*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
मुंबई - 17 मे :* महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप चढवल्याने प्रफुल्ल पटेल यांनी करोडो शिवभक्तांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासंदर्भात नाना पटोले म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत पण या दैवताचा सातत्याने अपमान केला जात आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेकांनी महाराजांचा अपमान केला आहे, पण भारतीय जनता पक्षाने त्यावर चकार शब्द काढला नाही. अयोध्यातील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यातही श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांनी नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. असे प्रकार शिवाजी महाराजांचा अपमान करणारे आहेत, त्याला आळा घातला पाहिजे पण त्यात भरच पडत आहे.”
“अंडरवर्ल्ड माफिया दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इकबाल मिर्चीसोबत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जमीन व्यवहार केल्याप्रकरणी ईडीकडून चौकशी झाली होती. देशद्रोह्याची संबंध असलेल्या प्रफुल्ल पटेलचे पापी हात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिरेटोपला लागले हे लाजिरवाणे आहे. या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करत आहे,” असेही नाना पटोले म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा