इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
--- गजापुर (ता. शहागड, जिल्हा कोल्हापूर) येथे जातीय हिंसाचार करणाऱ्या व कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या समाजकंटका विरोधात कठोर कारवाई करावी यासाठी इंदापूर तालुका मुस्लिम जमातीच्या वतीने मुक मोर्चा
दिनांक १४ जुलै २०२४ रोजी स्वराज्य पक्ष, हिंदू राष्ट्र सेना संघटना आणि पक्षाने विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात मोर्चाचे आयोजन केले होते. याबाबत पोलीस प्रशासनाने कोणतीही परवानगी दिली नव्हती. तरी सुद्धा मुळशी, मावळ, पुणे, सातारा, कोल्हापूर, वाई येथून बेकायदेशीर जमाव गोळा करून जमावला भडकवण्याचे काम सोशल मिडिया माध्यमातून केले गेले. जमावाने विशाळगड तसेच विशाळगडापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मुसलामनवाडी व गजापुर गावात अल्पसंख्याक मुस्लिम समुदायाची घरे जाळणे, बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला करून जखमी करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, स्त्रिया व लहान मुले-मुली यांच्यावर विनयभंगाचा प्रयत्न करणे व जीवघेणा हल्ला करणे, स्थानिक रहिवासी असलेल्यांच्या घरातील मौल्यवान दागिने व वस्तू चोरणे व जबरदस्ती घरात घुसून तोडफोड करणे, मुस्लिम समाजाच्या प्रार्थना स्थळ आणि मस्जिद यांची तोडफोड करून धार्मिक भावना दुखवने. यांसारखी गंभीर बेकायदेशीर कृत्य केलेली आहेत.
सदर घटना पूर्वनियोजित असून वरील गुन्हे करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर शिक्षा करावी. मोर्चाचे आयोजन करणाऱ्या स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे व इतर पदाधिकारी, पुण्यातील रविंद्र पडवळ, विविध गुन्हे दाखल असलेला आरोपी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई यांच्यावर गुन्हे दाखल करावेत व त्यांना ताबडतोब अटक करावी. हिंसाचारात ज्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी. शेकडो वर्षापासून प्रार्थना स्थळे आहेत त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था शासनाने करावी. मुस्लिम समाजावर कोल्हापुरात व महाराष्ट्रात सतत होणाऱ्या अत्याचाराविरोधात पोलीस अधीक्षक यांच्या द्वारे प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक अत्याचार प्रतिबंधक समिती स्थापन करावी व तिची अंमलबजावणी प्रत्येक जिल्ह्यात करावी. सोशल मीडियात मुस्लिम समाजाबद्दल आणि त्यांच्या अस्थेशी जोडलेल्या धार्मिक स्थळाबद्दल व्हिडीओ बनवणाऱ्या आणि धार्मिक भावना दुखवणाऱ्या मंडळीवर कायदेशीर कारवाई करावी. यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार श्रीकांत पाटील व पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांना इंदापूर तालुका समस्त मुस्लिम जमातीच्या वतीने देण्यात आले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा