*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा देशातला मानाचा चित्रपट पुरस्कार मानला जातो. या पुरस्कारांच्या श्रेणीतला एक पुरस्कार इंदिरा गांधी यांच्या नावे तर एक पुरस्कार नर्गिस दत्त यांच्या नावे होता. मात्र पुरस्कारांच्या श्रेणीत बदल करण्यात आला असून इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांची नावं या श्रेणीतून वगळण्यात आली आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ च्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदलांमध्ये पुरस्कारांची रक्कम वाढवण्यात आली आहे. तर श्रेणींमध्ये बदल करण्यात आले आहेत. मोदी सरकारने नेमलेल्या समितीने कोरोना काळात ही चर्चा केली होती आणि एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे.
नावं का वगळली? याचं कारण समोर नाही
सरकारने नेमलेल्या समितीने केलेल्या बदलांनुसार, आता सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्काराचा उल्लेख केवळ दिग्दर्शकासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट म्हणून करण्यात आला आहे. तर राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मसाठी नर्गिस दत्त पुरस्काराचे नाव बदलून राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणाला प्रोत्साहन देणारी सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म असे ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय, सामाजिक मूल्य पर्यावरण संवर्धनासाठी संदेश देणाऱ्या या चित्रपटांना या श्रेणींत विलीन करण्यात येणार आहे. दिग्दर्शकाला सुवर्ण कमळ आणि ३ लाख रुपये देऊन सन्मानित केले जाणार आहे. इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांची नावं वगळण्याबाबत नेमके कारण काय याबाबत कोणतेही स्पष्टीकरण समोर आले नाही.
समितीचे सदस्य कोण?
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी खात्याच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर होत्या. तर, निर्माते प्रियदर्शन, विपुल शाह, सीबीएफसीचे प्रमुख प्रसून जोशी, सिनेमॅटोग्राफर एस. नल्लामुथू आणि माहिती प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव पृथूल कुमार आदींचा समावेश होता. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
पुरस्काराच्या रोख रक्कमेत वाढ
दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी असणारी रोख रक्कम १० लाखांवरून १५ लाख रुपये करण्यात आली आहे. याशिवाय विविध श्रेणीतील सुवर्ण कमळ पुरस्कारांची बक्षीस रक्कम तीन लाख रुपये आणि रौप्य कमळ विजेत्यांसाठी दोन लाख रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी वेगवेगळ्या श्रेणीनुसार पुरस्कारांची रक्कम वेगवेगळी होती.
*सौजन्य*
*कोकण न्यूज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा