Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४

ऐन सणासुदीच्या दिवसांत पुरणपोळीसाठी लागणारी हरभरा डाळ, गूळ, साखरेच्या दरात वाढ

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

--- दरवर्षी भाद्रपदी अमावस्येला बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पोळ्याला वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा मराठी सण म्हणून बैल पोळा साजरा केला जातो. 

    बैलपोळा सणादिवशी बळीराजा बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढतो आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो. यंदा ऐन सणासुदीच्या दिवसांत पुरणपोळीसाठी लागणारी हरभरा डाळ, गूळ, साखरेच्या दरात वाढ झाली आहे. सर्वसामान्यांना पुरण पोळीचा घास 'कडू' लागणार आहे.

      कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झाले असले तरी बैल पोळ्याचे महत्व अजूनही कायम आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्यांच्याकडे शेती नाही, ते मातीच्या बैलाची पूजा करतात. बैलपोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैल पोळ्याला विशेष महत्व आहे. बैल वर्षभर शेतात राबतात. शेतकऱ्यांना बैलांची साथ असते. म्हणून बैलाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. बैल शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. बैलपोळा हा बैलांच्या सन्मानाचा सण आहे. पुणे व नगर जिल्ह्यात बैलांना सजवून त्यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढली जाते.          

  दरम्यान, शेतीसाठी वापरासाठी येणारे बैल यांत्रिकीकरणामुळे गोठ्यात दिसून येत नाही. मात्र, बैलगाडा शर्यतीसाठी मोठ्या प्रमाणात बैलांना मागणी वाढल्यानंतर पुन्हा गोठ्यात बैलांची जोडी दिसू लागली आहे. त्यातून बैलगाडा शर्यतींचे घाट फुलताना दिसत आहेत. बैलांना लाखो रूपये किंमत मोजावी लागत असल्याने बैलांना मागणी वाढल्याचे दिसून येते. बैलपोळ्याला या बैलाची मिरवणूक काढली जाते. 

   यावर्षी सणाच्या तोंडावर हरभरा डाळ व साखरेचे भाव वाढल्याचे दिसून येत आहे. हरभरा डाळ प्रतिकिलो ३० ते ४० रूपयांनी महागली आहे. पंधरा दिवसांपूर्वी ७० ते ७५ रुपये प्रतिकिलो असणारी हरभरा डाळ आता १०५ ते १३० रूपये किलो झाली आहे. परिणामी पुरणपोळी खाणाऱ्यांना महागाईला सामोरे जावे लागणार आहे. तर साखरेच्या दरातही तीन पटींनी वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात साखरचे दर ४५ रूपये प्रतिकिलो पर्यंत गेले आहेत. 

      यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, त्याचा परिणाम उस उत्पादनावर होणार आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांचा प्रथम क्रमांक लागतो. जूनमध्ये साखर किरकोळ बाजारात ३७ रूपये प्रतिकिलो होती. ऑगस्टमध्ये हे दर ४० रूपयांवर गेले होते. सप्टेंबर महिन्यात तेच दर ४५ रूपयांवर गेल्याने दीड महिन्यांत या दरात १० रूपयांनी वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्गात वर्तविली जात आहे. 

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा