Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २३ जानेवारी, २०२५

*शिवसेनाप्रमुख-" बाळासाहेब ठाकरे" जयंती निमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटांची जोरदार शक्तीप्रदर्शन*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448*

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे  आणि एकनाथ शिंदे  गटाने आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे निमित्त साधत दोन्ही गट आज (गुरुवार) मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा आज अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे तर एकनाथ शिंदे गटाचा वांद्रे-कुर्ला संकुलात मेळावा होत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही गटाकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.


उद्धव ठाकरे आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून प्रथमच सर्वसामान्य शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मध्यंतरी मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे जाहीर केले होते. मात्र, खुद्द उद्धव ठाकरे यांनी अद्याप महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे विधानसभा निवडणूक निकाल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कोणती भूमिका मांडणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.


विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयाने आत्मविश्वास दुणावलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता स्थानिक निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी निवडणुका शिंदे गटाच्यावतीने आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत शिवोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात होणाऱ्या या कार्यक्रमात शिंदे हे उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. शिंदे गट स्थानिक निवडणुका विशेषतः मुंबई महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढवण्याची शक्यता असली तरी एकनाथ शिंदे आपल्या कार्यकर्त्यांना स्थानिक निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा