*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो--9730 867 448*
भारतात ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान, अध्यात्म आणि धर्मचिकित्सा या क्षेत्रात सर्वाधिक विविधतापुर्ण काम झालेलं पहावयास मिळतं. जीवनविषयक सर्व मुलभुत बाबतीत विविध अंगाने चर्चा, विचारविनिमय, साहित्यनिर्मिती झालेली आढळून येते. जगाच्या पाठीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि विविधतेने तत्वज्ञान आणि अध्यात्मविषयक मंथन झालेले इतरत्र कुठेही आढळून येत नाही. रामायण, महाभारत, बौद्ध दर्शन, जैन दर्शन, चार्वाक दर्शन, पुर्वमिमांसा, उत्तरमिमांसा, न्याय, सांख्य, वैशेषिक, पातंजल योग, संतांची भक्ती चळवळ, लिंगायत दर्शन, शीख दर्शन इत्यादी अनेक विचारप्रवाहातून जीवनविषयक तत्वज्ञान आणि दृष्टिकोन मांडलेला पहावयास मिळतो. परकीय आक्रमणासोबत आलेले धार्मिक आणि सांस्कृतिक बदलही या मातीने आपल्यात सामावून घेतले. इस्लाम, ख्रिश्चन, पारशी, सुफी इत्यादी धर्मविचार इथे आधीच असलेल्या विचारप्रवाहांस येवून मिळाले आणि भारत म्हणजे तत्वज्ञान, धर्म या क्षेत्रातला महासागर झाला.
आज शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांचा ५५४ वा जन्मदिवस उत्साहात साजरा होत आहे. हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था, अस्पृष्यता, कर्मकांड, स्त्रीदास्यत्व आणि अंधश्रद्धा यातून बाहेर पडण्यासाठी बौद्ध, जैन, लिंगायत, शीख धर्माची स्थापना झाली. धर्माच्या उगमाची अनेक कारणे सांगितली जातात. मानवी जीवनातील दु:खातून मुक्ती हे त्यातले प्रमुख कारण होय. तरुण युवराज सिद्दार्थाला बाहेरच्या जगात पडताच मानवी जीवतील दु:खाचे दर्शन होते. हे दु:ख पाहून तो अस्वस्थ होतो आणि दु:ख मुक्तिच्या मार्गाच्या शोधात घरदार सोडून भटकंती करतो. समाजाचे, व्यक्तिचे आणि व्यक्तिच्या मानसिकतेचे निरिक्षण करतो. चिंतन, मनन, अभ्यास करतो आणि दु:ख मुक्तिचा मार्ग शोधुन जगाला 'धम्मा'च्या रुपाने सांगतो. तसेच काही जैन धर्म आणि शीख धर्माच्या बाबतीत घडले.
गुरु नानक यांचा शीख धर्म हा "नाम जपना, किरत करना आणि वंद चखना" ह्या तीन मुलभुत तत्वांवर उभा आहे. प्रचंड कर्मकांडात गुंतून न पडता, पुरोहितांकडून नागवले न जाता फक्त ईश्वराच्या नामस्मरणाचा मार्ग अवलंबावा हा संदेश नानकांनी दिला. मुर्तीपुजा नाकारली आणि एकेश्वरवादाचा स्विकार केला. धर्माच्या माध्यमातून पुरोहित वर्गाकडून सर्वसामान्य माणसाच्या होत असलेल्या पिळवणुकिविरुद्धचा हा एल्गार आहे. शीख धर्म स्थापनेच्या माध्यमातून समाजातील पिळवणुक थांबवणारी ही क्रांतिकारी घटना आहे. नानकांनी सांगितलेले दुसरे तत्व आहे 'किरत करना' म्हणजेच 'श्रम करणे'. नानकांनी श्रमप्रतिष्ठेला महत्व दिले. दुसऱ्याच्या श्रमावर जगणारे, दुसऱ्याच्या शारिरीक अगर बौद्धिक श्रमाचा मोबदला स्वत: खाणारे अनुत्पादक अन् आयदे लोक हे समाजावरचे बांडगुळ आहेत हे नानकांनी ओळखले अन् आपल्या धर्मात श्रमप्रतिष्ठेला सर्वोच्च दर्जा दिला. ते स्वत: शोषण करणाऱ्या धनिकांच्या घरी भोजनास जाण्याऐवजी श्रमिकाच्या घरी भोजनास जाणे पसंत करीत असत. त्यांनी नुसतीच श्रमप्रतिष्ठा सांगितली नाही तर कृतितून त्याचा आदर केला. नानकांचे तिसरे तत्व आहे 'वंद चखना' म्हणजे जे मिळेल ते सगळ्यांमध्ये वाटून घेणे. आपल्याकडे "भजनात एकी पण भोजनात बेकी" हा प्रकार होता. म्हणजे भजनात सगळे भेदभाव दूर सोडून एकत्र यायचे पण भोजन करताना मात्र अस्पृष्यता, भेदभाव पाळायचे. या विषमतेला छेद देण्यासाठी नानकाने 'लंगर' सुरु केले. लंगर म्हणजे जात, धर्म, पंथ, वंश, लिंग, वर्ग हे सगळे भेद विसरुन सर्वांनी एकत्र येउन भोजन करणे. आजही अनेक ठिकाणी 'लंगर' चालवले जातात. आपल्या मिळकतीतला दहावा भाग समाजातील दीन-दुबळ्यांकरीता द्यावा असे नानक सांगतात. यालाच शीख बांधव 'दसवंद' असे म्हणतात. बौद्ध धर्माने अपरिग्रह म्हणजेच संपत्तीचा अतिरेकी साठा करणे निषिद्ध मानले. नानकानेही मिळकतीतला दहावा भाग समाजासाठी देउ केला पाहिजे असे सांगितले. आपण संचित केलेली संपत्ती ही सामुदायिक श्रमाचे फलित असते आणि म्हणून तीची अंतीम मालकी ही सर्व समाजाची असते हे 'समाजवादी' तत्व सर्वच धर्मात थोड्या बहूत फरकाने पहायला मिळते.
शीख धर्मात स्त्री-सन्मानाला अनन्य साधारण महत्व आहे. हुंडा निषिद्ध आहे, विधवा पुनर्विवाहाला मान्यता आहे. विधवा पुनर्विवाहाची पद्धती ही सर्वसाधारण विवाहपद्धतीप्रमाणेच आहे. त्यात इतर कुठल्या रिवाजाची भर नाही. स्त्रीयांना पुरुषांप्रमाणेच सर्व धार्मिक विधी करता येतात. गुरुद्वाऱ्यामध्ये जावून भजन, ग्रंथपठन करता येते.
शीख धर्मात गुरुपंपरा आहे. गुरु नानक हे शीखांचे पहिले गुरु तर गुरु गोविंदसिंग हे दहावे गुरु होय. त्यानंतर गुरु गोविंदसिंगाने ग्रंथसाहिब ह्या धर्मग्रंथास गुरुपद बहाल केले आणि तेव्हापासुन हा धर्मग्रंथ 'श्रीगुरुग्रंथसाहिब' म्हणुन ओळखला जाऊ लागला. श्रीगुरुग्रंथसाहिब मध्ये सहा शीख गुरुंच्या वाणी, इतर संतांच्या वाणी यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील संत नामदेवांच्या धर्मविषयक विचारांचाही यात समावेश आहे. इतर संतांच्या धर्मविचाराला सामावून घेणारा आणि गुरुपद बहाल केला गेलेला 'श्रीगुरुग्रंथसाहिब' हा जगातील एकमेव धर्मग्रंथ आहे. पहिले शीख गुरु नानक हे 'भक्तीमार्ग' सांगतात. तर शेवटचे शीख गुरु गोविंदसिंग हे 'कर्मयोग' सांगतात. सत्य आणि न्याय यासाठी पराक्रमाची पराकाष्टा करायला, प्रसंगी जीवाचेही बलिदान द्यायला शीख धर्म शिकवतो. शीख धर्माला निवृत्ती मान्य नाही. ऐहिक जीवनाचा पुरेपुर स्विकार मान्य आहे. ब्रह्मचर्याशिवाय ईश्वरप्राप्ती शक्य नाही या विचाराला शीख धर्मात मान्यता नाही. साधे, सरळ, नैसर्गिक जीवन आनंदाने अन् पुरेपुर जगणे शीख धर्म सांगतो. म्हणुनच शीख धर्मिय लोक जीवनाचा निर्भेळ आनंद घेताना आपण पाहतो. अशाप्रकारे शीख धर्म शुद्ध विचार, साधी-सोपी ईश्वरसाधना आणि नैतिकता येथून सुरु होवून जीवनातील समृद्धी आणि पराक्रम इथपर्यंत व्यापक झालेला आपण पाहतो. धार्मिक बाबतीत गुरु गोविंद सिंगांनी सर्व अधिकार श्रीगुरुग्रंथसाहिबास बहाल केले. ऐहिक बाबतीतले अधिकार ठरवण्यासाठी खालसा पंथाची स्थापना करुन 'पंज प्यारे' यांची नेमणुक केली. त्यांनी स्वत: पंज प्यारे यांच्याकडून दिक्षा (अमृत) घेतली.
आज भारतात आणि जगात इतरत्रही शीख धर्म पसरलेला आपण पाहतो. भारतात पाच ठिकाणी तख्त स्थापुन 'जथेदार' नेमले गेले. जथेदारांची एक केंद्रिय समिती बनवून त्याद्वारे सर्व तख्तांचे नियंत्रण आणि संचालन केले जाते. विचार, आचारासोबतच शीख धर्मियांनी कमालीचे सुत्रबद्ध संघटन उभे केले आहे. दर कार्तिकी पोर्णिमेला गुरु नानक यांची जयंती मोठ्या उत्साहात प्रकाशोत्सव आणि गुरुपर्व म्हणुन साजरी केली जाते. आधुनिक काळात धर्मचिकित्सेने टोक गाठत धर्माच्या आवश्यकतेवरच प्रश्न उपस्थित केले. फ्रेडरिक नित्शे, कार्ल मार्क्स ते भगतसिंगांपर्यंत अनेकांनी नास्तिकता स्विकारुन धर्माची आवश्यकता फक्त शोषणावर आधारीत व्यवस्थेतला शोषितांच्या भ्रामक सुखाचा भाग आणि शोषण करणाऱ्यांच्या हातातले शस्त्र इथवरच मान्य केली. मानवी दु:खातून मुक्त होण्याचे अनेक मार्ग पाश्च्यात्त्य तत्ववेत्यांनी सांगितले. ते सर्व मार्ग 'सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्था' बदलण्याचे आहेत. जगाच्या पाठीवर जे अनेक धर्मविचार पुढे आले त्यांचा उद्देशही मानवी जीवनातील दु:ख नाहीसे करणे हाच आहे. पण केंद्रबिंदु मात्र 'व्यवस्था परिवर्तन' हा नसुन 'व्यक्ति परिवर्तन' हा आहे. व्यवस्था बदलून व्यक्ति बदलायचा की व्यक्तिमध्ये बदल घडवून आणुन समाजात आमुलाग्र बदल घडवून आणायचा हा मुलभुत फरक आहे.
मध्ययुगाच्या अंताला विज्ञान, तंत्रज्ञानाचा विकास होवून उत्पादन पद्धतीत बदल झाले. बदलती उत्पादन पद्धती आणि बदलत्या उत्पादन संबंधाच्या पार्श्वभुमीवर भांडवलशाही व्यवस्थेचा उदय झाला. या व्यवस्थेच्या उदयाने जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रचंड उलथापालथ झाली. भांडवलशाहीने प्रथम वसाहतवादाच्या रुपात साम्राज्यशाहीचे अन आता खाजगिकरण-उदारीकरण-जागतिकिकरण या रुपात नव - साम्राज्यवादाचे आक्राळविक्राळ स्वरुप घेतले आहे. जीवनातल्या प्रत्येक बाबीचे वस्तुकरण करुन तीला बाजारात उभे करायचे आणि त्याद्वारे नफा कमवायचा यावरच भांडवली व्यवस्थेचा डोलारा उभा आहे. जीवनातले कुठलेही क्षेत्र बाजारीकरणापासुन मुक्त आणि अलिप्त राहिलेले नाही. कला, साहित्य, राजकारण, धर्म अशा क्षेत्रातही बाजारु व्यवस्थेचे परिणाम उघडपणे दिसु लागले आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान विकसित झाले पण माणसातले 'माणुसपण' गमावण्याची भीती निर्माण झाली आहे. नैसर्गिक संसाधनांचा राक्षसी वापर केल्याने निसर्गाचा समतोल ढासाळतो आहे. माणसाकडून होणारी माणसाची पिळवणूक, देशाकाडून होणारी इतर देशाची पिळवणूक अंगवळणी पाडली जात आहे. लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे पण तो दाबण्यासाठी धार्मिक, भावनिक मुद्द्यांचे राजकारण केले जात आहे.
अशा सर्व परिस्थितीत कार्ल मार्क्स सारख्या विचारवंताचा आधार घेत, भांडवली व्यवस्थेत आलेले नवे बदल समजावून घेत ह्या बाजारु आणि लुटारु व्यवस्थेला नवा समाजवादी, मानवतावादी पर्याय देण्यासाठी सैद्धांतिक आणि व्यावहारीक दोन्ही पातळ्यांवर व्युहरचना आखावी लागणार आहे. या नव्या रचनेत 'धर्मा'ला नाकारुन चालणार नाही. उलटपक्षी धर्म, अध्यात्म यांचा मानवतावादी अंगाने विचार करुन श्रमिकांच्या लढ्याला भक्कम सांस्कृतिक आधार प्राप्त करुन द्यावा लागणार आहे. धर्म आणि श्रद्धा घेउनच हाजारो वर्षांपासुन माणसाचा प्रवास चालु आहे. ही धर्मश्रद्धा झटक्यात नाकारुन माणसाला मृतप्राय बनवणे घातक ठरणार आहे. धर्माने पिळवणुक करणाऱ्या शक्तींची पाठराखन करु नये एवढीच काळजी फक्त घ्यायची आहे. विषमता नाकारणारा, सर्व जीवांमध्ये एकच तत्व असल्याने भेदभाव नाकारणारा मानवतावादी धर्म श्रमिकांच्या लढ्यास प्रेरणा देणारा आणि चैतन्य निर्माण करणारा आहे. म्हणुनच मार्क्स, एंगल्स, लेनिन यांच्या सोबतीला बुद्ध, नानक, तुकाराम आणि कबीर आपल्याला घ्यावा लागणार आहे.
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची "एक ओंकार सतनाम .." ही घोषणा क्रांतिकारी आहे. सर्वांच्या ठायी एकच तत्व, एकच शक्ती वसलेली आहे. "सर्व काही एकाच शक्तीपासुन निर्माण होते आणि शेवटी तिथेच विलीन हिते तर मग विषमता, भेदभाव कशाला ?" अशी साधी, सरळ मांडणी करीत मानवांप्रती बंधुभाव जागृत करणाऱ्या शीख धर्म विचारांचा नानक जयंतीनिमित्त सर्वदूर 'जागर' होवो आणि मानव मुक्तिच्या लढ्यात हा विचार आपला सातत्याने सोबती राहो हीच सदिच्छा !
*"जो बोले सो निहाल, सत् श्री अकाल II"*
©* *ॲड. शीतल शामराव चव्हाण*
*(मो. 9921657346)*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा