Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४

*ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत प्रवास योजनेत एस.टी. महामंडळाने सरकारला गंडवले*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवास केल्याचे प्रमाण वाढवून राज्य सरकारला गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार एस.टी. महामंडळाने केल्याचे उघड झाले आहे. ज्येष्ठांसाठीची जादा तिकिटे पंच करून एस.टी.च्या किती विभागांनी आपला नफा वाढवला आणि राज्य शासनाला गंडवले या चौकशीची चाके आता वेगाने फिरू लागली आहेत.


ज्येष्ठांसाठीची जादा तिकिटे पंच करण्याचा पराक्रम करणारा जालना विभागातील परतूर आगाराचा एक वाहक तिरुपती महादेव केंद्रे निलंबित झाला आणि या घोटाळ्याला वाचा फुटली. जादा तिकिटे पंच करण्यात वाहकाला व्यक्तिगत लाभ नसला, तरी आपल्या विभागाचा नफा वाढवण्यासाठी एस.टी.च्या वरिष्ठ अधिकार्‍यांनीच ही भलतीच योजना आखली आणि आता वरिष्ठांच्या सूचनेनुसार जादा तिकीट पंच करणारे वाहक मात्र या योजनेचे बळी ठरणार आहेत. 75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारने 26 ऑगस्ट 2022 पासून एस.टी.चा प्रवास मोफत केला. या योजनेला सोमवारी दोन वर्षे पूर्ण होत असतानाच हा घोटाळा उघडकीस आला. हे विशेष!


राज्य सरकारच्या 75 वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांना 50 टक्के सवलत या दोन योजनांमुळे एस.टी.ची चांदी झाली आहे. या दोन्ही सवलतींचे सवलत मूल्य राज्य सरकारकडून महामंडळाला अदा केले जाते. मोफत प्रवास आणि 50 टक्के सवलत यामुळे एस.टी.ची प्रवासी संख्या झपाट्याने वाढली. दररोजची प्रवासी संख्या 55 लाखांच्या घरात पोहोचली. परिणामी, महामंडळाच्या महसुलातदेखील वाढ झाली.


30 सेकंदांत 27 तिकिटे

महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी आगारांमध्ये स्पर्धा लावली. त्यातूनच उत्पन्न वाढीसाठी ही भन्नाट आयडिया वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी लढविल्याचे महामंडळातील सूत्रांनी सांगितले. वाहकांच्या ताब्यात तिकिट मशिन देण्याआधीच पाच हजारांची 75 वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांची तिकिटे मारलेली असतात. राज्यातील एका आगारात तर 30 सेकंदांत 27 तिकिटे पंच झाली आहेत.


सांगली-कोल्हापुरात वाहतूक बंद, तरीही तिकिटे

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर-सांगली परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आला होता. पुरामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील एस.टी.च्या वाहतुकीला फटका बसला होता. वाहतूक बंद असतानादेखील अमृत ज्येष्ठ नागरिकांची तिकिटे काढली गेली आहेत.


आता नफ्याची चौकशी

जुलै महिन्यात 31 विभागांपैकी 18 विभाग नफ्यामध्ये आले. त्यापैकी जालना (3.34कोटी), अकोला (3.14कोटी), धुळे (3.7 कोटी), परभणी (2.98 कोटी), जळगाव (2.40 कोटी), बुलडाणा (2.33 कोटी) या विभागांनी 2 कोटी पेक्षा जास्त नफा कमावला होता. या सर्वच विभागांना आता चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.


म्हणे, रोज 40 टक्के ज्येष्ठ प्रवास करतात

2021 गणतीनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या सुमारे 13 कोटी आहे. या लोकसंख्येमध्ये 75 वर्षे आणि त्या पुढील ज्येष्ठांची संख्या 2.4 टक्के म्हणजे सुमारे 31 लाख इतकी आहे. त्यापैकी एस.टी.तून दररोज सात ते आठ लाख अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात हा आकडा अवास्तव नाही, असा एस.टी. महामंडळाचा दावा राहिला आहे. मात्र, रोज 8 लाख ज्येष्ठ प्रवासी मोफत प्रवास करतात हे प्रमाण मानले तरी राज्यातील तब्बल 40 टक्के आजी-आजोबा रोज फक्त प्रवास करण्याचेच काम करतात, असा त्याचा अर्थ होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा