Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४

विधानसभेच्या निवडणुकीत इंदापूरचा आमदार आपलाच - प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. ता़बोळी, मोबाईल-8378081147

--- आगामी विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवारांची पुण्याई, तुमच्या सर्वांचे कष्ट व एकी राहीली तर इंदापूरचा आमदार आपलाच होईल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

    सराटी ( ता.इंदापूर ) येथे शिवस्वराज्य यात्रा दाखल झाली. यावेळी आयोजित सभेत जयंत पाटील बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, प्रकाश म्हस्के, भारती शेवाळे, युवकचे प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख, जिल्हा बॅकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती प्रविण माने, भरत शहा, कांतीलाल झगडे, मार्केट कमिटीचे अध्यक्ष विलास माने, इंदापूर तालुकाध्यक्ष ॲड तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारूद्र पाटील, अशोक घोगरे, प्रदिप जगदाळे, सागर मिसाळ, ॲड काझी, अस्लम सय्यद, महिला तालुकाध्यक्षा छायाताई पडसाळकर, शहराध्यक्ष रेशमा शेख, नागेश गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.



   जयंत पाटील पुढे म्हणाले, आपण सगळे एकत्र राहिलो तर विजयश्री खेचून आणता येतोच. लोकसभा निवडणूकीत भाजपाने देशात व राज्यात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याला जनतेने खड्या सारखे बाजूला करण्याचे काम केले. मोदी, शहांनी राज्यात येवून शरद पवारांना आव्हान देण्याचे काम केले. त्यास मराठी माणूस काय करतो निवडणुकीत दाखवून दिले आहे. निवडणूकी नंतर वातावरण किती मोकळे झाले आहे. आपण ठरवलं तर काय करू शकतो यातून दाखवून दिले आहे. राज्यातील सामान्य माणूस शिंदे, फडणवीस व पवार या त्रिकुटाचे सरकार बाजूला करण्यासाठी कधी मतदान होते याच्या प्रतिक्षेत आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच यांच्या पेक्षा कितीतरी पटीने चांगली योजना लाडक्या बहिणींसाठी आणणार आहोत. महाराष्ट्राचा नंबर गुजरातच्या खाली नेण्याचे काम २०१४ नंतर भाजपाने केले आहे. राज्यात बेकारी वाढली असताना मात्र यांच्या कार्यकाळात राज्यातील १७ प्रकल्प राज्याबाहेर गेले परंतू यांनी तोंड उघडले नाही. दोन महिन्यात फक्त बोलायचेच आहे व निघून जायचेय या भुमिकेत असणारे सरकार आपणास काहीही आश्वासन देईल. आपल्या शेतीमालाची दयनीय अवस्था यांनी केली. दुधाला पाच रूपये वाढीची घोषणा होऊन दिड महिना उलटला असून कांदा उत्पादकांचीही तीच अवस्था केली आहे. लोकसभेत जसे केले त्याप्रमाणे राज्यात करण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत मुंबई मधील यांचं सरकार जात नाही तोपर्यंत भाजपाचा देशात पराभव होणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीत सरकारला सत्तेतून दुर करुन दिल्लीतील भाजपा सरकारला शेवटचा धक्का देण्यासाठी पुन्हा एकदा तुतारी वाजवायची आहे.



   खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघात व पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीत वाढ झाली असून महिला व मुली सुरक्षीत नाहीत. पोलीस त्यांच्या जागेवर बरोबर आहेत परंतू वर बसलेल्यांची मोठा प्राॅब्लेम झाला आहे. तीन महिने कळ काढा आपले सरकार आल्यावर महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देवून गुन्हेगारी शुन्यावर आणणार आहे.

   खासदार अमोल कोल्हे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत प्रश्न पडला होता की जनता स्वाभिमानाच्या बाजूने उभा राहणार की गद्दारी करणाऱ्याची बाजू घेणार परंतू स्वाभिमानाची बाजू घेतली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. राज्यातील माता, भगिनींना मातृत्व, कर्तृत्व व नेतृत्वाचा वसा व वारसा आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आवाहन करतो आगामी विधानसभा निवडणुकीत गद्दारी गाडून स्वाभिमानाला विजयी करा.

    यावेळी महिबूब शेख, भारती शेवाळे, आप्पासाहेब जगदाळे, प्रविण माने, तेजसिंह पाटील, यशवंत गोसावी यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विणा दिघे यांनी आभार प्रदिप जगदाळे यांनी मानले.

फोटो - सराटी येथे शिवस्वराज्य यात्रेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना जयंत पाटील.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा