*उपसंपादक---नुरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
दोन दिवसांपासून मान्सून केरळमध्ये बरसण्यास सुरुवात झाली आहे. मान्सूनने आपल्या पुढील प्रवासाला देखील सुरुवात केली असून कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशात मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे पश्चिमी वाऱ्यांनी वेग घेतला आहे. एकूणच मान्सूनला महाराष्ट्रात येण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
त्यामुळे येत्या ४८ ते ७२ तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर आजपासून पुढील ३ दिवस तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या अरबी समुद्रातून राज्याकडे येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा व ढगांचा वेग वाढला आहे.
त्यामुळे आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हा पाऊस ५ जूनपर्यंत सुरू राहील असंही सांगण्यात आलं आहे. एकंदरीत मतमोजणीच्या दिवशी कोकणात पाऊस असू शकतो.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील तापमानात घट झाली असून पूर्व मौसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे आजपासून पुढील दोन ते तीन दिवस पुण्यातही वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळतील. पुण्यासोबत, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात येत्या ५ जूनपर्यंत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील.
तर दुसरीकडे विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरात सोमवारपासून ढगाळ वातावरण राहील. यंदा मुंबईत पावसाचं आगमन वेळेवर होणार असून पावसाचे प्रमाणदेखील समाधानकारक असणार आहे.
येत्या ६ ते १३ जूनपर्यंत मान्सून पूर्णत: महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
या सोबतच खाजगी हवामान अंदाज वर्तवण्याबाबत लवकरच हवामान खाते पावले उचलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा