*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
आपल्या मुलांची बौद्धिक कुवत व त्यांच्या इच्छा-आकांक्षांचा विचार न करता पालक कर्जबाजारी होवून मुलांना शिक्षण देतात. मुलांना त्या शिक्षणात गोडी नसल्याने त्यात ते अपयशी ठरतात.त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना त्यांच्या आवडीचे शिक्षण दिले पाहिजे. खोट्या प्रतिष्ठेसाठी पालकांनी आपल्या मुलांच्याबाबत अवास्तव अपेक्षा बाळगू नयेत.असे मत मानसशास्त्रीय चाचण्यांचे तज्ञ व पोखले (ता.पन्हाळा) गावचे सेवानिवृत्त शिक्षक एस.बी.नाईक यांनी येथे व्यक्त केले.
कोडोली (ता.पन्हाळा) येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात "मानसशास्त्रीय चाचण्यांचे व्यवस्थापन" या विषयावरील कार्यशाळेत कृतीयुकत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील होते.सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने चार दिवसीय कार्यशाळेचा प्रारंभ झाला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.पाटील म्हणाले, "शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर चाचण्यांचे व्यवस्थापन करताना प्रामाणिकपणा जोपासला पाहिजे.तरच विद्यार्थ्यांच्या अंतरंगाचा अभ्यास करता येईल."
बी.एड.च्या विद्यार्थी - शिक्षकांवर श्री.नाईक यांनी दोन मानसशास्त्रीय चाचण्यांचे व्यवस्थापन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा.ए.के.बुरटुकणे यांनी केले.सुभाष चौगले यांनी सूत्रसंचलन केले तर आभार प्रदर्शन भिवाजी कांबळे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा