उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
देशसेवा करण्याचे व्रत घेतलेले जवान आपले कर्तव्य जीवाची बाजी लावून पार पाडीत असतात ,रक्त गोठविणारी थंडी असो ,वाढलेले तापमान किंवा वादळ वारा असो जवान सीमेवर आपले कर्तव्य बजावत असतो स्वतःच्या जिवापेक्षा कर्तव्य महत्वाचे मानून आपले कार्य करीत असतो. भारत पाक युध्दजण्य परिस्तिथी निर्माण झाली तेव्हा देशाच्या प्रत्येक नागरिकाला वाटत होते आपली आर्मी शत्रूचे मुडदे पाडण्यास सज्ज आहे , खरे तर सर्व देशवासीयांना आर्मीची तेव्हा आठवण होते जेव्हा देशावर संकट येईल. बऱ्याच लोकांच्या स्टेटस वर दिसत होते आर्मी मॅन युद्ध पातळीवर निघाले आहेत त्यांना प्रवासात कोणताही त्रास होऊ नये .... होय हे योग्यच आहे परंतु इतर वेळी चे काय ? आर्मी मॅन ला मान किंवा सन्मान आम्ही सदैव देतो का ? बऱ्याचदा मी पाहिले आहे ,माझे बंधू फौजी इन्नुस शेख हे कशमिरहून आपल्या गावी माळीनगर ला येत असताना रेल्वेत त्यांना टॉयलेटच्या दारासमोर उभे राहून तीन दिवसांचा प्रवास करावा लागला ,तेव्हा ऐकून मला खूप वाईट वाटले . देशाचा जवान जेव्हा कर्तव्य बजावण्यासाठी रेल्वे किंवा बस मधून प्रवास करतो त्यावेळी त्यांना बसण्यासाठी प्रवासी सीट देत नाहीत थोडे सरकून किंवा आपण स्वतः उठून जागा देणे , वर्दीतील देश रक्षकाचा सन्मान करणे देशातील नागरिकाचे कर्तव्य नाही का ?वर्दीचा मान ठेवणे आमचे कर्तव्य नाही का? वर्दीचा मान फक्त वर्दीतील व्यक्तीनेच ठेवायचा असतो का?
आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी हे जवान सीमेवर रात्रंदिवस पहारा देतात जीवाची बाजी लावतात वेळ प्रसंगी आपल्या रक्ताचा थेंब नी थेंब देश सुरक्षेसाठी अर्पण करतात .मला नेहमी प्रश्न पडतो ,आम्ही काय करतो यांच्यासाठी ? त्या देश रक्षकांच्या बलिदानाचे ऋण काही केल्या फिटणार नाही. परंतु या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारावा या देश रक्षकासाठी आपण काय करतो ,आपल्या गावात किंवा शहरात कोणी न कोणी आजी माजी सैनिक असतातच त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना आपण हवा तो सन्मान देतो का ? परिसरातील एखादा फौजी शहीद होतो तेव्हा चार दिवस आपण हळहळतो शहीद जवान अमर रहे म्हणीत नारे लावतो.... पुन्हा सर्वांना विसर पडतो परंतु त्या वीर जवानाच्या आईने आपल्या पोटचा गोळा आपला लाडका पुत्र देशसेवे साठी गमावलेला असतो आपल्या शहीद पुत्राला श्वासात श्वास असेपर्यंत ती विसरत नाही ,तसेच वीरपत्नी आपल्या पतीला आणि मुले आपल्या पित्याला आयुष्यभर विसरू शकत नाहीत .सरकार कडून या शहीद जवानाच्या कुटुंबाला आवश्यक ती मदत मिळते ,कमी पडतो आम्ही या देशाचे नागरिक ,वीर पत्नी मनोमन मानते की माझा पती देहाने नसला तरी मनाने माझ्या सोबत आहे त्याच्या कार्यामुळे तो अमर आहे परंतु आपला समाज वीर पत्नीला विधवा समजतो शुभ कार्यात तिला सहभागी करून घेतले जात नाही मंगल प्रसंगी तिला मागे सारले जाते तेव्हा तिच्या मनाला किती वेदना होत असतील याचा विचार समाज म्हणजेच आपण करतो का ?तिच्या पतीच्या बलिदानाचे ऋण आपण असे फेडणार का?
खरेतर वीरपत्निस मंगल प्रसंगी सर्वप्रथम मानाचे स्थान समाजाकडून मिळाले पाहिजे.
समाजातील प्रत्येकाने विचार केला पाहिजे हे फौजी चे कुटुंब माझे कुटुंब आहे त्यांच्या अडचणीच्या काळात किंवा बिकट प्रसंगी आपण त्यांना एकटे सोडणार नाही त्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत अशी प्रत्येकाची भावना असली पाहिजे ,शुभ कार्यात त्यांना अग्र स्थानी समाजाकडून मान मिळायला हवा ,वीर पत्नीस विधवा म्हणून कोणीही तिच्या पतीच्या कार्याचा अपमान करू नये ,मुलांना शुर विराची मुले , मातेस वीर पुत्राची आई , पत्नीस विरपत्नी असेच संबोधित करावे . फौजीच्या कुटुंबाला समाजात आदराची सन्मानाची वागणूक समाजाकडून मिळावी. शहीद जवानाच्या त्याग आणि बलिदानाचे ऋण आम्हावर आहेत याची जाणीव सतत आम्हाला भासत राहिली पाहिजे .हीच खरी श्रद्धांजली .
नूरजहाँ फकृद्दिन शेख
गणेशगाव ता.माळशिरस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा