*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने वडगाव शेरी या मतदारसंघातून बापू पठारे यांना उमेदवारी दिली आहे. शुक्रवारी (८ नोव्हेंबर) या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वडगाव शेरी मतदारसंघात पठारे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली त्या सभेत सुप्रिया सुळे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांनी या सभेत सांगितलं की “येथील आमदाराने (सुनील टिंगरे) शरद पवारांना (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष) नोटीस पाठवली आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणात माझी बदनामी कराल तर मी तुम्हाला कोर्टात खेचेन. असं त्या नोटिशीत लिहिलं होतं”.
सुप्रिया सुळे सभेला उपस्थित असलेल्या लोकांना म्हणाल्या, “तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या ८० वर्षाच्या योद्ध्याबद्दल ते (सुनील टिंगरे) आपल्या भाषणात (यापूर्वीच्या निवडणुकीत) बोलत होते. ज्यांनी तुमच्या एबी फॉर्मवर सही केली होती, ज्यांच्यामुळे तुम्ही निवडून आलात, त्याच शरद पवारांना तुम्ही पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर नोटीस पाठवली होती. ‘माझी बदनामी केली तर मी तुम्हाला कोर्टात खेचेन’ असं त्या व्यक्तीने (सुनील टिंगरे) शरद पवारांना नोटीसीद्वारे बजावलं होतं. तशी नोटीस त्यांनी पाठवली होती. तुम्ही माझी बदनामी केली तर मी तुम्हाला कोर्टात खेचेन असं त्यात त्यांनी म्हटलं होतं”.
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
सुप्रिया सुळे सुनील टिंगरे यांना आव्हान देत म्हणाल्या, मी एकदा नाही, पुन्हा पुन्हा आणि शंभर वेळा तुम्हाला आव्हान देते, तुम्ही म्हणाल ती वेळ, तुम्ही म्हणाल ती जागा, मी त्या पोर्शे कार अपघात प्रकरणात हत्या झालेल्या मुलांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि तुम्ही ती कृती करणाऱ्या (अपघातातील आरोपी) व्यक्तीच्या पाठीशी उभे होतात, हे सर्वांना माहीत आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे (शिवसेना उबाठा उपनेत्या) आणि आमदार रवींद्र धंगेकर (काँग्रेस नेते) यांना नोटीस पाठवून दाखवा. आम्ही लढू, कारण आम्हाला कोणाची भीती नाही.
महायुती सरकारला आव्हान
'ईडीपासून मुक्ती मिळावी, यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला,' असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी शुक्रवारी पुण्यात याबाबत भाष्य करताना, महायुती सरकारचे वाभाडे काढले. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही आरोप केले. “आमच्या घरातील महिलांवर का आरोप करता? माझ्या तीन बहिणींवर प्राप्तिकर खात्याने छापा टाकायचे कारण काय? तुमची लढाई राजकीय आहे, तर आमच्याशी लढा”, असे थेट आव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला दिले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा