*टाइम्स 45 न्युज मराठी
*मो. 9730 867 448
*वरवर दिसणाऱ्या, नकट्या, अभद्र शांततेत जी अस्वस्थता धुमसत आहे, ती कोणते वळण घेईल याचा नेम नाही.*
आपल्या भागात शेती किफायतशीर नसल्याने, उद्योगधंदे नसल्याने वर्षाला शेकडो, हजारो तरुण गाव, घर-दार, आई-वडील सोडून शहरांमध्ये काम करायला जातात. तिथे शहरात महिना दहा-पंधरा, वीस-पंचवीस हजाराच्या पगारावर कसेबसे जगतात. लोकल्स, बेस्ट किंवा पीएमटीच्या बसेसने लटकून, चेंगराचेंगरीत रोजचा प्रवास करतात. अंगण नसलेल्या छोट्या-छोट्या फ्लॅट्समध्ये म्हणजेच हवेत बांधलेल्या सिमेंटच्या झोपड्यांमध्ये भाड्याने किंवा लाखोंचे कर्ज, आयुष्यभर ई.एम.आयची डोक्यावर टांगती तलवार ठेवून घेत फ्लॅट्स विकत घेवून राहतात. दिवाळीदरम्यान गावाकडे जाण्यासाठी आणि शहराकडे परतण्यासाठी या लोकांचे थवेच्या थवे रेल्वे, बस, ट्रॅव्हल्स स्थानकांजवळ हातात चंडूगबाळ, लेकरंबाळं घेवून किमान गाडीत उभं रहाण्याएवढी तरी जागा मिळेल या आशेने ताटकळत उभे असतात. कोंबड्या भराव्यात तशी ही माणसं गाड्यांमध्ये कोंबली जातात.
पुण्यातील सदाशिव पेठ आणि आसपासच्या परिसरात आपल्या भागातील कष्टकऱ्यांची पोरं अधिकारी होण्याची स्वप्नं घेवून या भागात असलेल्या महागड्या 'क्लासेस'साठी येतात. इथे 'कॉट-बेसिस'वर राहतात. मेसमधले पांचट जेवण करुन, गाड्यावरील वडापाव, कच्छीदाबेली, भेळ, भूर्जीपाव, चायनीज पुलाव खावून गुजराण करतात. या पोरांचे बाप पोरगा अधिकारी होईल या आशेने कर्ज काढतात. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर शे-दोनशे जागांची जाहिरात निघते आणि या शे-दोनशे जागेसाठी लाखो विद्यार्थी परिक्षेला बसतात. शे-दोनशेंची निवड अनेक कसोट्यांतून जावून होते बाकीचे लाखो तरुण निराश, हताश होवून गावाकडे परत जातात.
तिकडे गावाकडे काय फार सुजलाम सुफलाम् नसते. तिथे वीजपुरवठा सतत खंडित होत असतो. पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याची आबाळ असते. रात्री-बेरात्री जागून शेताला पाणी द्यावे लागते. कधी कोरडा दुष्काळ असतो, कधी ओला दुष्काळ असतो तर कधी गारपीट, वाऱ्यावावदळीने पिकांचे नुकसान होत असते. एखाद्या वर्षी पीक चांगले झालेच तर सरकार परक्या देशातून अन्नधान्य, तेलबियांची आयात करुन शेतमालाचा भाव पाडते. अशा भयाण वास्तवात तग धरुन रहायला अधिकारी होण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी घेतलेले शिक्षण आणि ज्ञान कुचकामी ठरते. मग कुठल्यातरी नेत्याची किंवा त्याच्या पोराची हुजरेगिरी करुन त्यांच्या संस्था, कारखाना, बॅंक याठिकाणी नोकरी मिळवावी लागते. गुत्तेदाऱ्या किंवा हाफ्ते गोळा करण्याचे काम पदरात पाडून घ्यावे लागते. त्या बदल्यात पडेल ते काम करण्यासह नेते जे म्हणतील तिच पूर्वदिशा, 'तुम्ही बांधाल ते तोरण, तुम्ही ठरवाल ते धोरण' असं म्हणत मेंदू गहाण ठेवण्याची पक्की तयारी करावी लागते. आपल्या नेत्याची भूमिका, त्यांचे पक्षांतर, त्यांची वागणूक, त्यांचे विचार नाही जरी पटले तरी पोटप्रपंच भागवण्यासाठी त्यांची मक्तेदारी असलेल्या शिक्षणसंस्था, कारखाने, बॅंका, गुत्तेदाऱ्या किंवा चांगले-वाईट धंदे यांवरच अवलंबून रहावे लागत असल्याने आपल्या अंतरात्म्याचा आवाज दाबून त्यांच्या 'हो मध्ये हो', 'ना मध्ये ना' मिसळावी लागते.
काहींकडे भांडवल असेल तर छोटेमोठे व्यवसाय करतात. ज्यांच्याकडे नसते ते पतसंस्था, खाजगी सावकार यांच्याकडून अव्वाच्या सव्वा व्याज देवून कर्ज घेतात आणि व्यापार-व्यवसाय थाटतात. ज्यांना यापैकी काहीच जमत नाही त्यांना रेशनचे स्वस्ताचे अन्नधान्य आहेच. ते खावे, हाताला मिळेल ते काम करावे. इच्छा, आकांक्षांची राखरांगोळी झाल्याने आलेली निराशा शमवायला सुपाऱ्या, गुटखा, बिडी, सिगारेट, गांजा, देशी-विदेशी किंवा हाथभट्टीची दारु असतेच. या सगळ्यातही तग धरुन रहायला नाही जमले, संवेदनशीलतेने टोक गाठत मनाचे दुखरे कोपरे तिव्रतेने जागवले तर गळफास घ्यायला दोरखंड आहे, तुरीवर फवारायचे औषध आहे, ते घेतले की सगळाच खेळ खल्लास!
आपला भाग दुष्काळ, नापिकी, वीज-पाण्याचा तुटवडा, उद्योगधंद्यांचा अभाव, पायाभूत सुविधांचा अभाव, शहरी-निमशहरी भागात महिलांसाठी मुबलक शौचालयांचा अभाव, मुबलक आणि सोप्प्या वित्तपुरवठ्याचा अभाव, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, दर्जेदार शिक्षणाचा अभाव, उत्तम आरोग्य सुविधांचा अभाव अशा अनेक समस्यांनी बेचिराख झालेला असला तसेच आपल्या भागातून कामधंद्यासाठी शहरांत स्थलांतरित झालेल्या अनेकांचे जीवनही निरस, कोरडे ठक्क झालेले असले तरी आपल्या भागातील नेत्यांना, मलिदा खायला मिळणाऱ्या अधिकाऱ्यांना त्याची काहीच लाज वाटत नाही. उलट त्यांची ऐट आणि मिजास दिवसेंदिवस वाढतोच आहे. नेते आणि उच्च अधिकारी मिलीभगत करुन स्थानिक विकास निधीतून अधिकाधिक प्रमाणात टक्केवाऱ्या उकळतात, दोन नंबरचे धंदे चालवायला अभय देवून हाफ्ते उकळतात, गैरमार्गाने जमवलेला हा पैसा पुन्हा इतर उद्योगधंद्यांत, सोनारीच्या धंद्यात, व्याजीबट्टीत गुंतवून किंवा इतर व्यवसायात भागीदाऱ्या करुन वाढवत राहतात. संस्था व कारखाने यात मक्तेदारी असलेले नेते शिक्षणसंस्थांमध्ये नोकरी व ॲडमिशन्स देण्यासाठी लाखोंचे डोनेशन्स घेवून प्रचंड पैसा कमावतात. साखर कारखान्यांमधले भंगारही सोडत नाहीत, त्याठिकाणीही भ्रष्टाचार करुन प्रचंड पैसे कमावतात. अनेकांना गंडवून बेकायदेशीरपणे कमावलेला हा पैसा पुणे, मुंबई, अजून कुठे-कुठे बंगले, फ्लॅट्स, फार्म हाउसेस, शेती, जागा, प्लॉटिंग, सोने-चांदी-हिरे घेवून गुंतवतात. वर्षभर विविध निमित्ताने प्रचंड बॅनरबाजी करुन स्वत:ची व स्वत:च्या तोंडचाटक्या कार्यकर्त्यांची थोबाडं गाव, शहर, तालुकाभर मिरवतात. आपल्या जन्माला येण्याची घटना जणू अद्भुत, ऐतिहासिक अशी मोठी घटना असल्याच्या अविर्भावात आपलेच वाढदिवस जनतेला लुटून मिळवलेल्या पैशांतून मोठमोठे इव्हेंट्स, फटाक्यांची आतशबाजी, बॅनरबाजी करुन जल्लोषात साजरे करतात.
चुकीच्या मार्गांनी मिळवलेली माया वाढवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी सोयीनुसार पक्षांतर करतात, स्वत:च्या पक्षाशी पक्षात राहूनही गद्दारी करतात, दुसऱ्या पक्षातील उमेदवाराला पेट्या घेवून मदत करतात, पक्षातील स्वत:चे महत्व टिकावे यासाठी स्वत:च्याच पक्षातील उमेदवारालाही काड्या करुन पाडतात. कार्यकर्त्यांना चिरीमिरीवर वापरुन घेतात. जनतेला विकासाची खोटारडी आश्वासने देतात. कार्यकर्त्यांचा वापरुन चोथा झाला की त्याला वाऱ्यावर सोडून देतात. पुन्हा नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना वापरायला ठेवतात. खऱ्या, चांगल्या माणसांना अनुल्लेखाने मारतात, वाळीत टाकतात, वेडा किंवा अव्यावहारिक ठरवतात, बदनामी करतात, कार्यकर्ते अंगावर सोडून दाबू पाहतात.
आपल्या भागाची पुरती वाट लागलेली असताना. आपल्या भागातील माणसांची चांगल्या जीवनमानाची स्वप्नं भंग होवून त्यांची मनं मेलेली, आशा दुभंगलेली आणि मेंदू गोठलेली असताना नेते निर्लज्जपणे, निर्धोकपणे त्यांचे सत्तेचे, मत्तेचे राजकारण रेटत राहतात. वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या ते हे करीत राहतात.
या सगळ्याबद्दल लोकांमधून चीड, संताप, उद्रेक, कमालीची अस्वस्थता निर्माण व्हायला हवी. लोकांनी शहाणे, सजग, संघटीत होवून आपल्या न्याय्य-हक्कांसाठी लढायला हवे, राज्यकर्त्यांना धारेवर धरायला हवे. पण ज्यांची मने मेली आहेत, आशा संपल्या आहेत, मेंदू गोठले आहेत ते काय करतील? ते कसेतरी आलेले दिवस ढकलत आहेत, आहे त्या जीवनातही आनंद शोधण्याची केविलवाणी धडपड करीत आहेत, सगळे दिसत असूनही काही दिसत नसल्याचा, कळत असूनही कळत नसल्याचा आव आणून संयम धरत आहेत, शांत राहत आहेत.
नेत्यांचा हा कोडगेपणा आणि लोकांमधली नकटी, अभद्र शांतता हे काही चांगल्या समाजाचे लक्षण नाही. या शांततेच्या पोटात जो उद्रेक दडला आहे, तो भविष्यात कोणते रुप धारण करेल, कोणती दिशा घेईल हे सांगता येत नाही.
हा संयमाचा बांध फुटण्याआधी, नेते-उच्चाधिकाऱ्यांनी सत्ता व मत्ता मिळवण्यासाठी मांडलेला नंगानाच उध्वस्त करायला जनता आक्रमक होवून कायदा हातात घेण्याआधी, सगळेच संपवून टाकायला रस्त्यावर येण्याआधी ही परिस्थिती बदलायला हवी. नाहीतर आमच्या पुढच्या पिढ्या काय करतील याचा काहीच नेम नाही. कसलाच अंदाज, कसलाच मोजमाप नाही. विषमतेने दुभंगलेल्या, शोषणाचे चित्कार दबलेल्या, लूटेचा हाहाकार माजलेल्या समाजाच्या पोटात परिवर्तनाच्या शक्यतेसह अराजकाची नांदीही दडलेली असते. परिवर्तनाच्या दिशा आखत असताना अराजकाच्या नांदीचा धोकाही वेळेत ओळखावा लागतो. तुर्तास एवढेच.
© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)
(उमरगा-लोहारा, जि. धाराशिव)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा