Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २४ नोव्हेंबर, २०२४

इंदापूर विधानसभा मतदार संघ निवडणुकी आमदार दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा तिसऱ्यांदा पराभव करत विजयाची हॅटट्रिक. अपक्ष प्रविण माने ठरले जाईंट किलर.

 




*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 8378081147

----- इंदापूर विधानसभा मतदार संघ निवडणुकी मध्ये महायुतीचे उमेदवार माजी मंत्री, आमदार दत्तात्रय भरणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा तिसऱ्यांदा पराभव करत विजयाची हॅटट्रिक केली. दत्तात्रय भरणे हे १९४१० मतांनी विजयी झाले. मतदारांनी त्यांना केलेल्या कामाची पोचपावती दिली. इंदापूर येथील शासकीय गोदामात शनिवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे, सहाय्यक निवडणूक अधिकारी जीवन बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ११९ कर्मचाऱ्यांनी उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतमोजणीस प्रारंभ केला. यावेळी पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. इंदापूर विधानसभा मतदार संघात १ लाख ७४ हजार ८३२ पुरुष, १ लाख ६६ हजार ६३१ महिला, इतर २२ असे एकूण ३ लाख ४१ हजार ४३५ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ३६ हजार १५२ पुरुष, १ लाख २६ हजार ४७२ महिला असे एकूण २ लाख ६२ हजार ६३५ मतदारांनी आपला मताचा अधिकार बजावला होता. मतमोजणीस पंचवीस फेऱ्या ठेवण्यात आल्या होत्या. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तात्काळ त्यांची महाविकास आघाडी मधून उमेदवारीची घोषणा करून त्यांचे स्थान मुंबईत असेल असे जाहीर केले होते. तर विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष व महायुतीचे उमेदवार म्हणून पक्षाध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली होती. त्यातच हर्षवर्धन पाटील यांना पक्षात घेवून त्यांना थेट उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने पक्षाचे प्रविण माने यांनी बंडखोरी जाहीर करून प्रचारास सुरुवात केली होती. त्यामुळे राज्या मधील महत्त्वाची लढत म्हणून सर्वांचे लक्ष इंदापूर विधानसभा निवडणुकीकडे लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राजकारणातील महा बस्ताद शरद पवार व त्यांचे शिष्य वस्ताद तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणूकीत वस्ताद अजित पवार यांनी महावस्ताद शरद पवार यांना धोबीपछाड करत मात केली. महाविकास आघाडी मधून प्रवीण दशरथ माने यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून लढवलेली निवडणूक श्री. भरणे यांच्या पथ्यावर पडली.




शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील आदींनी हर्षवर्धन पाटील यांच्या विजयासाठी इंदापूर तालुक्यामध्ये संपूर्ण लक्ष केंद्रित केले मात्र हर्षवर्धन पाटील यांनी बेरजेचे राजकारण न केल्यामुळे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या बड्या नेत्यांची समजूत काढून मूठ बांधण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला. मात्र शरद पवार यांना दैवत मानणाऱ्या प्रविण माने यांचीच बंडखोरी क्षमविण्याचा पुरेसा प्रयत्न शरद पवार यांनी केला नाही. त्यामुळे माने यांची बंडखोरी भरणे यांच्या पथ्यावर तर पाटील यांना महागात पडल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. अजित पवार तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आपला उमेदवार विजयी होण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाराज असलेल्या दुसऱ्या फळी तील अनेक नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन भरणे यांचे पारडे जड केले. मागील दहा वर्ष सत्तेपासून वंचित राहिलेल्या हर्षवर्धन पाटील यांची साथ अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी तसेच त्यांचे चुलत भाऊ मयूरसिंह पाटील यांनी सोडली. जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, नीरा भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंत मोहोळकर, माजी संचालक अतुल व्यवहारे, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, माजी सभापती विलासराव माने, दत्तात्रय फडतरे, इंदापूर विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील आदींसह अनेकांचा समावेश आहे. त्यांना अजित पवार यांनी भरणे साठी आपल्या पक्षाकडे वळविले. हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयूरसिंह पाटील व त्यांचे कार्यकर्ते यांनी अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांची साथ देणे पसंत केले. या प्रमुख कारणांमुळे हर्षवर्धन पाटील यांच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.



पहिल्या फेरीत भरणे यांना ४८६६, पाटील यांना ४५३० तर अपक्ष उमेदवार माने यांना १२५० मते मिळाली. यावेळी भरणे यांनी ३३६ मतांची आघाडी घेतली. पहिल्या फेरी पासून दत्तात्रय भरणे यांनी मताची आघाडी वाढवत नेली. दुसऱ्या फेरीमध्ये भरणे यांची आघाडी १०२९ मतांची होती. तिसऱ्या फेरी मध्ये ही आघाडी कमी होवून ३३३ मतांची झाली. चौथ्या फेरीत हर्षवर्धन पाटील यांनी मुसंडी मारून अकराशे पन्नास मते मिळवली. या फेरीमध्ये दत्तात्रय भरणे यांची पिछाडी झाली होती. तिसऱ्या फेरी नंतर दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर जे मताधिक्य मिळवले ते कायम राहिले. सहाव्या फेरी मध्ये दत्तात्रय भरणे यांनी ६३३५ मताची आघाडी घेतली. दहाव्या फेरीमध्ये भरणे यांची १२३५२ मतांची आघाडी झाली, अकराव्या फेरीमध्ये भरणे यांना ३००० मते अधिक मिळाल्यामुळे त्यांनी १५००० मतांची आघाडी मिळवली. पंधराव्या फेरीमध्ये भरणे यांनी २३ हजार १०९ मतांची आघाडी घेतली. सोळाव्या फेरीमध्ये भरणे यांना २२ हजार ६९७ मतांची आघाडी मिळाली. सतराव्या फेरीअखेर भरणे यांना २२१२४ मतांची आघाडी मिळाली. एकोणिसाव्या फेरीअखेर भरणे यांना २०७४६ मतांची आघाडी मिळाली. विसाव्या फेरीअखेर भरणे यांना २०४४७ मतांची आघाडी मिळाली. एकविसाव्या फेरीअखेर भरणे यांना २०६३६ मतांची आघाडी मिळाली. बावीसाव्या फेरीअखेर भरणे यांना २१३८६ मतांची आघाडी मिळाली. चोवीसाव्या फेरीअखेर भरणे यांना १९२४२ मतांची आघाडी मिळाली. तर पंचविसाव्या फेरीअखेर भरणे यांना १९४१० मतांची आघाडी घेत विजय संपादन केला.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा