ॲड.शीतल चव्हाण
मो.9921 657 346
लोक प्रार्थनेत स्वस्तात शिक्षण, रोजगार, स्वस्त दवाखाना, कर्जमुक्ती, शेतमालाला भाव मागू लागले तर तो प्राणप्रतिष्ठापना करणाऱ्याचा पराभव नव्हे काय?
भारतातील सर्व प्रकारचे दारिद्र्य संपवल्याशिवाय भारताला खऱ्या अर्थाने अध्यात्मिक करता येणार नाही. दरिद्री असणारा माणूस देवस्थान, प्रार्थनास्थळे या ठिकाणी जावून रोजी-रोटी, रोजगार, कमी खर्चातला दवाखाना, कर्जमुक्ती, कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला भाव मिळावा यासाठी याचना करीत असेल तर त्याची ती मागणी खऱ्या अर्थाने इथल्या व्यवस्थेकडे आहे. इथली व्यवस्था त्याला दरिद्रि बनवण्यास कारणीभूत असल्याने, त्याचा आवाज ऐकण्यास आणि त्याच्या अडचणी सोडवण्यास असफल ठरत असल्याने तो देवस्थाने, प्रार्थानास्थळे गाठतो. व्यवस्थेच्या असफलतेतून निर्माण झालेली सामान्य माणसाची हतबलता जर त्याला देवस्थानांकडे, प्रार्थनास्थळांकडे जायला मजबूर करीत असेल तर या प्रकाराला 'अध्यात्मिकता' म्हणता येईल काय?
सत्याचा शोध घेण्यासाठी प्रचंड मोठ्या वैभवाला लाथ मारुन घराबाहेर पडलेल्यांना भारतात अध्यात्मिक समजण्याचा इतिहास आहे. ऐहिक जीवनाचा आनंद घेवून, त्याची सुंदरता अनुभवून त्याबद्दल कृतार्थ झाल्याची भावना प्रार्थनेतून प्रकट झाली तर ती विधात्याबद्दलची निखळ, निकोप आणि निरपेक्ष प्रार्थना म्हणजे खरा अध्यात्म होय.
पण वास्तवाकडे पाठ फिरवून, व्यवस्थेने निर्माण केलेल्या समस्यांची सोडवणूक व्यवस्था करीत नसल्याने हतबल होवून देवस्थानांचे, प्रार्थनास्थळांचे उंबरठे झिजवले जात असतील तर देवस्थाने, प्रार्थनास्थळे ही व्यवस्थेचे अपयश झाकणारी, व्यवस्थेने निर्माण केलेल्या अस्वस्थतेला शमवणारी स्थळे होत नाहीत काय?
देवाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना सत्ताधाऱ्यांच्या हस्ते होईलही पण त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना झालेल्या देवासमोर जर भाविक नोकरी, कर्जमुक्ती, स्वस्तात दवाखाना, कर्जमुक्ती, शेतमालाला भाव, स्वस्तात शिक्षण यासाठी याचना करु लागले तर ते भाविक देवस्थानांत देवांची प्रार्थना करीत नसून ज्या हातांनी त्या देवाची प्राणप्रतिष्ठापना झाली त्या हातांचा व्यवस्थेतील प्रश्न सोडवू न शकल्याचा, त्या हातांच्या अपयशाचा उद्घोष करीत असतात, हे नीट समजून घ्यायला हवे. धर्म, देव, देवस्थाने, प्रार्थनास्थळे ही अन्याय पचवायला लावणारी, व्यवस्थेने निर्माण केलेली अस्वस्थता शमवणारी आणि भ्रामक सुखाच्या गुंगीत ठेवणारी शोषकांच्या हातातील शस्त्रे ठरतात ती याच अर्थाने. खरी धार्मिकता, खरा अध्यात्म आणि खरी प्रार्थना जन्माला घालायची असेल तर माणसाकडून माणसाचे होणारे शोषण, माणसाने माणसांपुढे निर्माण केलेले जगण्या-मरण्याचे प्रश्न संपवून जीवनाबद्दलची, जगण्याच्या नितांत सुंदरतेबद्दलची कृतार्थ भावना निर्माण करावी लागेल. धर्माबद्दलचा उन्माद, उथळ अभिमान, धर्माचा सत्तेच्या राजकारणासाठीचा उपयोग आणि धर्माआडून वास्तवाकडे पाठ फिरवण्याची वृत्ती ही माणसाला धार्मिक नव्हे तर अधार्मिक, असंवेदनशील आणि क्रूर बनवत राहील.
*ॲड. शीतल शामराव चव्हाण*
(*मो. 9921657346*)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा