*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो. 9730 867 448
केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना देण्याचा निर्णय दिला. त्याविरोधात शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं अजित पवार गटाच्या वकिलांची चांगलीच कानउघाडणी केली. तुम्ही आता एक वेगळा राजकीय पक्ष आहात. मग शरद पवारांचा फोटो का वापरता?, असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं विचारला.
निवडणूक प्रचारात शरद पवारांचा फोटो कशासाठी वापरता, असा प्रश्न न्यायालयाकडून अजित पवार गटाला विचारण्यात आला. 'तुम्ही आता एक वेगळा राजकीय पक्ष आहात. शरद पवारांसोबत राहायचं नाही असा निर्णय तुम्ही घेतलात. मग आता त्यांचा फोटो का वापरता? आता स्वत:ची ओळख निर्माण करा आणि त्याच्या आधारे निवडणूक लढा,' अशा सूचना न्यायालयानं अजित पवार गटाला केल्या आहेत.
अजित पवार गट शरद पवार यांच्या फोटोचा, नावाचा वापर चुकीच्या पद्धतीनं करत आहे. मतदारांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो, असं शरद पवार गटाच्या वतीनं न्यायालयाला सांगण्यात आलं. अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयात शरद पवार गटाची बाजू मांडली. यानंतर न्यायालयानं अजित पवार गटाची कानउघाडणी केली. शरद पवारांचा फोटो वापरणार याची बिनशर्त लेखी हमी द्या, असा आदेश न्यायालयानं अजित पवार गटाला दिला आहे. या प्रकरणाची सुनावणी पुढील १९ मार्च ला होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा