*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
ईशान्य भारतातपक्षाचा पाया विस्तारण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला सिक्कीममध्ये मोठा धक्का बसला आहे. मावळत्या विधानसभेत १२ आमदार असलेल्या भाजपला भोपळाही फोडता आलेला नाही. सिक्कीम या डोंगराळ प्रदेशात भाजपची ताकद तशी नगण्यच होती.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकही जागा मिळाली नव्हती व पक्षाचा मतांची टक्केवारी फक्त १.६२ टक्के होती. तेव्हा सत्ताधारी असलेल्या सिक्कीम डेमोक्रेटिक पक्षाला सत्ता गमवावी लागली. ३२ सदस्यीय विधानसभेत या पक्षाचे १५ आमदार निवडून आले होते. ईशान्येकडील राज्यांमध्ये अन्य पक्षांमध्ये फोडाफोडी करूनच भाजपने पाया विस्तारला आहे.
सिक्कीममध्ये पराभूत झालेल्या सिक्कीम डेमोक्रेटिक पक्षाच्या १५ सदस्यांपैकी १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर नंतर पोटनिवडणुकांमध्ये भाजपने दोन जागा जिंकल्या होत्या. यामुळेच २०१९च्या निवडणुकीत एकही जागा न जिंकताही भाजपच्या आमदारांचे संख्याबळ १२ झाले होते. सिक्कीममधील सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा या पक्षाबरोबर भाजपने हातमिळवणी केली होती. विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून उभयतांमध्ये बिनसले. परिणामी भाजप स्वतंत्रपणे लढला होता.
प्रादेशिक पक्षांकडेच सत्ता
सिक्कीममध्ये १९९४ पासून प्रादेशिक पक्षांकडेच राज्याची सत्ता आहे. भाजप सत्तेत आल्यास स्थानिक अस्मिता दडपली जाईल, असाही प्रचार झाला होता. यामुळेच मतदारांनी सर्व ३२ जागांवर प्रादेशिक पक्षांनाच कौल दिला. यापैकी ३१ जागा सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा तर एक जागा सिक्कीम डेमोक्रेटिक पक्षाला मिळाली आहे. भाजपला एकही जागा मिळाली नसली तरी पक्षाच्या मतांमध्ये १.६२ टक्क्यांवरून ५.१८ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. पण ईशान्येकडील आणखी एका राज्यात महत्त्वाची भूमिका बजाविण्याची भाजपची योजना सिक्कीममध्ये यशस्वी झाली नाही.
जोरदार प्रचाराचा फायदा
सिक्कीममध्ये घटनेच्या ३७१ (एफ) अन्वये या राज्याला विशेषाधिकार आहेत. केंद्रात सत्तेत येताच २०१९ मध्ये भाजपने जम्मू आणि काश्मीरला घटनेच्या ३७०व्या कलमानुसार असलेले विशेषाधिकार रद्द केले होते. सिक्कीममध्ये भाजप सत्तेत आल्यास ३७१ (एफ) कलमानुसार मिळणारे विशेषाधिकार काढून घेतले जातील वा शिथिल केले जातील, असा जोरदार प्रचार विरोधी पक्ष तसेच विविध स्थानिक संस्थांकडून झाला होता. त्याचा भाजपला फटका बसल्याचे बोलले जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा