुंड्या चीत.

 


संपादक-- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448

                        अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचाच दबदबा राहिला. सव्वा लाख प्रेक्षक अन् अनेक सेलिब्रेटींसमोर भारतीय संघाने शेजाऱ्यांचे वस्त्रहरण केले. गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) पाकिस्तानी संघाला झोडून काढले. २ बाद १५५ वरून पाकिस्तानचा संपूर्ण संघ १९१ धावांत तंबूत परतला अन् भारताने हे लक्ष्य सहज पार करून वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक साजरी केली. रोहितचे शतक थोडक्यात हुकले, ते जर पूर्ण झाले असते तर हा आनंद आणखी द्विगुणित झाला असता. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धची अपराजित मालिका ८-० अशी कायम राखली. या विजयासोबत भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला.

वर्ल्ड कप स्पर्धेतील पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या शुबमन गिलने धमाकेदार सुरुवात केली. हसन अलीच्या षटकात त्याने ३ चौकार खेचून पाकिस्तानी गोलंदाजांना दडपणात आणले. शाहीन आफ्रिदीच्या तिसऱ्या षटकात गिलने ( १६) पॉईंटच्या दिशेने जोरदार फटका मारला, परंतु शादाब खानने सुरेख झेल टिपला. रोहित शर्मा व विराट कोहली यांनी पाकिस्तानला चोप दिला. रोहितने आज षटकारांचा पाऊस पाडून वन डे क्रिकेटमध्ये ३०० षटकार खेचणारा जगातील तिसरा आणि पहिला भारतीय फलंदाज ठरला. रोहित व विराट यांची ५६ धावांची भागीदारी हसन अलीने तोडली. विराट १६ धावांवर झेलबाद झाला. पण, रोहित पाकिस्तानी गोलंदाजांना पुरून उरत होता आणि त्याने ३६ चेंडूंत अर्धशतक झळकावले. 



२००३च्या वर्ल्ड कपनंतर पाकिस्तानने आज पहिल्या दहा षटकांत ७९ धावा दिल्या आणि ही त्यांची दुसरी खराब कामगिरी ठरली. २००३मध्ये भारताविरुद्ध सेंच्युरियन येथे त्यांनी ८८ धावा दिल्या होत्या. विराटच्या विकेटनंतर आलेल्या श्रेयस अय्यरनेही रोहितसह अर्धशतकी भागीदारी केली. शाहीनने भारताच्या कर्णधाराला माघारी पाठवले. रोहितने ६३ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ८६ धावा केल्या, त्याचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आठवे शतक हुकले. भारताचा खेळ त्यानंतर थोडा मंदावला, परंतु लोकेश राहुल व श्रेयस यांनी संयमी खेळ करून विजय पक्का केला. भारताने ३०.३ षटकांत ३ बाद १९० धावा केल्या. श्रेयस ५३ धावांवर नाबाद राहिला, तर लोकेशनेही १९ धावा केल्या.


तत्पूर्वी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा व सिराज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ १९१ धावांत तंबूत पाठवला. अब्दुल्लाह शफीक ( २०) आणि इमाम-उल-हक ( ३६) हे माघारी परतल्यानंतर बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांनी ८३ धावांची भागीदारी करुन पाकिस्तानला सावरले. पण, सिराजने अर्धशतकवीर बाबरचा ( ५०) त्रिफळा उडवला. सौद शकील ( ६) आणि इफ्तिखार अहमद ( ४) हे कुलदीपचे बळी ठरले. त्यानंतर जसप्रीत बुमराहने रिझवानचा ( ४९) त्रिफळा उडवला आणि पाठोपाठ शादाब खानचीही ( २) दांडी गुल केली. २ बाद १५५ वरून पाकिस्तानचा संपूर्ण संघ १९१ धावांत तंबूत परतला.   

सौजन्य;---माहिती सेवा ग्रुप ,पेठावडगाव.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा