*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
*मुंबई - 19 मार्च :* लोकसभा निवडणुकीत बारामतीमधील पवार कुटुंबामधील लढतीची चर्चा रंगली आहे. शरद पवार यांची मुलगी आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहे. या लढतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात बारामतीमधील पूर्ण पवार कुटुंब उतरले आहे. आता अजित पवार यांचे सख्ये भाऊ श्रीनिवास पवार यांनीही अजित पवार यांच्या भुमीकेवर शाब्दिक हल्ला केला आहे. अजित पवार यांनी घेतलेली भूमिका आपणास पटली नाही. त्यांनी वयस्कर माणसांची किंमत केली नाही, ही गोष्ट वेदना देणारी आहे, असा घणाघाती हल्ला श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांना काटेवाडीत बोलताना लगावला आहे.
श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे मोठे बंधू आहेत. ते उद्योजक असून कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात त्यांचे व्यवसाय आहेत. अजित पवार हे आपल्या आयुष्यातला प्रत्येक महत्त्वाचा निर्णय श्रीनिवास पवारांशी चर्चा करुन घेतात असं कायमच सांगितलं जातं. श्रीनिवास पवार हे राजकारणात सक्रिय नाहीत. मात्र कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ते कायमच दिसतात. आता प्रत्येक नात्याची "एक्स्पायरी डेट" असते असं म्हणत त्यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे.
आमची जेव्हा चर्चा झाली, तेव्हा आमदारकीला तू आहे. खासदारकीला साहेबांना राहू दे, असे स्पष्ट आपण अजित पवार यांना सांगितले होते, असे श्रीनिवास पवार यांनी म्हटले. ते म्हणाले, साहेबांचे (शरद पवार) आपल्यावर खूप उपकार आहेत. काटेवाडीतील गावकरी म्हणून तुम्हाला हे सर्व माहीत आहे. त्यांचे ८३ वय झाले म्हणून त्यांची साथ सोडणे मला पटले नाही. त्यांनी वयस्कर माणसांची किंमत केली नाही. आपणास दुसऱ्या माणसांकडून राजकीय लाभ मिळणार आहे, यामुळे त्यांना सोडणे चुकीचे आहे. जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचे नसते, असे श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांना सुनावले आहे.
ज्यांना राष्ट्रवादीत पदे मिळाली ती फक्त साहेबांमुळे मिळाली. त्याच साहेबांना आपण म्हणतो, आता तुम्ही घरी बसा, कीर्तन करा. हे माझ्या मनाला पटत नाही. औषधांची एक्सप्रायरी डेट असते त्याप्रमाणे काही नात्यांची एक्सप्रायरी डेट असते. कुणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जावे मला पटत नाही, असे श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता सुनावले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा