Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १८ जानेवारी, २०२४

*वंचित बहुजन आघाडी;-- नवी ओळख, नवी आव्हान*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो.--9730 867 448*

            गेली साडेतीन दशके भारिप- बहुजन महासंघ वऱ्हाडच्या सीमा ओलांडून बाहेर जायला तयार नाही. इतर अठरापगड जातींना सोबत घेतल्याधिवाय सत्तेचा सोपान चढणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) 'वंचित बहुजन आघाडी' स्थापन ( VBA vanchit bahujan aghadi) करण्याचा निर्णय पाच वर्षांपूर्वी घेतला होता. तेंव्हा या नव्या ओळखीसह आंबेडकरांनी असदुद्दीन ओवैसी यांच्या 'एमआयएम'ला सोबत घेत 2019 ची लोकसभा लढवली होती. सोबतच जवळपास 100 छोटे पक्ष आणि सामाजिक संघटना या आघाडीत सहभागी झाल्या होत्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या लाखोंच्या 'रेकॉर्ड ब्रेक' सभा झाल्या होत्या. आंबेडकरांना राजकारणात यशाचा हाच उत्तम फॉर्म्युला असल्याचं लक्षात आलं अन त्यांनी वंचितच्या स्थापनेवर शिक्कामोर्तब केलं. 

'अकोला पॅटर्न'च्या सर्वव्यापी प्रयोगाची पुण्याई सोबत असतांनाही 'रिपब्लीकन' शब्दामूळे एकाच वर्गसमुहाचं नेतृत्व म्हणून मारला जाणारा शिक्का त्यांना नको होता. त्यांना 'बहूजन हृदयसम्राट' अशी नवी ओळख दृढ करायची होती. म्हणूनच सर्वव्यापी नेतृत्वाची गुरूकिल्ली ठरू पाहणारं 'वंचित बहूजन आघाडी' या राजकीय नावानं आंबेडकरांना भुरळ घातली असावी. त्यामूळेच आपली 'भारिप-बमसं' या जून्या नावाचा इतिहास कवटाळत न बसता आंबेडकरांनी 'वंचित'च्या माध्यमातून आपलं राजकीय 'भविष्य' सुधारण्याचा प्रयत्नांच एक पाऊल या माध्यमातून टाकलं होतं.

आंबेडकरांनी या निर्णयातून आपल्या राजकीय कक्षा, क्षितीजं रूंदावण्याचा प्रयत्न केला आहे. आंबेडकरांच्या नावामागे 'आंबेडकर' नावाचा ब्रँड, विचार अन वारसा असतांनाही त्यांना राजकारणानं सत्तेतील नेमक्या चाब्यांपासून कायम 'वंचित'च ठेवलं आहे. पाच वर्षांपूर्वीच्या या नव्या आघाडीमूळं हे 'वंचित'पण काहीसं दूर होऊन 'बहूजन हिताय, बहूजन सुखाय' अशी आंबेडकरांची या निर्णयामागची दुरदृष्टी होती असं मानलं जातं.


*वंचित बहूजन आघाडी : राजकीय यशापयाशाचा लेखाजोखा.*


*लोकसभा 2019' :*

वंचितची स्थापनाच 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झाली होती. अनेकांना प्रकाश आंबेडकरांचा हा निर्णय राजकीयदृष्ट्या आत्मघातकीपणाचा वाटत होता. त्यातही काँग्रेस-राष्ट्रवादी सोबतची जागावाटपाची बोलणी फिस्कटल्यानंतर तर 'वंचित'बद्दल शंका घेतल्या जावू लागल्यात. मात्र, यानंतर प्रकाश आंबेडकरांनी मागे वळून पाहिलंच नाही. यानंतर लोकसभा निवडणुकीत राज्यभरात वंचितच्या लाखोंच्या सभांनी अक्षरश: झंझावात निर्माण केला. लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सर्वच राजकीय जाणकार, प्रस्थापित राजकीय पक्षांचे सारेच अंदाज वंचितनं चुकवलेत. या नव्या आघाडीला फक्त छत्रपती संभाजीनगरची जागा इम्तियाज जलील यांच्या रूपानं मिळाली. मात्र, इतर सर्व मतदारसंघात वंचितला मिळालेल्या मतांनी काँग्रेेस राष्ट्रवादीचं पुर्णपणे पाणीपत झालं. काँग्रेसला लोकसभेची फक्त एक जागा मिळाली. तर राष्ट्रवादीला अमरावतीच्या समर्थन दिलेल्या नवनीत राणांसह पाच जागा मिळाल्यात. आंबेडकरांमूळे झालेल्या मतविभागणीमूळे भाजप-शिवसेना युतीला 2019 मध्ये राज्यात लोकसभेच्या 41 जागा मिळाल्या होत्या. यात भाजपला 23 तर तेंव्हाच्या एकसंघ शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. वंचितनं राज्यात लोकसभेत तब्बल 41 लाख 32 हजार 446 मतं घेतली होती. मात्र, प्रकाश आ़बेडकरांचा अकोला आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघात भाजपकडून दणदणीत पराभव झाला होता. 2019 मध्ये राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात दिड ते 32.47 इतकी मतं मिळालीत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या मतांची टक्केवारी ही 7.64 टक्के एव्हढी होती. 


*2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितला मतदारसंघनिहाय पडलेली मतं :*


1. छत्रपती संभाजीनगर - इम्तियाज जली - 389042

2. सांगली - गोपीचंद पडळकर - 300234

3. अकोला - प्रकाश आंबेडकर - 278848

4. हिंगोली - मोहन राठोड - 174051

5. सोलापूर - प्रकाश आंबेडकर - 170007

6. बुलढाणा - बळीराम शिरस्कर - 172627

7. नांदेड - डॉ.यशपाल भिंगे - 166196

8. परभणी - आलमगीर खान - 149946

9. हातकणंगले - अस्लम सय्यद - 123419

10. लातूर - राम गारकर - 112255

11. चंदपूर - राजेंद्र महाडोळे - 112079

12. गडचिरोली - डॉ. रमेशकुमार गजबे - 111468

13. नाशिक - पवन पवार - 109981

14. उस्मानाबाद - अर्जुन सलगर - 98579

15. यवतमाळ - प्रवीण पवार - 94228

16. बीड - प्रा.विष्णू जाधव - 92139

17. रावेर - नितीन कांडेलकर - 88365

18. जालना - डॉ.शरदचंद्र वानखेडे - 77198

19. मावळ - राजाराम पाटील - 75904

20. मुंबई उत्तर पूर्व -निहारिका खोंदले - 68239

21. कल्याण - संजय हेडाऊ - 65572

22. अमरावती - गुणवंत देवपारे - 65135

23. पुणे - अनिल जाधव - 64793

24. कोल्हापूर - डॉ.अरुणा माळी - 63439

25. शिर्डी - संजय सुखदान - 63287

26. मुं. द. मध्य - संजय भोसले - 63256

27. दिंडोरी - बापू केळु बर्डे - 58847

28. माढा - ऍड. विजयराव मोरे - 51532

29. भिवंडी - डॉ. अरुण सावंत - 51455

30. ठाणे - मल्लिकार्जुन पुजारी - 47432

31. भंडारा - के. एन. नान्हे - 45842

32. बारामती - नवनाथ पडळकर - 44134

33. सातारा - सहदेव ऐवळे - 40673

34. धुळे - नबी अहमद दुल्ला - 39449

35. शिरूर - राहुल ओव्हाळ - 38070

36. जळगाव - अंजली बाविस्कर - 37366

37. वर्धा - धनराज वंजारी - 36452

38. रामटेक - किरण पाटणकर - 36340

39. मुंबई उत्तर मध्य - अब्दुल रहमान - 33703

40. अहमदनगर - सुधाकर आव्हाड - 31807

41. रत्नागिरी - मारुती जोशी - 30882

42. मुंबई दक्षिण - डॉ. अनिल कुमार - 30348

43. नागपूर - सागर डबरासे - 26128

44. नंदुरबार - सुशील अंतुर्लॉकर - 25702

45. मुंबई उत्तर.पश्चिम - सुरेश शेट्टी - 23422

46. रायगड - सुमन कोळी - 23196

47. मुंबई उत्तर - सुनील थोरात - 15651

48. पालघर - सुरेश पाडावी - 13728

*2019 च्या विधानसभेत प्रकाश आंबेडकरांमूळे काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेपासून 'वंचित' :*

लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला बसला होता. वंचितनं 2019 मध्ये राज्यात विधानसभेच्या 236 जागा लढवल्या होत्या. राज्यातील 288 मतदारसंघापैकी 32 जागांवर वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पडले होते. तेंव्हा काँग्रेस राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले असले तरी ३२ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवार अगदी थोड्या फरकाने पराभूत झाले होते. लोकसभेपेक्षा वंचितचा मतांचा टक्का मात्र, विधानसभेत घसरला होता. 2019 विधानसभेत वंचितला एकूण 25 लाख 13 हजार 583 मतं मिळाली होती. ही टक्केवारी एकूण झालेल्या मतदानाच्या 4.58 टक्के इतकी होती. 

*'इंडिया आघाडी'तील प्रवेशापासून आंबेडकर अजूनही दुरच :*

गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे आंबेडकरांचा राज्यात 'महाविकास आघाडी' आणि देशपातळीवर 'इंडिया आघाडी'त प्रवेश कधी होणार?. आंबेडकर सध्या या दोन्ही आघाड्यांचा घटकपक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचा मित्रपक्ष. दोन्ही पक्षांनी 2023 मध्ये शिवशक्ती भिमशक्तीचा नारा देत नव्या राजकीय मैत्रीची घोषणा केली होती. उद्धव ठाकरेनी आंबेडकरांना या आघाडीत घेण्यासाठी अनेकदा जोरदार प्रयत्नही केलेत आता शरद पवारही या नव्या मैत्रीसाठी तयार झालेत. मात्र, काँग्रेसने अद्याप त्यांच्या हातात मैत्रीचा हात दिलेला नाही. वंचित राज्यात 'महाविकास आघाडी'चा घटक झाला तर याचे सध्याच्या राजकारणावर दुरोगामी परिणाम होणार आहेत. त्या प्रवेशावर या महिन्याच्या शेवटी निर्णय होण्याची शक्यता आहे. 

*आंबेडकरांना नेत्यांच्या फुटीचा 'शाप' :*

प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहूजन आघाडी म्हणजे एकचालकानुवर्ती पक्ष. सध्या पक्षाला प्रदेशाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी, राजकीय व्यवहार समिती अशा सर्व व्यवस्था आहेत. मात्र, हे सारं असतांना पक्षाचं हायकमांड, पक्षश्रेष्ठी, सुप्रिमो म्हणजे फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरच. मात्र, या पक्षात मोठे झालेल्या नेत्यांचं पुढे बाळासाहेबांशीच पटेनासं होतं. अन यातील बरेच जणांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात येतो. काहींच्या नशिबी राजकीय विजनवास येतो. तर काही इतर पक्षांत प्रवेश करतात अगदी अकोल्यात भारिपचे संस्थापक सदस्य असणार्या बी.आर. सिरसाटांपासून तर अगदी अलिकडच्या श्रावण इंगळे, बाबुराव पोटभरे, रामदास बोडखे, हरिदास भदे, बळीराम सिरस्कार या नेत्यांपर्यंत ही यादी वाढत जाते.

भारिप-बमसं सोडणाऱ्यांमध्ये पक्षाच्या संस्थापक आणि पहिल्या फळीतल्या मोठ्या नेत्यांचा समावेश आहेय. भारिपमध्ये आपला बहूजन महासंघ विलीन करणारे माजी मंत्री मखराम पवार, पक्षाचे माजी अध्यक्ष राजा ढाले, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, माजी राज्यमंत्री रामदास बोडखे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रावण इंगळे, सुर्यभान ढोमणे, माजी महापौर जोत्स्ना गवई, नाना श्यामकुळे, डॉ. मिलिंद माने, बाबुराव पोटभरे, हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांनी आंबेडकरांच्या नेतृत्वावर टिका करीत पक्ष सोडलेला आहे.

2024 मध्ये सत्तेत जाण्याचा नारा प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. लोकशाहीत कोणत्याही प्रयोगासोबतच महत्व आहे ते आकड्यांना. प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय कारकिर्दीत फक्त काँग्रेससोबतचा सत्तेत सहभागाचा 1999 ते 2004 चा अपवाद सोडला तर कायम सत्तेच्या प्रवाहाबाहेर रहावं लागलं अकोल्यात जिल्हा परिषद आणि काही पंचायत समित्यांच्य अपवाद सोडला तर येथेही पक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहिला आहे. त्यामूळे प्रकाश आ़ंबेडकरांना आपलं राजकारण आणि चळवळ पुढे नेण्याकरिता "राज्यकर्ती' जमात व्हा!" हा डॉ. बाबासाहेबांचा मंत्र अंगीकारावा लागणार आहे. सध्याच्या राजकारणात 'सत्ते'त जाण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर कोणते प्रयत्न करतात? यासोबतच या प्रयत्नांना मतदार यश देतात का? याचं उत्तर 2024 हे वर्ष देणार. त्यामूळे घोडामैदान जवळच आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी....


        *साभार*

*माहिती.सेवा.ग्रूप.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा