टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
मुंबई - 05 जानेवारी : आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी आझाद मैदानात बुधवारपासून अंगणवाडी सेविकांचे ‘गुलाबी वादळ’ धडकल्यानंतर गुरुवारी दुसऱ्या दिवशीही शिंदे सरकारने आश्वासनावर बोळवण केल्याने आंदोलकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे आठवडाभरात लेखी आश्वासन द्या अन्यथा पुन्हा आझाद मैदानासह राज्यभरात जोरदार आंदोलन करण्यात येईल, असा अल्टीमेटम महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने राज्य सरकारला दिला आहे. आझाद मैदानावरील ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असले तरी राज्यभर संप आणि तालुका, जिल्हा पातळीवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले आहे.
आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी कृती समितीसोबत चर्चा केली. यावेळी केवळ आश्वासन देत पगार वाढवण्यासही नकार दिल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर दुसऱ्या दिवशीही शिष्टमंडळाने सचिव महिला बालविकास सचिवांसोबत भेट घेऊन चर्चा केली. मात्र वेतनाबाबत कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही. यानंतर आझाद मैदानात मंत्री महाजन यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. यानंतर कृती समितीने बैठक घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे.
*साभार*
*कोकण न्यूज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा