*टाइम्स 45 न्युज मराठी,नेटवर्क*
*मो..9730 867 448*
१२ डिसेंबर
नेते शरद पवार यांचा वाढदिवस
जन्म - १२ डिसेंबर १९४० (बारामती,पुणे)
गोविंदराव आणि आई शारदाबाई या शेतकरी कुटुंबातील जन्मलेल्या शरद पवार यांना राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू शारदाबाई पवार यांच्याकडून मिळाले. शारदाबाई पवार या स्वातंत्र्यपूर्व काळात पुणे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात कार्यरत होत्या. गोविंदाराव हे देखील सहकारी चळवळीतील निष्ठावंत कार्यंकर्ते होते. तसेच त्यांचे बंधू वसंतराव शेतकरी कामगार पक्षात होते. अशा कुटुंबात पवारांची लहानपणापासूनच राजकीय सामाजिक कार्याची जडणघडण झाली. त्यामुळेच शरद पवार यांचा कॉलेज जीएस (जनरल सेक्रेटरी) ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व विविध खात्यांचे केंद्रीय मंत्री हा खडतर प्रवास थक्क करणारा तर आहेच या शिवाय कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा देणारा आहे. बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात शरद पवार यांचे शालेय शिक्षण झाले. पुढे पुण्यातील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय शिक्षण घेतानाही त्यांनी जनरल सेक्रेटरी (जीएस) म्हणून महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावर नेतृत्त्व केले. या काळात शरद पवार यांचा युवक कॉंग्रेसशी संबंध आला आणि तेथून त्यांनी पक्षीय राजकारणात प्रवेश केला. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलेला हा नेता. महाराष्ट्राचे त्या वेळचे थोर नेते यशवंतराव चव्हाण काट्याच्या वाडीला पवार साहेबांच्या घरी जात होते. पवारसाहेबांच्या आईकडून त्यांनी हा मुलगा काँग्रेससाठी मागून घेतला. शेतकरी कामगार पक्षाचे राजकारण ज्या घरात होते त्या माऊलीने यशवंतरावांच्या ओटीत तिचा हा मुलगा दिला. १९६७ च्या निवडणुकीत काँग्रेसने तिकीट दिले. यशवंतरावांना अनेकांनी अशी भीती घातली की, बाबालाल काकडे यांच्यासारख्या तगड्या नेत्याविरुद्ध शरद पवार टिकू शकणार नाहीत. यशवंतरावांनी विचारले, "महाराष्ट्रात काँग्रेसच्या किती जागा येणार आहेत?" कोणी तरी सांगितले १५०. यशवंतराव म्हणाले, "१४९ येतील असे समजा. एक जागा जाईल." निवडणूक झाली. शरद पवार २८ हजार मतांनी निवडून आले. त्या दिवसापासून लोकसभा असो, विधानसभा असो, त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. निवडणुकीच्या एक दिवस आधी मतदारसंघात जाऊन लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी जिंकण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे आणि तो केव्हा तर इंदिरा गांधींची भीषण हत्या झाल्यानंतरच्या लोकसभा पोटनिवडणुकीत राजीव गांधींच्या खालोखाल मते मिळवून काँग्रेसच्या विरोधात ते निवडून आले. आजही महाराष्ट्रात ४०-५० आमदारांना निवडून आणणे, हे त्यांनाच जमू शकते. त्यांचा पक्ष म्हणजे तेच आहेत. त्यांना वजा केले तर त्यांचा पक्ष खूप छोटा आहे. शरद पवारांचे मोठेपण हे त्यामध्येच दडलेले आहे.
राजकारणात जे पवारसाहेबांचे कट्टर विरोधक आहेत, त्यांनाही शरद पवार यांच्या नेतृत्वाबद्दल आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल, क्षमतेबद्दल कोणालाही कधीही शंका नव्हती आणि नाही. महाराष्ट्रातला कप्पा न कप्पा, व्यक्ती आणि व्यक्ती, गट आणि तट, पक्ष आणि नेते यांची खडानखडा माहिती कोणाजवळ असेल, तर ती शरद पवार साहेबांच्या जवळ आहे. प्रकृती साथ देवो न देवो, सकाळी ७ वाजता दिवस सुरू करणार आणि रात्री १२ वाजता दिवस संपवणार. १६-१७ तास काम करणारे राजकारणी या देशात किती असतील माहीत नाही. पण, शरद पवार हे तसे राजकारणी आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. किंबहुना दुसऱ्या अर्थाने जे २४ तास राजकारणच करीत असतात, त्यात शरद पवार यांचाही नंबर लागतो. गेली ५० वर्षे ही उमेद त्यांनी टिकवलेली आहे आणि शरद पवार या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. बारामती परिसर त्यांनी ज्या पद्धतीने चौफेर विकासाने आघाडीवर नेला आहे, त्याला तोड नाही. त्यांचे विद्या प्रतिष्ठान, कृषी प्रतिष्ठान, त्यांचे महिलांचे हॉस्टेल एक नाही अनेक संस्था त्यांनी बारामतीत उभ्या केल्या आणि त्या अतिशय व्यवस्थितपणे चालवल्या. जबाबदारी वाटून द्यायची आणि विश्वास टाकून काम करून घ्यायचे, अशी एक विलक्षण हातोटी त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे त्यांनी अनेक माणसे घडवली, अनेक संस्था उभ्या केल्या आणि हे सर्व करीत असताना त्यांची भूमिका जे विषय माहीत नाहीत, ते विषय नीटपणे समजून घ्यायची तयारी असल्यामुळे ते नेहमी विद्यार्थ्यांच्या भूमिकेत राहताना त्यांना संकोच वाटला नाही. उत्तम शेती करणाऱ्याच्या शेतात जाऊन त्याने केलेल्या विविध प्रयोगांची माहिती घेण्यात त्यांना कधी संकोच वाटत नाही किंवा रघुनाथराव माशेलकर यांच्या सोबत बसून जगातल्या वैज्ञानिक आघाडीवर काय चालले आहे, हे जाणून घेण्यात त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही. त्यामुळे असे अनेक विलक्षण गुण असलेला हा नेता आहे. २७व्या वर्षी आमदार, ३२व्या वर्षी राज्यमंत्री, ३४व्या वर्षी कॅबिनेट मंत्री, ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री, ५१ व्या वर्षी संरक्षणमंत्री असा हा त्यांचा विलक्षण थक्क करणारा प्रवास आहे. आजही त्यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. थकवा नावाची गोष्ट त्यांना माहीत नाही. सकाळी ७ वाजता तयार होणारा त्यांच्या एवढा वक्तशीर नेता दुसरा नाही. राजकीय नेते जेव्हा उठून तयार होत असतात तेव्हा शरद पवारांचे चार-पाच तासांचे काम झालेले असते. अशी एक विलक्षण ऊर्जा शरद पवार यांच्याजवळ आहे.
*संजीव वेलणकर, पुणे*
*९४२२३०१७३३*
*संदर्भ : इंटरनेट*
*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा