*उपसंपादक-- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
३ जानेवारी १८३१ साली नायगाव जिल्हा सातारा येथे नेवासे परिवारात युगस्त्रीचा जन्म झाला .
विषमतेने पिचलेल्या समाजातील वर्ण वादाने माखलेला माणूस माणुसकी विसरुन गोठ्यातल्या जनावरालाही लाजवू पाहत होता. सनातनी बुरसटलेल्या विचारांमुळे स्त्रियांच्या वाट्याला विषमय जीवन आले होते. गुलामगिरीच्या साखळदंडात स्त्री जखडली गेली होती. अज्ञान अंधश्रदेची, अंधकाराची मुळे खोलवर रुजली होती.
छूत-अछूत, सती प्रथा, बालविवाह, विधवाविवाह, केशवपन अशा अनेक कुप्रथांनी समाज ग्रासला होता. त्यांच्या उद्धारासाठी सावित्रीबाई फुलेंनी देशातील मुलींची पहिली शाळा बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात १८४८च्च्या ऑगस्ट महिन्यात पुणे येथे सुरु केली. त्यासाठी हिंदू शास्त्रांच्या मते स्त्रिया आणि शुद्रांना विद्येचा अधिकार नव्हता. स्त्रीला शिक्षण दिले तर ती कुमार्गास लागेल. घराचे वाळवंट बनवेल, असे मानले जात होते. स्त्री ही अबला आहे, विद्याभ्यासाने तिची पापचरणाकडे प्रवृत्ती होईल, अशी समजूत होती. स्त्रीला अशा तऱ्हेने स्वातंत्र्य मिळत नसे. तिचे जीवन करुणास्पद झाले होते. धर्म आणि सामाजिक परंपरा यांनी तिचे जीवन जखडून तिला बंदिस्त केले होते. त्या सामाजिक चौकटीलाच सावित्रीबाईंनी आव्हान दिले होते. त्यामुळे सनातनी लोकांचा जळफळाट सुरु झाला. आमचा धर्म धोक्यात आला म्हणून आक्रोश करू लागले. एका बाईने समाजाची बंधने तोडून शिक्षिकेचे काम करावे ही गोष्ट त्यांना अपवित्र, अभूतपूर्व वाटली. धर्ममार्तंडांना तो आपला खूप मोठा अपमान वाटत होता. म्हणून त्या शाळेत निघाल्या की, त्यांच्यावर शेण, चिखल फेकीत, दगड फेकीत प्रतिदिनी होणारा हा त्रास त्या सहन करत होत्या. वास्तविक पाहता, त्या लोकांचे हे वर्तन पाहून चिडायला हव्या होत्या पण त्यांनी दुष्ट लोकांचे भले होवो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना केली. आपण समाजाच्या विरोधात बंड उभारले आहे. त्यामुळे आपल्या वाट्याला दुःख येईल. अपमान होईल. खूप मनस्ताप सहन करावा लागेल. त्यासाठी आपण खंबीर राहिले पाहिजे, अशी शिकवण ज्योतिबांनी सावित्रीबाईंना दिली होती. म्हणून त्या डगमगल्या नाहीत. निर्भयपणे आपल्या खडतर मार्गावरुन वाटचाल करीत होत्या. त्या धर्ममार्तंडाच्या छळाला जुमानत नव्हत्या. हे पाहून त्या समाजकंटकांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांना वाळीत टाकले, पण त्या या विरोधाला घाबरुन गेल्या नाहीत. उलट त्यांची झेप आता त्यापेक्षाही जास्त उड्डाण करणार होती. तो निश्चय निश्चित झाला होता बालविवाह, केशवपन वासारख्या दुष्ट रुढी त्यांना बंद करायच्या होत्या. विधवेचे केशवपन केल्याने मृत नवऱ्याच्या आत्म्याला शांती मिळते, असे शास्त्रीबुवा सांगत आणि अज्ञानी लोक त्यावर विश्वास ठेवीत. सती ही प्रथा माणुसकीला काळिमा फासणारीच होती. लोकांचे आघात सतत सहन करून त्यांचे समाजजागृतीचे कार्य अखंड चालूच ठेवले. संसारात आणि समाजकार्यात सावित्रीबाईंनी स्वतःला पूर्णतया तनमनाने झोकून दिले होते.त्यांच्या सहकारी शिक्षिका फातीमाबी शेख यांनी ही या स्त्रीशिक्षणाच्या कार्यात स्वतःला झोकून दिले . पहिल्या भारतीय मुस्लिम शिक्षिका म्हणून त्यांची ओळख झाली. फातिमा शेख यांचे बंधू उस्मान शेख यांनी ही वेळोवेळी फुले दांपत्यास सहकार्य केले.
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक समतेचा दीपस्तंभ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या मार्गदर्शनासाठी उभा केला. सर्वांगीण क्रांतीचे रणशिंग हिंदुस्थानात प्रथम फुंकले. कीटकांप्रमाणे अंधारात चाचपडत जगणाऱ्या दुर्दैवी जीवांना माणूस म्हणून जगण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा अग्निकुंड केला. आपले संपूर्ण आयुष्य लोक कल्याणासाठी, समाजहितासाठीच झिजविले. एक स्वतंत्र व नवा सामाजिक धर्म उभा करण्याचे सामर्थ्य त्यांनी प्रकट केले, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पाहिलेले स्वप्न साकार झाले असले तरी त्यांच्या स्वप्नांना तडा गेलेला दिसतो. भारतमाता पारतंत्र्यातून मुक्त झाली. मात्र समाजाचा मुख्य घटक असणारी स्त्री आजही समाजव्यवस्थेत गुलामगिरीचे ओझे वाहत आहे. केवळ चूल आणि मूलच नव्हे तर एक उपभोगाचे साधन म्हणून आजही तिचा पदर समाजवेशीत टांगलेला दिसतो. स्त्री शिक्षणाच्या क्रांतीतून समाजरेषेला सामोरी जाणारी निर्भीड सावित्रीबाई फुले असो किंवा बंदुकीच्या गोळीचा निशाणा बनलेली निडर मलाला असो, यांना स्त्री शिक्षणासाठी समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. स्त्री स्वातंत्र्यासाठी अजून किती संघर्ष करावा लागेल सांगता येत नाही. -
नूरजहां शेख, गणेशगाव, ता. माळशिरस.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा