*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाचं प्रतीक असलेल्या देवगिरी (दौलताबाद) किल्ल्याला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. सकाळी साडेनऊच्या सुमारास आगीचे लोळ उठल्याचं प्रथम लक्षात आलं. सिगारेटच्या ठिणगीने वाळलेल्या गवताला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केलं आणि किल्ल्याच्या चारही बाजूंनी धुराचे प्रचंड लोट उठू लागले.
या आगीत 40 पेक्षा अधिक घोरपडी भाजून मृत्युमुखी, तर 100 हून अधिक झाडं, 25 पेक्षा अधिक मोर आणि 25 प्रकारच्या वनस्पतींना फटका बसल्याची माहिती मिळते आहे. अशातच आता स्थानिक ग्रामस्थांनी किल्ल्यावर कायमस्वरूपी अग्निशमन यंत्रणा स्थापण्याची मागणी केली आहे.
देवगिरी किल्ल्याला पूर्वीही अशा आगीचा सामना करावा लागला आहे. उन्हाळ्यात वाळलेल्या गवतामुळे अग्निकांड टाळणं कठीण जातं, पण प्रत्यक्ष यंत्रणा आणि सुरक्षेची तजवीज नसल्यानं नुकसान मोठं होतं. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी जंगल आणि प्राणी जैवविविधतेचं मोठं संवर्धन आहे, त्यामुळे अशा आगी रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणं अत्यावश्यक आहे.
अनेक पर्यटक आणि इतिहासप्रेमीही याठिकाणी मोठ्या संख्येनं भेट देतात. त्यामुळे किल्ल्याच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने पुढाकार घेणं ही काळाची गरज आहे.
देवगिरी किंवा दौलताबाद किल्ला हा भारतातील सर्वात बलाढ्य आणि दुर्गम किल्ल्यांपैकी एक मानला जातो. यादव राजांनी बांधलेला हा किल्ला पुढे दिल्ली सल्तनत, अहमदनगर सल्तनत आणि मुघल साम्राज्याच्या ताब्यात होता.
1327 मध्ये मोहम्मद बिन तुघलकने राजधानी दिल्लीहून देवगिरी (दौलताबाद) येथे हलवली, त्यामुळे किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आणखी वाढले. विविध साम्राज्यांनी येथे तोफा, गुप्त प्रवेशद्वारे, खडकात खोदलेली गॅलरी यांसारखी संरचना केली, जी आजही पर्यटकांना आकर्षित करते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा