*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
मुंबई : प्रचंड तोट्यात असलेल्या एसटीचे २६ कर्मचारी शिवसेना मंत्र्यांच्या दिमतीला असून त्यातील अनेक जण जादा काम भत्ता (ओव्हरटाइम) ही लावत असल्याने एसटीची लूट होत आहे. उसनवारीने कर्मचारी घेऊ नयेत, असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश असूनही त्याला बगल देत हे कर्मचारी मंत्री कार्यालयात गेल्या तीन-चार महिन्यांपासून काम करीत आहेत.
उसनवारीने कर्मचारी घेण्याची पूर्वीचीच प्रथा असून मुख्यमंत्री कार्यालयाने नाकारलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला नियुक्त करण्यात आलेले नाही. मात्र कोणीही कर्मचारी चुकीचे काम करीत असेल आणि मंत्री कार्यालयात फारसे काम नसताना ओव्हरटाइम भत्ता आकारून एसटीला लुटत असेल, तर कारवाई केली जाईल, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी 'लोकसत्ता'ला सांगितले.
कॅबिनेट व राज्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध मंजूर असून हे कर्मचारी विविध खात्यांमधून प्रतिनियुक्तीने घेण्यात येतात, मात्र अनेक मंत्र्यांकडे मंजूर कर्मचारी संख्येपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असून ते विविध खात्यांमधून उसनवारीने घेण्यात येत आहेत.
मंत्री कार्यालयातील कर्मचारी भ्रष्टाचारी किंवा आरोप असलेले असू नयेत, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह असून मंत्र्यांचे खासगी सचिव, स्वीय साहाय्यक आणि विशेष कार्य अधिकारी हा कर्मचारी वर्ग मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंजुरी घेतल्यानंतरच नियुक्त करण्याचे आदेश त्यांनी जारी केले होते.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनांकडे सर्रास उल्लंघन
मंत्री कार्यालयात प्रतिनियुक्तीने कर्मचारी नियुक्त केले जावेत, उसनवारीने घेऊ नयेत आणि एक-दोन कर्मचारी उसनवारीने घेतले, तर ते संबंधित मंत्र्यांच्या खात्यातीलच असावेत, अशा मुख्यमंत्र्यांच्या सूचना असतानाही सर्रास उसनवारीने कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एसटीचे २६ कर्मचारी सरनाईक, दादा भुसे, शंभूराज देसाई, भरत गोगावले, योगेश कदम अशा शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. शिपाई, कारकून, लिपिक-टंकलेखक, ऑपरेटर, वाहनचालक अशा पदांवर या कर्मचाऱ्यांना घेण्यात आले आहे.
जादा कामाच्या नावाखाली भत्ताही मंजूर
एसटी सध्या प्रचंड तोट्यात असून कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य सरकारला अर्थसहाय्य द्यावे लागत आहे. मात्र केवळ परिवहनच नव्हे, तर अन्य खात्यांच्या मंत्री कार्यालयात काम करीत असलेल्या या कर्मचाऱ्यांचा पगाराचा खर्च एसटीला करावा लागत आहे. अनेक कर्मचारी मंत्री कार्यालयात जादा काम (ओव्हरटाइम) करीत असल्याचे सांगून त्यापोटी भत्ता उकळत आहेत. एका मंत्री कार्यालयातील लिपिकाने गेल्या महिन्यात तब्बल ५० हजार रुपये ओव्हरटाइम घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. संबंधित मंत्र्यांच्या खासगी सचिवाने पत्र दिल्यावर हे भत्ते मंजूर केले जात आहेत.
केवळ शिवसेनेच्याच मंत्र्यांकडे एसटीचे कर्मचारी उसनवारीने पाठविले नसून भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या मंत्र्यांनी मला विनंती केली, त्यांना ते देण्यात आले आहेत. गोगावले, देसाई, कदम, भुसे आदींबरोबरच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही ते देण्यात आले आहेत. एसटी आर्थिक अडचणीत असली, तरी मंत्री कार्यालयात कर्मचारी वर्ग देण्यात काहीच चुकीचे नाही.– प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा