*अकलूज --प्रतिनिधी*
*शकूरभाई तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात जागतिक महिला दिन विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका-शिक्षकेत्तर सेवकांचा सत्कार करून साजरा करण्यात आला. यास कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या ॲड. हसीना शेख व अध्यक्षस्थानी माता पालक संघाच्या उपाध्यक्षा गायत्री शेटे ह्या उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले सर यांनी महिला दिनाचा इतिहास, महत्व व उद्देश सांगून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई, बहीण, पत्नी, मुलगी, सून यासारख्या अनेक भूमिका पार पाडणाऱ्या आजच्या स्त्रीने कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पेलत पुरुषांच्या बरोबरीने यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत केली आहेत. ' चूल आणि मूल' या चक्रव्युहात न अडकता शिक्षणामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील कोणतेही क्षेत्र असो तिथे महिला काम करताना दिसतात हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माळशिरस तालुक्याच्या भाग्यविधात्या श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा व अध्यक्षा यांचा यथोचित सत्कार विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आला यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील सर्व विभागातील महिला शिक्षिका-शिक्षकेतर कर्मचारी तसेच गृहरक्षक दल व शालेय पोषण आहाराच्या महिलांचा सत्कार मानाचा फेटा घालून करण्यात आला.
यावेळी शिक्षिका स्नेहा शिंदे यांनी सुरेल आवाजातील 'आनंद या जीवनाचा सुगंधपरी दरवळावा...' हे महिला गौरव गीत सादर केले.यास सयाजीराजे वाद्यवृंदाने संगीतमय साथ दिली.
विद्यार्थी भाषणामध्ये अकरावीची विद्यार्थिनी कु. शीतल चव्हाण हिने महिलांच्या सन्मानार्थ तर शिक्षक मनोगतात संदीप शिंदे यांनी अनेक कर्तुत्ववान आदर्श महिलांचे उदाहरणे देऊन महिला दिन विषयक आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ॲड. हसीना शेख यांनी बोलताना महिला दिन का साजरा केला जातो? महिलांचे सामाजिक अधिकार कोणते? आजची स्त्री समाजातील विकृतीपासून सुरक्षित आहे का? हे सांगून स्त्री सुरक्षित राहण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना दिल्या यामध्ये स्त्री सुरक्षा विषयक विविध कायदे सांगून आधुनिक काळात मुलींनी समाजातील विकृतीविरुद्ध स्व-संरक्षण करण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करावी. तुमचे धाडस हीच तुमची सुरक्षा असून धैर्याने सामना करा. समाजात वावरताना जर छेडछाड, विचित्र नजरेने पाहणाऱ्या प्रवृत्ती विरुद्ध दुर्लक्ष न करता वेळीच सतर्क करावे असे मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा गायत्री शेटे यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य जाकीर सय्यद,भारत शिंदे, पर्यवेक्षक, शिक्षक प्रतिनिधी, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी, बहुसंख्य विद्यार्थी, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन पोपट पवार यांनी तर आभार सावंत मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा