*उपसंपादक--नुरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
"जुबेदा मंजिल" हे घराचं नावं नाही तर लेखिकेच्या आयुष्यात आलेल्या क्रांतीचे नावं आहे व त्याचप्रमाणे मुस्लिम मराठी साहित्यातही असाच क्रांतीचा व भरीचा पर्व "जुबेदा मंजिल" ह्या पुस्तकाने केलं असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण मुस्लिम मराठी लेखिका अर्जुमनबानो शेख यांनी लिहिलेला मुस्लिम मराठी साहित्यातील हा पहिला अलक(अति लघु कथा) संग्रह आहे.
अति लघु कथा (अलक) हा साहित्य प्रकार राजेंद्र वैशपायन यांनी सर्वप्रथम मराठी साहित्यात रुजू केला. सुरुवातीला या साहित्य प्रकारात नावाप्रमाणे अति लघु कथा अर्थात अगदी शंभर ते दीडशे शब्दांत व सवांद विरहित अर्थपूर्ण, बोध देणारी कथा लिहिली जात असे. कालांतराने त्यात बदल झाले व लेखकांनी, वाचकांनी अगदी कथेचे स्वरूप अति लघु कथेला दिले या साहित्य प्रकाराला संक्षिप्त रूपात "अलक" असे संबोधले जाते.
अर्जूमनबानो शेख यांनी हा कथा प्रकार अगदी सहज रित्या हाताळला आहे.हा कथाप्रकार म्हणजे लेखकांची तारेवरची कसरतच आहे. कारण अगदी मोजके शब्द, मोजका संवाद आणि कथेची कलाटणी निर्माण करने ही लेखकाची परीक्षाच होय. "जुबेदा मंजिद" मधील बऱ्याच कथा या सर्वसामान्य अनुभवातील आहेत. वाचकाला असे वाटते की लेखिका आपलाच अनुभव लिहीत आहेत की काय असे वाटते. कथा अगदी कमी शब्दांत जरी असल्या तरी मार्मिक व गहण बोध देऊन जातात.लेखिका जुबेदा मंजिल या कथेत लिहितात
एका झोपडीचे रूपांतर मोठ्या इमारतीत मुलगा करतो आणि त्या इमारतीला नाव देतो जुबेदा मंजिल तेव्हा आई मुलाला म्हणते, "अरे देवाचं नावं द्यायचं असतं " मुलगा म्हणतो, "तेच केलं आहे "
ह्या छोट्याश्या संवादमध्ये किती मार्मिक अर्थ लपला आहे. मुलगा आईला देवाचा दर्जा देतो किती मोठे संस्कार या छोट्याश्या अलक मधून लेखिका वाचकामध्ये रुजवतात.
आज माणसाचे जीवन एवढे धकाधकीचे आहे की माणसाकडे वेळ नाही. त्याला सगळं काही जलद लागतं. लवकर समजावे व लवकर संपतील अशा कथा हव्या आहेत. त्यात मराठी साहित्यातील हा प्रकार माणसाला कमी वेळात जास्त मोठी शिकवण देण्याचा काम करत आहे.
कथासंग्रहाचे मुखपृष्ठ नावाला साजेल असेच आहे. चित्रकारने संग्रहातील मुख्य पात्र व मुख्य कथा मुखपृष्ठावर रेखाटून वाचकांना पुस्तकाच्या मोहात पाडण्याचे काम केले आहे.
लेखिका आपले कथासंग्रह आपल्या लाडक्या भावाला समर्पित करते. त्याच बरोबर झाडीबोली साहित्य मंचाचे ऋणनिर्देशही व्यक्त करते. प्रदीप देशमुख सरांनी या कथासंग्रहास शुभेच्छा दिल्या आहेत तर कथेची चिकित्सा करणारी सुंदर अशी लक्षवेधी प्रस्तावना डॉ विद्याधर बनसोड,मराठी विभागप्रमुख सरदार पटेल विद्यालय यांनी दिली आहे. सरांनी कथासंग्रहाची प्रस्तावना लिहिताना अगदी विश्लेषण करून, प्रामाणिक व अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना केली आहे.या संग्रहाची पाठराखण प्राचार्य डॉ.श्याम मोहरकर करतात.जगण्याच्या संघर्षातुन आणि भोगलेल्या,सोसलेल्या वेदनामधुन अलक सारख्या साहित्यप्रकारामधून कथेची निर्मिती करणार्या लेखिका अर्जूमनबानो शेख यांच त्यांनी भरभरुन कौतुक केलेल आहे.
अर्जुमनबानो यांच्या या कथासंग्रहात आपल्याला मोठया भावातील बाप भेटतो, प्रेयसी भेटते, बायको भेटते,आई, देव, अत्याचार करणारे नराधम, बंड करणारी मुलगी, सर्वांना सामावून घेणारी अम्मा अशी वेगवेगळी अनेक पात्र आपल्याला ८१ अलकमधून भेटतात आणि आपल्या मनावर एक ठसा उमटवून जातात.
कथासंग्रहतील प्रत्येक कथा एक वेगळ्याच रूपात आपल्यासमोर येते छोटीशी जरी कथा असली तरी आपल्यासमोर तो क्षण जसाच्या तसा उभा राहतो व संपूर्ण कथासंग्रह वाचून पूर्ण केल्याशिवाय जागेवरून उठण्याचा मोह वाचकांना आवरणार नाही.
एक मुस्लिम मराठी लेखिका म्हणून घरातून व समाजातून होणाऱ्या विरोधाला उत्तर देणाऱ्या कथा देखिल लेखिकेने संग्रहात अगदी निर्भिड व प्रखरपणे रेखाटल्या आहेत.
लेखिका आपल्या कथातून व लेखनातून वैयक्तिक त्याचबरोबर सामाजिक प्रश्नांची मांडणी करून समाजाला व प्रशासनाला प्रश्न विचारण्याचे धाडस आपल्या अलक संग्रहातून करते.
लेखिकेच्या हातून असेच ज्वलंत प्रश्नावर लेखन होत राहो आणि सामाजिक भान जपत राहो ही इच्छा व्यक्त करतो व लेखिकेला पुढील साहित्य लिखाणास हार्दिक शुभेच्छा देतो.
कथासंग्रह
जुबेदा मंजिल - लेखिका अर्जुमनबानो शेख
प्रकाशक - ज्ञान सिंधू प्रकाशन, नाशिक
प्रथम आवृत्ती -२०२२
मूल्य -१००/-फक्त
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा