*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरात हाणामारीची एक घटना घडली आणि त्या घटनेवरून राज्याचं राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडली. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र, त्यानंतर या प्रकरणी गोपीचंद पडळकर यांचे समर्थक आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकाला पोलिसांनी अटक केलं.
दरम्यान, या प्रकरणावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गंभीर आरोप केला आहे. विधानभवनाच्या लॉबीत झालेल्या मारहाणीच्या घटनेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. तसेच सध्या राज्यात चर्चेत असलेल्या हनीट्रॅपच्या विषयावरूनही सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
“आजपर्यंत कोणत्याही अधिवेशनादरम्यान अशा प्रकारची हाणामारीची घटना घडली नाही. हे अधिवेशन कशासाठी गाजलं? शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी गाजलं का? भाषेच्या प्रश्नांसाठी गाजलं का? राज्याच्या विकासाठी हे अधिवेशन गाजलं का? तर नाही. हे अधिवेशन गाजलं ते हाणामारीच्या घटनेने. कोणी बुक्के मारतो, तर कोणी चापटा मारतो, तर कोणी शिव्या काय देतात? एवढंच नाही तर सभागृहाच्या बाहेरही म्हणजे अक्कोलकोटमध्ये प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला झाला. त्या हल्लेखोराला भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष फोन करून सांगतात की भिऊ नको मी तुमच्या पाठिशी आहे”, असं म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर टीका केली.
विधानभनाच्या लॉबीत हाणामारीच्या घटनेला जबाबदार कोण?
“विधानभनाच्या लॉबीत हाणामारीची घटना घडते? मग या घटनेवरून आता मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करायचं का? या अशा घटनांना जबाबदार कोण? हे प्रकरणे आता हाताबाहेर चालले आहेत. विधानभनाच्या लॉबीतील हाणामारीच्या घटनेला थेट जबाबदार कोण असेल? तर या घटनेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत”, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी आज माध्यमांशी बोलताना केला आहे.
विधानभनाच्या लॉबीत नेमकं काय घडलं होतं?
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडली होती. या प्रकरणी गोपीचंद पडळकर यांचे समर्थक आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकाला पोलिसांनी अटक केलं होतं. या अटकेनंतर दोन्ही कार्यकर्त्यांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने ऋषिकेश ऊर्फ सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख या दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तसेच पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार ऋषिकेश ऊर्फ सर्जेराव टकले यांच्या विरोधात ६ गुन्हे दाखल आहेत, तसेच नितीन देशमुख यांच्याविरोधात ८ गुन्हे दाखल असून दोन्हीही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा