*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
- जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूरचा एक दिवसाचा मुक्काम आटोपून पुणे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामी सराटी ( ता. इंदापूर ) येथे सोमवार ३० जूनला येत आहे. त्यानिमीत्त लाखो वैष्णवांच्या स्वागतासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. तर पावसाच्या पाश्र्वभूमीवर जर्मन सुपर स्ट्रक्चर वाटरप्रुफ मंडपाची उभारणी करण्यात येत आहे. तत्पुर्वी दुपारच्या विसाव्यातील स्वागतासाठी बावडा नगरीही सज्ज झाली आहे.
तुकाराम महाराज पालखीचा सराटी येथील पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम आहे. पालखी स्थळाचे शेजारी झाडे लावून सुशोभिकरण करण्यात आले असून पिण्याच्या पाण्यासाठी टॅकरची सोय, फिरते शौचालय युनिट, आरोग्याच्या दृष्कीकोनातून स्वच्छतेकडे विशेष लक्ष पुरवण्यात आले आहे. गावाच्या प्रवेशावेळी स्वागत कमानी उभारण्यात येत आहेत. तसेच रात्रीच्या मुक्कामासाठी ज्या ज्या म्हणून सुविधा लागतात त्या जादा प्रमाणात पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबरच सराटी गावातून चौरंगीनाथ महाराज, सोपानकाका महाराज, संतराज महाराज, गुलाबबाबा, नरहरी सोनार आदिंसह ७ ते १० पालख्यांचे मार्गक्रमण होत असते. त्यामुळे सर्वच भाविक भक्तांचे व वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य तीन ते चार दिवस सराटी करांना मिळत असते.
पालखी इंदापूरातून सराटी मुक्कामासाठी मार्गस्थ झाल्यानंतर इंदापूर - अकलूज मार्गावर गोखळी, वडापूरी, रामवाडी, सुरवड, वकीलवस्ती येथे पालखीचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येते. दुपारच्या विसाव्यासाठी बावडा येथील बाजारतळावर भक्तांच्या दर्शनासाठी सभामंडप उभारण्यात आला आहे. तसेच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या रत्नाई निवासस्थानी वारकऱ्यांना प्रसादाची सोय परंपरेप्रमाणे करण्यात आली आहे. तर गावाच्या वेशीवर स्वागत कमान उभारण्यात येत आहेत. परंपरेप्रमाणे बावडा पोलीस दुरक्षेत्रामध्ये वारकऱ्यांच्या प्रसादाची सोय करण्यात आली आहे. तर पालखी मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर दुर्लक्ष केल्यामुळे वारकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
पिंपरी बुद्रूक ( ता. इंदापूर ) येथे परंपरेप्रमाणे येणारी संत नरहरी सोनार महाराज यांची पालखी सोहळा ३० जूनला येणार आहे. त्यानिमीत्त कै. लोकनेते महादेवराव बोडके दादा यांच्यावतीने दुपारच्या जेवणाची सोय श्रीमती सुभद्राबाई बोडके, समाधान बोडके यांच्यावतीने करण्यात आली आहे. जेवणानंतर संध्याकाळच्या सराटी मुक्कामासाठी पालखी मार्गस्थ होत असते.
चौकट - जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा सराटी मुक्कामास सोमवारी दाखल होत आहे. मागील दोन वर्षापासून कोरडी पडलेल्या नीरा नदीत पाणी नसल्याने पादुका स्नान टॅकरच्या पाण्यानेच करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. परंतू सध्याला पादुका स्नानाबरोबरच लाखो वैष्णवांना अंघोळीची सोयीसाठी नीरा नदी पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे. शाही नीरा स्नानानंतर पालखी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे प्रस्थान करणार आहे. तेथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात तिसरे गोल रिंगण सोहळा पार पडणार आहे.
फोटो - सराटी ( ता. इंदापूर ) येथे जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचा शेवटचा मुक्काम तळावर ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने जर्मन सुपर स्ट्रक्चर वाटरप्रुफ मंडपाची उभारणी करण्यात येत आहे.
....................................................................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा