*बारामती---कल्पनाताई जाधव*
वेरूळ लेणी (Ellora Caves) ही छत्रपती संभाजी नगर शहरापासून 30 कि.मी. अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण 34 लेणी आहेत. यामध्ये 12 बौद्ध (लेणे क्र. 1 - 12), 17 हिंदू (लेणे क्र. 13 - 29) आणि 5 जैन (लेणे क्र. 30 - 34) लेणी आहेत. इ.स. 1951 साली भारत सरकारने या लेण्याला 'राष्ट्रीय स्मारक' म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपवण्यात आली. युनेस्कोने इ.स. 1983 मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला. कैलास मंदिर या जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रात अदभुत आहे जे राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्णा (प्रथम) (757-783) मध्ये बांधण्यात आले होते.
हा लेणीसमूह व्यापारी मार्गावर असल्याने तत्कालीन समाजाच्या दृष्टिपथात राहिला. राजघराण्यातील व्यक्ती तसेच उत्साही अभ्यासू प्रवासी यांनी या लेण्यांना दिलेल्या भेटीची नोंद सापडते. दहाव्या शतकात अरब प्रवासी अल-मस-उदी याने येथे भेट दिली आहे. बहामनी सुलतान गंगू याने येथे आपला तळ ठोकला आणि ही लेणी पाहिली असाही संदर्भ आढळतो. फिरिस्टा, मालेट यांसारख्या परदेशी प्रवासी अभ्यासकांनी येथे भेट दिल्याचे दिसते. ही लेणी काही काळ हैदराबादच्या निजामाच्या नियंत्रणात होती. 19 व्या शतकात भारतात ब्रिटीश राजवट असताना वेरुळ दुर्लक्षित होते. आक्रमकांमुळे किंवा काळाच्या ओघात मूर्तींचेही नुकसान झाले होते. ब्रिटिशांनी दुरुस्तीचे थोडेफार प्रयत्न केले. तथापि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1960 च्या दशकात या लेण्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. या काळात अजिंठा-वेरूळच्या लेण्यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटनस्थळे म्हणून प्रसार सुरू झाला.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या ठिकाणी मोठया प्रमाणावर विकासकामे केलेली आहेत. या ठिकाणी महामंडळाची साधारणपणे 82.03 एकर इतकी जमिन आहे. या जमिनीवरील 42.50 एकर इतक्या भागात महामंडळाने जागतिक दर्जाचे अभ्यागत केंद्र उभारले असुन पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधा जसे वाहनतळ, उपहारगृह, स्वच्छतागृह इ. पुरविण्यात आलेल्या आहेत. वनविभागास महामंडळाची जमीन हस्तांतरीत करुन त्या ठिकेाणी वनविभागामार्फत अतिशय सुदर असे पर्यावरण पुरक महादेव वन उभारण्यात आले आहे.
दरम्यान, याठिकाणी पर्यटकांसाठी राहण्याच्या सोयी मर्यादित असल्याने पर्यटकांमधुन नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे महामंडळाने या ठिकाणी एक साधारणपणे 4013.23 चौमी एवढया जागेत अद्ययावत असे पर्यटक निवासाचे बांधकाम केले आहे. 20 खोल्या, 2 डॉरमेट्री, 1 उपहारगृह, 1 किचन, स्वागतकक्ष इत्यादी पर्यटक निवास बांधण्याकरिता साधारणपणे रु. 7 कोटी इतका निधी खर्च करण्यात आलेला आहे. सर्व खोल्या या वातानुकुलित असुन भव्य असे 2 लोकनिवास महीला आणि पुरुषांसाठी तयार करण्यात आले आहेत. सदरचे बांधकाम पुर्ण करण्यात आले आहे.
वेरूळ पर्यटक निवास वेरूळ कक्षांची सुविधा–
1. निवास खोल्यांची संख्या –20. (वातानुकुलीत कक्ष) – लोकक्षमता - 60
2. डोरमेट्री - 02
3. एका डोरमेट्री क्षेत्रफळ - एकुण लोकक्षमता-30
4. उपहारगृह / डायनिंग - 1 लोकक्षमता - 80
5. किचन – 01
6. भांडारकक्ष, स्वच्छतागृह, अपंगांसाठी स्वच्छतागृह, स्वागतकक्ष, व्यवस्थापक कक्ष.
सदरच्या पर्यटक निवासाच्या समोरच हेलीपॅड असुन जवळच जागतिक दर्जाचे अभ्यागत केंद्रही आहे.
सदर पर्यटक निवासामध्ये विविध सोयी असल्याने पर्यटकांना राहण्याचा आनंद घेता येणार आहे. तसचे सदरचे पर्यटक निवास हे वेरुळ लेण्यांच्या अगदी समोरील बाजुस असल्याने पर्यटक निवासाच्या खोल्यांमधुन आणि छतावरुन लेण्यांचे विहंगम दृश्य पर्यटकांना अनुभवता येणार आहे.
सदरच्या पर्यटक निवासाचे उद्घाटन पर्यटन विभागाचे धडाकेबाज नेतृत्व आणि दुरदृष्टी असलेले मा. श्री. गिरीषजी महाजनसो, मा. मंत्री, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, ग्रामविकास व महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते आज गुरुवार दि. 26/09/2024 रोजी करण्यात आले आहे. या मंगलप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते. आगामी काळात पर्यटकांसाठी विविध सुविधा निर्माण करुन पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटकांना तारांकित दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यावर पर्यटन विभागाचा भर असुन लवकरच विविध सुविधा निर्माण करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन मा. श्री. गिरीषजी महाजन यांनी या प्रसंगी सांगितले.
पर्यटन विभागाच्या सचिव मा. जयश्री भोज आणि व्यवस्थापकिय संचालक मा. श्री. मनोजकुमार सुर्यवंशी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली बांधण्यात आलेल्या राष्ट्रकुट पर्यटक निवासामुळे वेरुळ लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या आणि घृष्णेश्वर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची उत्तम दर्जाची सोय होणार आहे. येथे येणाऱ्या परदेशी पर्यटकांनाही लेण्याच्या सानिध्यात राहण्याची संधी उपलब्ध होणार असुन छत्रपती संभाजीनगर शहरापासुन वेरुळ जवळच असल्याने पर्यटक या ठिकाणी राहण्यास जास्त पसंती देतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे मा. व्यवस्थापकिय संचालक श्री. मनोजकुमार सुर्यवंशी यांना केले आहे. पर्यटक निवासाचे परिचालन करण्यासाठी महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री. चंद्रशेखर जयस्वाल आणि प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे हे करीत आहेत.
सदरचे उद्घाटन हे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा