*उपसंपादक---नुरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
मुंबई - 05 जून :* लोकसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 'मशालने आग लावली आहे. २०१९ ला भाजपला किती जागा मिळाल्या होत्या. ४१ की ४२. आता किती राहिल्या? आता कळेल असली कोण आहे आणि नकली कोण आहे? मला हे नकली संतान म्हणत होते. पण हे स्वत: त्यांच्या आईला मानायला तयार नाहीत. मला परमात्म्यानं पाठवलंय म्हणतात. मग नकली संतान कोण?, असा उद्धव ठाकरे यांनी केला. सामान्य जनतेनं सामान्य जनतेची ताकद दाखवून दिली आहे.
मस्तवाल सत्ताधाऱ्यांना आपण एका बोटाने हरवू शकतो, त्यांचा वारू रोखू शकतो हे देशातील सर्वसामान्य जनतेने जगाला दाखवून दिले, त्यांचा मला अभिमान आहे, असे सांगतानाच, आजच्या निकालानंतर उंबरठय़ावर असलेल्या हुकूमशहांना पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. केंद्रात सत्ता स्थापनेसाठी इंडिया आघाडीने दावा करायलाच पाहिजे, असे ते म्हणाले.
शिवसेनेच्या विजयाबाबत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, मोदी शहांचा अहंकार जनतेने मोडून काढला. भाजपचा हा पराभव असून ना श्रीराम ना बजरंगबली त्यांच्यासोबत आहेत. ते आमच्यासोबत आहेत. महाराष्ट्राने नरेंद्र मोदींचा विजयरथ रोखला असून हा त्यांचा पराजय आहे. देशामध्ये आता परिवर्तन दिसून येत आहेत. त्यामुळे मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
संजय राऊत पुढे म्हणाले की, “देशाने आणि देशाच्या जनतेने नरेंद्र मोदींना नाकारलेले आहे. स्वतःला देव समजणाऱ्या नरेंद्र मोदींनी आपला पराभव स्वीकारून गप्प बसावे. राहुल गांधींची कामगिरी नरेंद्र मोदींपेक्षा चांगला आहे. राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाला शून्यापासून दीडशेपर्यंत घेऊन गेले. याउलट नरेंद्र मोदींनी पक्षाला सव्वा तीनशेहून पक्षाला सव्वा दोनशे पर्यंत आणले.” अशी टीका त्यांनी केली. तसेच, “आम्हाला काही ठिकाणी धनुष्यबाण चिन्ह नसल्याचाही फटका बसला. लोकांमध्ये विशेषतः आदिवासी पाड्यांमध्ये चिन्हामुळे आम्हाला फटका बसला. तसेच, मी ठामपणे सांगतो की, मोदीजी सरकार स्थापन होत नाही. आता त्यांनी तोडफोड करून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे.
“राहुल गांधींचे नेतृत्व आणि राज्यांची कामगिरी, ममता बॅनर्जी असो, शरद पवार असो किंवा अखिलेश यादव असो सर्वांनी मेहनत करून मोदी-शहांचा अहंकार मोडून काढला आहे. तसेच अयोध्या, फैजाबादमध्ये भाजपचा पराभव झाला… देशातील जनतेने नरेंद्र मोदींना नाकारले आहे, त्यांना समारोप दिला आहे,” असे म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा