Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २४ जुलै, २०२५

*"मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत गोंधळ "-वर्क ऑर्डर नंतरही पंप नाही- शेतकऱ्यांची फसवणूक?* *तक्रार निवारण कक्षाची तात्काळ नेमणूक करा- शिवसेना शेतकरी सेनेची मागणी*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

धाराशिव:राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेतून राज्यातील हजारो शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करून देण्याचा उद्देश होता. मात्र प्रत्यक्षात या योजनेत अनेक तांत्रिक अडचणी व अंमलबजावणीत दिरंगाई समोर येत असल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातून जिल्हाधिकारीमार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत तक्रार निवारणासाठी प्रत्येक तालुक्यात विशेष कक्ष स्थापन करण्याची मागणी तालुकाध्यक्ष गणेश नेपते यांच्या वतिने करण्यात आली आहे.


शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करून, शुल्क भरून वेंडर निवड केली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणीही पूर्ण केली आणि त्यानंतर निवडलेल्या कंपनीमार्फत वर्क ऑर्डर जारी करण्यात आल्या. वर्क ऑर्डरमध्ये स्पष्टपणे 60 दिवसांच्या आत पंप बसवून देण्याचे उल्लेख आहे. मात्र, प्रत्यक्षात 5 ते 6 महिने उलटूनही पंपाचे काम पूर्ण झालेले नाही.


यामुळे अनेक शेतकरी कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधत आहेत, पण समाधानकारक उत्तर मिळत नाही. काही शेतकऱ्यांना तर कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, "तुमचे साहित्य धाराशिवजवळील गोडाऊनमध्ये आहे, स्वतःच्या वाहनाने घेऊन जा." त्यामुळे शेतकरी 4-5 हजार रुपये खर्चून अर्धवट साहित्य घरी घेऊन आले आहेत. पण उर्वरित साहित्य व प्रत्यक्ष पंप बसवण्याचा काही ठावठिकाणा नाही.


या सगळ्या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम व नाराजी वाढली आहे. "शासनाने आमच्याकडून पैसे घेऊन फक्त वर्क ऑर्डर दिली आणि आता आमची फसवणूक होत आहे," अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.


निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:


1. कंपन्यांनी केलेल्या अपूर्ण कामांची तत्काळ चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी.


2. प्रत्येक तालुक्यातील महावितरण कार्यालयात सौर कृषी पंप योजना तक्रार निवारण कक्ष अथवा प्रतिनिधी नेमावा.


3. शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी थेट संपर्काचे माध्यम आणि ठोस उत्तरदायित्व असावे.



ही योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते, मात्र सध्याची अंमलबजावणी बघता ही योजना अडचणीचे कारण ठरत आहे. शासनाने यामध्ये तत्काळ लक्ष घालून संबंधित कंपन्यांना व महावितरण अधिकाऱ्यांना उत्तरदायी धरून शेतकऱ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्याची गरज आहे.प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावे अन्यथा त्रिव आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष गणेश नेपते,शिवसैनिक मयुर कदम यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा