टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
केवळ २०५ किरकोळ पदांची जाहिरात काढून MPSC कडून विद्यार्थ्यांची क्रूर थट्टा.
MPSC च्या परीक्षा पद्धतीविरोधात आंदोलन केल्याचा बदला घेता का?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ परिक्षेत पास करण्यासाठी पैशांची मागणी करणा-या बायनरी सॉफ्टवेअर कंपनीवर तात्काळ कारवाई करा.
मुंबई
महाराष्ट्र लोकसेवा आयोग व शिंदे-पवार-फडणवीस सरकारने स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालवला आहे. MPSC ने नुकतीच केवळ २०५ पदांची जाहिरात प्रसिद्ध केली असून या जाहिरातीत उपजिल्हाधिकारी, पोलीस उप-अधिक्षक, तहसीलदार सारख्या प्रशासनातील महत्वाची पदे नाहीत. MPSC साठी सर्वसामान्य गोरगरीब व ग्रामीण भागातील ३२ लाख विद्यार्थी तयारी करत आहेत, त्यांची घोर थट्टा आहे. मुख्य परिक्षेपर्यंत महत्वाच्या पदांची जाहिरात प्रसिद्ध करावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल व त्याची सर्व जबाबदारी सरकारची असेल, असा खणखणीत इशारा प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.
गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अतुल लोंढे म्हणाले की, शिंदे-फडणवीस-पवार सरकारने ७५ हजार पदांचा लॉलीपॉप दाखवला आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मात्र थट्टा चालवली आहे. एमपीएससीची नवीन परिक्षा पद्धत दोन वर्षांनी लागू करावी यासाठी विद्यार्थ्यांनी मध्यंतरी मोठे आंदोलन केले होते, एमपीएससी व भाजपा सरकार या आंदोलनाचा बदला घेत आहे का? भाजपा सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? एमपीएससीने सर्व पदांची एकच परीक्षा घेण्याची भूमिकाही घेतली होती, अशा कल्पना कोणाच्या 'सुपीक' डोक्यातून येतात? सरकारने आधी कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याची तयारी केली होती. जळगाव जिल्ह्यात तर तहसीलदार पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात दिला होती. आता तर एका विशिष्ट विचारसरणीच्या मुलांना थेट सह सचिव पदांवर थेट नियुक्ती केली जात आहे. UPSC मधून नियुक्ती झाल्यानंतर १६ वर्षांच्या सेवेनंतर या पदावर वर्षी लागते पण आता काही मुलांसाठी थेट भरती केली जात आहे. सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलांना प्रशासनात संधी डावलण्याचे हे षडयंत्र आहे.
राज्यात तब्बल २.५ लाख पदे रिक्त आहेत पण सरकार या पदांची भरती करत नाही. ७५ हजार पदांची भरती करण्याचे लॉलीपॉप दिला पण अद्याप भरती केली नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रशासकीय सेवेसाठी पद भरती केली जाते त्यासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची अपेक्षा भंग केला जात असून शिंदे-फडणवीस-पवार सरकारने विद्यार्थ्यांची क्रूर थट्टा केली आहे. सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करून मुलांना न्याय द्यावा असेही लोंढे म्हणाले.
पास होण्यासाठी विद्यापीठात पैशांचा बाजार !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांना परिक्षेत पास होण्यासाठी पैसे द्यावे लागतात. परीक्षा दिल्यानंतर निकालात विद्यार्थ्यांना १-२-४-८ असे मार्क्स मिळतात व फेरतपासणीसाठी पैसे भरल्यानंतर हेच मार्क्स ४५-५०-५५ असे पडतात, अशी माहिती विद्यार्थांनी आमच्याशी संपर्क साधून दिली आहे व यासंदर्भातील पुरावेही दिले आहेत. Binary software company ही खाजगी कंपनी या विद्यापीठाच्या परिक्षांच्या पेपर तपासणीचे काम करते, अशा भ्रष्ट कंपनीवर कारवाई करून या कंपनीला काळ्या यादीत टाकले पाहिजे. एका विद्यार्थ्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केल्याचे विद्यार्थ्याच्या पालकांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे. गंभीर बाब म्हणजे हे पालक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यास गेले असता ५० हजार रुपये आणून ते द्या व पैसे स्विकारताना कारवाई करु असा अजब सल्ला दिला गेला. गरीब पालक ५० हजार कुठून आणणार? असे प्रकार थांबले पाहिजेत. पास होण्यासाठी पैसे द्यावे लागणे हे अत्यंत गंभीर आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच राज्यपाल महोदयांनी या प्रकरणात लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.
*साभार*
*कोकण न्यूज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा