*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
"वृत्तपत्रांचे रकाने वायद्यांनी भरत होते!
अन् किड्यामुंग्यांप्रमाणे लोक साधे मरत होते!!"
सुरेश भटांनी देशातील सामान्य माणसाची व्यथा या नेमक्या शब्दांत मांडली आहे. आजची परिस्थिती हुबेहूब तशीच आहे.
यंदा सरसासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने मार्च महिन्यातच उष्णतेचा पारा चढला आहे. भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. जनावरांच्या चारापाण्याची चणचण आहे. दिवसा प्रचंड गरमी, रात्री कडाक्याची थंडी, मध्येच ढगाळ वातावरण, काही ठिकाणी हलका पाऊस अशा निसर्गाच्या लहरी आणि विसंगत आचरणाने यंदा ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी अशा आजारांत प्रचंड वाढ झालेली आहे. एरवी फक्त ऋतुबदलालाच आजारी पडणारे आता दर महिन्याला विविध कारणांनी विविध आजारांचा सामना करीत आहेत. सरकारी दवाखाने तर सोडाच खाजगी, महागडे दवाखानेही रुग्णांनी खचाखच भरलेले आढळत आहेत.
शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा आदी मालाचा भाव सरकारने पाडल्याने शेतकरी कमालीच्या आर्थिक संकटाला तोंड देत असतानाच त्याला आरोग्यविषयक समस्यांनी घेरलेले आहे. खरीपाच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही आणि पाऊस नसल्याने रब्बीच्या पेरण्याच झाल्या नाहीत किंवा झाल्या तरी पीक आले नाही. वाढती महागाई, शिक्षण आणि आरोग्यावर वाढलेला प्रचंड खर्च, बी-बियाणे-खत- फवारणीसाठीची किटकनाशक औषधे यांच्या भरमसाठ वाढलेल्या किमती, बेरोजगारी, वीज व पाण्याचा तुटवडा अशा अनंत संकटांना तोंड देत एकीकडे सामान्य माणूस आपल्या रोजमर्राच्या जगण्याचे हिशेब घालत असताना दुसरीकडे मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नातील १५०० कोटी खर्चाच्या, या लग्नात कोट्यावधी देवून रिहानाला नाचवल्याच्या, देशाच्या सत्तेतल्या पक्षाने 'इलेक्टोरल बॉंड'च्या माध्यमातून हजारो कोटींचा पार्टी फंड मिळवल्याच्या, महाविकास आघाडी व महायुतीत जागा वाटपावरुन चाललेल्या बैठका व हेव्यादाव्यांच्या, राजकीय नेत्यांतील टिका व प्रतिटीकेच्या, कोण कुठे गेले व कोण कुठे राहिले याच्या बातम्या प्रमुख माध्यमांतून सातत्याने धडकत आहेत.
या देशात राजकारणावर सर्वाधिक चर्चा होते. पण ज्या राजकीय प्रक्रियेतूनच सर्वसामान्य माणसाचे जीवन सुकर केले जावू शकते त्या प्रक्रियेत सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांऐवजी भलत्याच चर्चांना उधान आलेले असते. सगळ्या राजकीय चर्चा या सत्ता, संपत्ती, निवडणूकांतील हार-जीत, नेत्यांच्या टीका-प्रतिटीका या विषयांभोवतीच केंद्रीत झालेल्या आहेत. महागाई, शेतमालाला भाव, मोफत व दर्जेदार शिक्षण, माफक दरात दर्जेदार आरोग्य सुविधा, रोजगार, मुबलक वीज आणि पाणीपुरवठा, चांगले शेतरस्ते, चांगले गावरस्ते इत्यादी विषय केवळ चघळायला हाताळले जातात. या विषयांवर स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांत सभा, भाषणांमधून केवळ शाब्दिक रणसंग्राम झाला; पण हे जगण्या-मरण्याचे प्रश्न अजूनही तसेच प्रलंबित आहेत.
संघ-भाजपाच्या वाढत्या एकाधिकारशाहीबद्दल, या काळात भांडवलशाहीने घातलेल्या धुमाकूळाबद्दल, संविधानाची मोडतोड होत असल्याबद्दल, शेती क्षेत्राची राखरांगोळी होत असल्याबद्दल, वाढत्या जातीय-धार्मिक असहिष्णूतेबद्दल पुरोगामी, चळवळे, डावे, आंबेडकरवादी लिहत, बोलत आणि भांडत आहेत. यापूर्वी अनेक वर्ष सत्तेत राहिलेले विरोधक मात्र विरोधकाच्या भूमिकेत ठामपणे उभे राहून जनतेच्या मुद्यांवर लढण्याऐवजी सोयीने पक्षांतर करीत आहेत. जे विरोधी पक्षात उरले आहेत त्यातलेही बोटावर मोजण्याएवढेच जनतेच्या मुद्द्यांवर आक्रमक आहेत. बाकीचे नेते सत्तेतल्यांना लोकांनी कंटाळावे, सत्तेतल्यांच्या विरोधात चळवळीतल्यांनी जनमत तयार करीत रहावे आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून पुन्हा आम्हाला सत्ता मिळावी अशा सुस्तीत आहेत.
शेतकरी देशोधडीस लागलेला असताना, महागाई, बेरोजगारी, ग्रामीण भागाला वीज व पाण्याचा तुटवडा सतावत असताना ज्या आक्रमकपणे रस्त्यावर उतरुन आंदोलने व्हायला हवीत तशी होताना दिसत नाहीयेत.
सर्वसामान्य माणसाला दुष्काळाच्या झळा होरपळून काढत असतानाच्या काळात देशाच्या सर्वोच्च निवडणूकांची रणधुमाळी रंगली आहे. आता आचारसंहिता लागल्याने आचारसंहितेचे कारण पुढे करुन दुष्काळी उपाययोजना दुर्लक्षिल्या जातील. शेतकऱ्यांची पोरं आपल्या बापांचे प्रश्न विसरुन माझा नेता भारी, माझा पक्ष भारी या चर्चेत गुरफटला जाईल. घोषणा, झेंडे, गुलाल, मटण-दारु, सभा, भाषणे, गाड्या-घोड्यांचे ताफे, मतांचे गणित, बुथचे नियोजन या सगळ्या वातावरणात दुष्काळ आणि दुष्काळात होरपळणारा सामान्य माणूस दुर्लक्षिला जाईल.
सामान्य माणसाला दुष्काळाच्या झळा होरपळत असताना काहींना जाणवत असलेल्या सत्तेच्या प्रसुती कळाच चर्चेच्या केंद्रस्थानी असतील.
उष्णतेने होत असलेली तगमग, डोक्यात जगण्याचे अनंत प्रश्न, समोर दिसणारे अंधकारमय भविष्य, वीजेचा लपंडाव, पाण्यासाठीच्या लांबच लांब रांगा, उष्माघाताने जाणारे प्राण आणि त्याने मोडणारी कुटुंबं अशा सगळ्या वातावरणात देशाचा मतदार राजा लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सहात कुठल्या मानसिकतेने सामील होईल याचा विचार ना सत्ताधाऱ्यांना आहे, ना विरोधकांना.
"भेटती सारे पुढारी पाच वर्षांनी!
जाहली वेश्या कुमारी पाच वर्षांनी!
घाबरा झाला बिचारा जीव प्राण्यांचा
तेच हे आले शिकारी पाच वर्षांनी!"
हे सुरेश भटांनी त्यांच्या हजलेतून मांडलेले वास्तव आजही तसेच आहे.
सत्तेत सत्तेतले येतील किंवा आज विरोधी बाकावर बसलेले येतील. पण निवडणूक निकालाने सर्वसामान्य माणसाचे जगणे बदलणार आहे काय? त्याचे वर्षानुवर्षांचे जगण्या-मरण्याचे प्रश्न सुटणार आहेत काय? संघ-भाजपाने देश बेचिराख केला म्हणून त्यांना जरुर सत्तेतून दूर फेकू पण या सत्तांतराने सामान्य माणसाच्या जगण्यात परिवर्तन घडणार आहे काय?
© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो.9921657346)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा