*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
छत्रपती संभाजीनगर : शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात राज्यातील शेतकऱ्यांची एकजूट आहे. मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांत विविध ठिकाणी शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात मंगळवारी आंदोलन करण्यात आले. सांगली तसेच कोल्हापूर येथेही रास्ता-रोको करण्यात आला. शक्तिपीठ महामार्ग जात असलेल्या बारा जिल्ह्यांत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
नागपूर ते गोवा असा शक्तिपीठ महामार्ग साकारण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे महामार्ग जाणाऱ्या जिल्ह्यातून या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. परभणी येथे रेखांकन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावले. नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी मोर्चा काढून एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द असा संकल्प केला. लातूर येथेही आंदोलन केले. मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतून या महामार्गास विरोध असल्याचा संदेश मंगळवारी आंदोलनातून दिला.
'एकच जिद्द शक्तिपीठ रद्द', अशी घोषणा देत परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील कानेगाव जिल्ह्यात दोन ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. पूर्णा तालुक्यातील सुरवाडी तसेच कानेगाव (ता. सोनपेठ) येथील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गासाठी संपादीत होणाऱ्या जमीन मोजणीला तीव्र विरोध दर्शवला. आपण कोणत्याही परिस्थितीत ही मोजणी करू नये. या मोजणीला आमचा विरोध आहे, अशी भूमिका यावेळी अनेक शेतकऱ्यांनी मांडली. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील आंदोलनात नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण हेही सहभागी झाले आहेत.
बीड आणि लातूरच्या सीमेवर बर्दापूर पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लातूर तालुक्यात ढोकी (येळी) येथे संयुक्त मोजणीस १५० हून अधिक पोलीस बंदोबस्तासह आलेल्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे यांना शेतकऱ्यांनी गावातून परत पाठवले. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातील धायगुडा पिंपळा व परळी तालुक्यातील तळेगाव येथे रास्ता रोको करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ राष्ट्रीय महामार्ग उभारण्यासाठी जमिनी देण्यास तीव्र विरोध करीत जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन केले. बार्शी, सांगोला, मोहोळ, पंढरपूर आदी तालुक्यांत झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. सोलापूर जिल्ह्यात पाच तालुक्यांतील १५४ गावांतील शेतजमिनी शक्तिपीठ राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध डावलून संपादित करण्याचा घाट घातला जात आहे. बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींची मोजणी करण्यासाठी आलेल्या प्रशासकीय पथकांना परत पाठविण्यात आले होते. तरीही शासनाकडून जमिनी संपादित करण्यासाठी अट्टाहास सुरू असल्याचा आरोप मोहोळ येथील शेतकरी संघर्ष कृती समितीचे नेते ॲड. श्रीरंग लाळे यांनी केला.
मोहोळ येथे पंढरपूर पालखी महामार्गावर झालेल्या चक्का जाम आंदोलनामुळे तेथील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. हीच परिस्थिती सांगोला, पंढरपूर, बार्शी आदी भागात दिसून आली.
शक्तिपीठविरोधात कोल्हापुरात मंगळवारी पुणे -बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात आले. यामध्ये प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर, माजी खासदार राजू शेट्टी तसेच ऋतुराज पाटील सहभागी झाले होते.
सांगलीत वाहतूक ठप्प
सांगली : शेतकरी आणि शेती उद्ध्वस्त करणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, अशा घोषणा देत मंगळवारी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अंकली फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे सांगली- कोल्हापूरची वाहतूक दोन तास ठप्प होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा