Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३० मे, २०२४

*"डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वर गुन्हे दाखल.*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

मुंबई - 30 मे :-- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्यावर सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने ऐतिहासिक कार्य केले, त्या ऐतिहासिक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती जाळण्याचा स्टंट करण्याच्या नादात डॉ. आंबेडकर यांचा फोटो फाडला. या प्रकरणी आता अधिवक्ता विवेकानंद गुप्ता यांनी रायगडच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून आव्हाड यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक कारण्याची मागणी केली आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, असे अधिवक्ता विवेकानंद गुप्ता यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

जितेंद्र आव्हाड हे जेव्हा डॉ. आंबेडकर यांचा फोटो फाडत होते, तेव्हा हा धक्कादायक प्रकार घडताना एक कार्यकर्ता त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होता, तरीही आव्हाडांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत अत्यंत द्वेष भावनेतून फोटो फाडून त्याचे तुकडे करून त्यांनी ते जमिनीवर टाकून दिले. हा प्रकार काही क्षणात राज्यभर पोहचला. जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याबद्दल समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राज्यभरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत भिमराव बबन साठे ( वय ४८, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. साठे हे भारतीय जनता पार्टी पुणे शहर अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी जाती – जाती मध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केलेले आहे. म्हणुन देशभरातील सर्व आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. सदरची ही घटना सोशल मिडीया व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातुन सगळीकडे प्रसारीत होत आहे. व ती मी प्रसारमाध्यमाव्दारे पाहीली असल्याचे साठे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. त्यानुसार आव्हाड यांच्यावर भा. द. वि. कलम १५३, १५३ (अ), २९५(अ), ५०४, ५०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर महाड शहरातील पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्यासह एकूण 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाच्या आदेशांचे आणि अटींचा भंग केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या 23 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथे भा.द.वि. कलम 1860 नुसार सेक्शन 188, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार सेक्शन 37(1), महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 नुसार सेक्शन 37(3), महाराष्ट्र पोलीस अधिनियम सेक्शन 135 या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी मागितली माफी



आम्ही महाडला मनुस्मृती दहन करण्यासाठी आलो होतो. कारण ज्या मनुस्मृतीमधे महिलांच्या संदर्भात अत्यंत खालच्या भाषेत लिहण्यात आलं आहे, त्या मनुस्मृती मधील श्लोक जर पाठ्यपुस्तकात येत असेल तर आम्ही त्याचा विरोध करत असताना अनावधानाने माझ्याकडून आणि माझ्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडण्यात आले. त्यासंदर्भात मी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागतो आणि मी कधी माझ्या भूमिकेपासून मागे हटत नाही पण आता मी माफी मागत आहे, त्यामुळे यामागची भावना आपण समजू शकता, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

या प्रकारामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, पण आम्ही हे मुद्दाम केलेले नाही. या संदर्भात विरोधकांना राजकारण करायचे असल्याने ते अनेक मागण्या करतील. मात्र, मी त्यावर काहीही बोलणार नाही. कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर माफी मागतो, असे स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या घटनेवर दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा