Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १ मार्च, २०२४

*सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील बहुजन समाजाचे श्रेष्ठ हितकर्ते ---डॉ. यशवंत पाटणे यांचे प्रतिपादन.*

 


*अकलुज ----प्रतिनिधी*

*केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्युज मराठी

             सहकार ही पक्षीय चळवळ नसून ती लोकशाही मूल्यांची चळवळ असते.लोककल्याण हे या चळवळीचे प्राणतत्व असते.हे ओळखून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी शिक्षण,शेती आणि सहकार क्षेत्राच्या समृद्धीसाठी बहुमोल योगदान दिले.ते बहुजन समाजाचे श्रेष्ठ हितकर्ते होते असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे यांनी केले.



       अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृती व्याख्यानमालेमध्ये डॉ.पाटणे बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.लक्ष्मीकांत ब. दामा होते.मंचावर शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे सचिव अभिजित रणवरे,कुलसचिव योगिनी घारे यांची उपस्थिती होती.



          पुढे बोलताना डॉ.पाटणे म्हणाले,मोहिते पाटील यांनी अकलूजच्या उजाड माळावर उभारलेल्या विविध शाळा, महाविद्यालये,साखर कारखाने, सूतगिरणी शेतीपूरक प्रकल्प आणि कला संस्कृती केंद्रे ही सहकारातील मंदिरे आहेत. ग्रामीण समाजातील सामान्य माणसाचा उद्धार हाच शंकरराव मोहिते पाटील यांच्या जीवन कार्याचा केंद्रबिंदू होता.मानवता हा त्यांचा जीवनधर्म होता.कर्म सेवामय झाले की जीवन कृतार्थ होते,याचा आदर्श वस्तूपाठ त्यांनी घालून दिला.सहकारी संस्थांची निर्मिती करताना त्यांनी उद्याच्या पिढ्यांच्या उज्वल भविष्याचा विचार केला.आपल्या विवेक बुद्धीला पटलेला विचार कृतीत आणताना त्यांनी निर्भयता, कल्पकता आणि कार्यतत्परता यांचे सुंदर दर्शन घडवले.

           संकल्प आणि साधना, युक्ती आणि कृती, व्यवहार आणि भावना,मानवताने गुणवत्ता यांच्या एकरुपतेत त्यांचे मोठेपण सामावलेले होते.त्यांच्या मोठेपणातून मी पण गळाल्यामुळे त्यांना मानवी पातळीवरचे देवपण प्राप्त झाले.त्यांनी समाजाच्या विविध घटकात प्रेम,विश्वास, बंधुभाव निर्माण केला.

         सध्या वाढता जातीधर्म द्वेष,अतिरेकी चंगळवाद आणि मूल्यहीन राजकारण यामुळे जीवन सौंदर्याला,संस्कृतीला आणि संविधानाला तडे जात आहेत,अशा काळात सहकारी तत्त्वांचा चांगुलपणा जपण्यासाठी शंकराव मोहिते पाटील यांच्या परिसस्पर्शी जीवन चरित्रातून प्रेरणा घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी आपल्या व्याख्यानातून उपस्थितांना केले.

          या कार्यक्रमासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य श्रीमती पद्मजादेवी मोहिते पाटील,सचिन गायकवाड,डॉ. विकास पाटील,हर्षवर्धन खराडे-पाटील,डॉ.केदारनाथ कळवणे,डॉ.राजेंद्र वडजे आदी उपस्थित होते.

         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय सहायक कुलसचिव डॉ.शिवाजी शिंदे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.श्रुती देवळे यांनी केले तर आभार डॉ.हनुमंत आवताडे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा