*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी, मोबाईल नंबर 8378081147
-----विजांचा लखलखाट व सुसाट वादळी वाऱ्यासह अवकाळीच्या हजेरीने शेतकऱ्यांत समाधान मात्र विद्युत खांब, झाडे, केळी पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नाराजी पहावयास मिळत आहे. तर मागील आठ दिवसांपासून गणेशवाडी करांना विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
मागील चार दिवसांपासून अवकाळी पावसाच्या हजेरीने उन्हाळ्यात गारवा निर्माण झाला आहे. तर शेतकरी, नागरिकांत समाधानाने वातावरण निर्माण झाले आहे. परंतू विजांच्या कडकडाट व सुसाट वादळी वाऱ्यामुळे चारा, फळपिके, घरे, झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे आंबा, कांदे, मका, बाजरी, केळी पिकांचे पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाला आलेली फळपिके वाऱ्याच्या माऱ्यामुळे सपरंग झाली असून पडलेल्या मालाला बाजारात दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. परीसरातील टणू, गिरवी, पिंपरी बुद्रुक, गोंदी, ओझरे, लुमेवाडी, सराटी, गणेशवाडी, शिंदेवस्ती आदि ठिकाणी फळांचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाने पंचनामे तातडीने करण्याची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.
सुसाट वादळी वाऱ्यामुळे गणेशवाडी येथील नाना तावरे, पांडुरंग घोगरे, नामदेव घोगरे, अजिनाथ घोगरे, चेअरमन यांचे विद्युत रोहीत्राकडे जाणारी मुख्य विद्युत वाहिनीचे सहा खांब पडल्याने विद्युत प्रवाह बंद पडला होता. त्यामुळे (दि.२१) रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून (दि.२२) रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जवळपास २३ तास विद्युत पुरवठा खंडित होता. त्यामुळे पिण्याचे पाणी, दळण, दुध, दही, थंडपेय यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आज युद्ध पातळीवर खांब उभे करून सायंकाळी पाच वाजता विद्युत प्रवाह सुरळीत सुरू केला आहे.
चौकट - बावडा येथील विद्युत उपकेंद्रातून गणेशवाडी गावाला विद्युत प्रवाह करण्यात येतो. त्यासाठी पन्नास वर्षांपूर्वी विजवाहक तारा माजी खासदार शंकरराव पाटील यांच्या प्रयत्नातून टाकण्यात आले आहेत. परंतू सध्याला त्या जिर्ण झाल्याने सतत तुटून पडत असतात. त्यातून अनेकदा अपघातही घडलेले आहेत. तसेच सतत विद्युत पुरवठा बंद ठेवण्याची वेळ येत आहे. त्यामुळे गणेशवाडी करांना सतत अंधारात रहावे लागत आहे. तारा बदलून ही गंभीर समस्या कायमची संपवावी अशी मागणी नागरिक व शेतकरी यांनी केली आहे.
फोटो - गणेशवाडी येथे सुसाट वादळी वाऱ्यामुळे सहा विजेचे खांब पडले आहेत.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा