*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
बेळगाव :* सौंदत्ती डोंगरावरील श्री रेणुका देवीचे दर्शन घेऊन गावाकडे परतणार्या भाविकांच्या वाहनावर काळाचा घाला पडल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. भाविकांच्या ट्रॅव्हलरने थांबलेल्या ट्रकला भीषण धडक दिली. यामध्ये १४ भाविकांचा जागीच मृत्यू झाला.
थांबलेल्या ट्रकला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक बसून 14 जण जागीच ठार झाल्याची घटना आज शुक्रवारी पहाटे हावेरी जिल्ह्यातील ब्याडगी तालुक्यातील गुंडेनहळी येथे घडली. सर्व मृत शिमोगा जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील आहेत. मृतांमध्ये परशुराम (वय 45) भाग्या (40) नागेश (50) विशालाक्षी (40), अर्पिता (18) सुभद्राबाई (65), पुन्या (50), चालक आदर्श (23), मानस (24), रूपा (40) मंजुळा (50) यांच्यासह अन्य महिला पुरुष व मुलांचा समावेश आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, हावेरी जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील नागेश यम्मेहट्टी यांच्या मुलाने काही दिवसांपूर्वी नवीन टेम्पो ट्रॅव्हलर खरेदी केला आहे. त्यामुळे आपले नातेवाईक व शेजाऱ्यांना घेऊन ते नवीन वाहनाची पूजा करण्यासाठी सोमवारी 24 जून रोजी टेम्पो ट्रॅव्हलर भरून सर्वजण गुलबर्गा जिल्ह्यातील चिंचोळी येथील मायम्मा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. तेथे पूजा करून महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिराला गेले. गेल्या चार दिवसांच्या प्रवासानंतर गुरुवारी रात्री या सर्वांनी बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती रेणुका यल्लमाचे दर्शन घेतले. तेथून ते पुन्हा आपल्या गावी परतत होते.
पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना ब्याडगी तालुक्यातील गुंडेनहळी क्रॉसजवळ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास महामार्गावर रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या ट्रकचा ट्रॅव्हलर चालक आदर्श याला अंदाज आला नाही. त्यामुळे टेम्पो ट्रॅव्हलरची रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. यामध्ये 13 जण जागीच ठार झाले तर एकाचा हॉस्पिटलमध्ये नेत असताना मृत्यू झाला. अन्य तिघा जणांची ही प्रकृती गंभीर असल्याचे हावेरी पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच हावेरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा