Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

*विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने आमदाराने सोडले अन्नपाणी --आमदाराच्या पत्नी म्हणाल्या माझे पती डिप्रेशन मध्ये आहेत*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

मुंबई : --राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्षांनी बहुतांश उमेदवार जाहीर केले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र त्यांच्यासोबत बंडात सहभागी झालेल्या 40 पैकी 39 जणांना उमेदवारी देण्यात आली आणि केवळ एकाच आमदाराचे तिकीट कापण्यात आले आहे.


माझ्या पतीला तिकीट कापल्याचा मोठा धक्का बसला असून आमदारांनी अन्न-पाण्याचा त्याग केला असल्याचे त्यांच्या पत्नीने माध्यमांना सांगितले आहे. महायुतीमध्ये पालघरच्या जागेवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पालघरच्या जागेवर श्रीनिवास वनगा यांना येथून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.


एकनाथ शिंदे जून 2022 ला सूरतला जाताना ज्या श्रीनिवास वनगा यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे कारण दाखवून पालघरच्या दिशेनं गेले होते त्याच श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारण्यात आली. यामुळं श्रीनिवास वनगा नाराज झाले असून त्यांनी कालपासून अन्न पाणी सोडून दिलं असून ते पूर्णपणे मानसिक दृष्ट्या खचले असून आत्महत्या करण्याचा विचार करत आहेत, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. 


माझे पती श्रीनिवास वनगा यांचं पालघर विधानसभेत व्यवस्थित काम सुरु होतं. ते कामाची प्रसिद्धी करत नव्हते. मात्र ते बांधणी करत होते, ते पक्षाशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिले. 20 जून 2022 ला मुलाचा वाढदिवस असताना ते तिकडे गेले, त्यावेळी त्यांना शब्द दिला होता की तुम्हाला घरी बसवणार नाही. परंतु तो शब्द पाळण्यात आला नाही, असं सुमन वनगा म्हणाल्या. श्रीनिवास वनगा कालपासून जेवत नाही, वेड्यासारखं वागत आहेत, आत्महत्या करणार म्हणतात, आपल आयुष्य संपून गेलं असं म्हणतात, असं सुमन वनगा म्हणाल्या.


उद्धव साहेब आमच्यासाठी देव होते

उद्धव साहेब आमच्यासाठी देव होते. शिदेंसाहेंबावर विश्वास ठेवला ही चूक झाली. 39 आमदारांचं पुनर्वसन केलं, माझ्या पतीचं काय चुकलं, असा सवाल सुमन वनगा यांनी विचारला. श्रीनिवास वनगा तीन दिवस जेवले नाहीत. डहाणू विधानसभा देणार असं सांगितलं पण तिथून देखील उमेदवारी देण्यात आलेली नाही. माझे पती डिप्रेशनमध्ये गेले आहेत. श्रीनिवास वनगा यांचे बरे वाईट झाले तर आम्ही कुणाला जबाबदार धरायचं, असा सवाल सुमन वनगा यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. राजेंद्र गावित यांना पक्षप्रवेश देण्यापूर्वी श्रीनिवास वनगा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी प्रदीर्घ चर्चा झाली होती. त्यावेळी डहाणू मतदार संघात भाजपातर्फे उमेदवारी देण्याचे त्यांना आश्वासन देण्यात आले होते. मात्र डहाणूची उमेदवारी भाजपाने विनोद मेढा यांना दिल्यानंतर श्रीनिवास वनगा यांच्या भावनांचा बांध फुटला.


गेल्या दोन दिवसांपासून श्रीनिवास वनगा यांनी शिवसेना (शिंदे) पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क साधताना आपली फसवणूक झाल्याचे मांडले होते. आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवून उमेदवारीच्या निर्णयात बदल होईल अशी त्यांना आशा वाटत होती. काल सायंकाळी आपल्या घरी पत्रकारांशी श्रीनिवास वनगा यांनी आपली व्यथा मांडली. आपण मतदार संघात निवडून येणार नाही असे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सांगण्यात आल्याचे कथन केले. तरीदेखील पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रत्येक वेळी आपण प्रामाणिकपणे काम केल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यमान आमदारकीच्या कारकीर्द मतदार संघात अनेक विकास काम केली असताना देखील आपल्याला या पद्धतीचे फलित मिळत असल्याने त्यांनी साश्रू नयनांनी आपल्याला डावल्याच्या भावना व्यक्त केल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा