ज्येष्ठ पञकार--चाँदभाई शेख.
संसद...
सॉक्रेटिस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता मानला जातो. त्याने स्वत: एकही पुस्तक लिहिले नाही. त्याचा शिष्य प्लेटोच्या "डायलॉग" या ग्रंथामुळे व काही नाटकांमुळे आपल्याला सॉक्रेटिस माहित आहे. तरुणांना प्रश्न विचारायला प्रेरीत करून अराजक घडवतो या आरोपाखाली त्याला देहदंडाची शिक्षा ठोठावली गेली. त्याला पळून जायची संधी उपलब्ध असतांनाही आपल्या राज्यव्यवस्थेची घटना पायतळी तुडविली जावू नये म्हणुन तो हेमलॉक या जहरी वनस्पतीचा रस पिऊन मृत्यूदंड स्वीकारतो. वीष घ्यायला सुरुवात केल्यापासून तो मरेपर्यंत जे उदात्त विचार ऐकवतो ते आजही मानवी जीवनेतिहासाला थक्क करणारे आहेत. "सूर्य पाहिलेला माणुस" या नाटकातील डा. श्रीराम लागू यांच्या चिरंतन अभिनयाने गाजलेली ही कलाकृती बव्हंशी विचारी मराठी माणसानी पाहिलेली आहे.... असेल.... त्यातून आम्ही काय शिकलो हा खरा प्रश्न आहे.
सोक्रेटिस जन्माला आला तो काळ ग्रीसमधील सांस्कृतीक आणि राजकीय संक्रमणाचा काळ होता. सोक्रेटिस वंशपरंपरेने खरे तर दगडफोड्या. आपल्याकडे वडार समाज जे काम करतो तेच काम तो करत असे. ग्रीसमद्धे आपल्यासारखी जातीय व्यवस्था नसल्याने एका दगडफोड्यालाही आपली अभिव्यक्ती करण्याचे स्वातंत्र्य जसे होते तसेच प्लेटोला त्याचा शिष्य बनायला कमीपणा वाटला नाही...त्याचेही स्वातंत्र्य असेल...उलट त्याने या आपल्या या लोकोत्तर गुरुला, ज्याने एक शब्दही लिहिला नाही, अजरामर करून सोडले.
प्रश्न विचारायला प्रेरित करना-या सॉक्रेटिसने राजकीय कारणांमुळे देहदंड सोसला. प्रश्न विचारणारे तरुण जेथे नसतात तो समाज मृतवत असतो. प्रश्नांची दखल घेतली नाही तर सत्ता, मग त्या कोणत्याही असोत, धार्मिक...सांस्कृतीक असोत की राजकीय...उलथल्या जातात हे इतिहासात घडले आहे. भारतही त्याला अपवाद नव्हता. महावीर-बुद्धाने जी सांस्कृतीक क्रांती घडवली ती प्रश्न विचारुनच. उत्तरे मिळाली नाहीत तेंव्हा त्यांनी ती स्वतंत्रपणे शोधली आणि प्रस्थापित सत्ता उध्वस्त झाल्या. कपिलमुनी, चार्वाक, कणाद, मंस्खली घोशाल, अजित केशकंबल यांनीही व्यवस्थेवर प्रश्नचिन्हे उभी केली. पुढेही शेकडो आव्हानकारी उभे ठाकले...मग ते चक्रधर असोत की नाथपंथीय...संतपरंपरा असो कि आधुनिक काळातील आगरकर, म. फुले, महात्मा गांधी, बाबासाहेब. या सर्वांचे एकमेवद्वितीय वैशिष्ट्य हे होते कि त्यांनी प्रश्न विचारले. व्यवस्थेला उत्तरे देता आली नाहीत म्हणुन त्यांनी स्वत: उत्तरे शोधली आणि सामाजिक व राष्ट्रीय क्रांती घडवली. समाजाला पुढच्या दिशा मिळत गेल्या.
संसदेत मोजक्या तरुणांनी जे कृत्य केले ते व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी. त्यांची पद्धत चुकीची असले तरी त्यांना युपीए कायदा लावणे ही सरकारची घोडचूक आहे. मुळातील त्यांच्या प्रश्नाचे काय हा प्रश्न निरुत्तरित राहणार असेल तर आम्हाला आमच्या विवेकाबद्दल शंका वाटली पाहिजे. आज विद्यार्थी प्रश्नच उभे करत असतील तर त्यांना उत्तरे देणे सरकारला क्रमप्राप्त आहे. दमन केल्याने प्रश्न विझून जातील अशा भ्रमात कोणत्याही सरकारने राहू नये. जी पिढी प्रश्न विचारत नाही ती मृतवतच असते. अशा मरणोन्मुख पिढीकडून भविष्य घडणे शक्य नाही हे उघड आहे. आज थोडकी असली तरी देशात अशी प्रश्न विचारणारी पिढी आहे. त्यांचे प्रश्न असे आहेत ज्यांची उत्तरे त्यांच्या स्वत:च्या हातात नाहीत. ज्यांच्या हातात आहेत त्यांनी उत्तरे देण्याची गरज आहे. असे झाले नाही तर ही पिढी आपापल्या मगदुराप्रमाणे उत्तरे शोधत जातील. ही उत्तरे सकारात्मकच असतील याची आजच्या सार्वत्रिक व्यामोहाच्या वातावरणात कोणीही खात्री देऊ शकत नाही. कारण सकारात्मकता म्हणजे शरणागतता असाही अर्थ लावला जावू शकतो याचे भानही असले पाहिजे. त्यातून अतिरेक झाला तर काय होईल याचा गंभीर विचार केला पाहिजे. तरुणांची उर्जा वाया घालवून किंवा चुकीच्या मार्गाला जावू देवून आम्ही काय साध्य करणार आहोत हा प्रश्न ...आणि त्याचे उत्तर शोधणेही तेवढेच आवश्यक आहे.
सौजन्य;-
-संजय सोनवणी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा