*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
सोलापूर :* भीमा खो-यात पडणा-या दमदार पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढण्यास सुरूवात झाली आहे. अवघ्या २४ तासांत धरणात अडीच टक्के पाणीसाठा वाढला असून मंगळवारी सकाळी दौंड येथून धरणात १८ हजारापेक्षा जास्त क्युसेक विसर्गाने पाणी मिसळत होते. मागील दीड महिन्यात धरणात २८.८७ टक्के पाणीसाठा वाढला आहे.गेल्या महिन्यात ७ जूनपर्यंत उजनी धरणात वजा ६०.६६ टक्के पाणीसाठा होता. त्यात हळूहळू घट होऊन आता वजा ३१.०३ टक्क्यांवर पोहोचला आहे. पाणीसाठा वजा पातळीवरून उपयुक्त पातळीत येण्यासाठी आणखी १६.६२ टीएमसी पाण्याची गरज आहे. मंगळवारी सकाळी धरणात एकूण पाणीसाठा ४७.०४ टीएमसी एवढा होता.
दोन दिवसांपासून भीमा खो-यात समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे दौंड येथून उजनी धरणात मिसळणा-या पाण्याचा विसर्ग वाढण्यास मदत झाली आहे. मंगळवारी सकाळी पुण्यातील बंड गार्डन येथूनही प्रथमच पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून तो १३ हजार ८७० क्युसेक विसर्ग होता. हे पाणी दौंड येथे पोहोचले नव्हते. त्या दरम्यान, दौंड येथून २१ हजार ८३ क्युसेक विसर्गाने धरणात पाणी येत होते. नंतर त्यात घट होऊन १८ हजार २१ क्युसेक विसर्गाने पाणी मिसळत होते. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर नाही.
मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जेमतेम ४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. आतापर्यंत धरण क्षेत्रात २४८ मिमी पाऊस झाला आहे. इकडे सोलापूर जिल्ह्यात चालू जुलै महिन्यात पावसाची हजेरी तुरळक असताना मंगळवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत १७.७ मिमी एवढा सरासरी पाऊस झाला. बार्शीत दुस-या दिवशीही पावसाचा जोर असू ४१.६ मिमी पाऊस झाला. मंगळवेढा-२३.५, उत्तर सोलापूर-२२.१, दक्षिण सोलापूर-२०.९, अक्कलकोट-१९.६, माढा-१८.१, मोहोळ-१७.४, करमाळा-१२.५, पंढरपूर-१०.३, सांगोला-८.३ आणि माळशिरस-१.९ याप्रमाणे कमीजास्त पावसाची नोंद झाली आहे. चालू महिन्यात आतापर्यंत सरासरी ८७.७ मिमी पाऊस झाला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा